देशाची निर्यात लवकरच सुरळीत होणार

    दिनांक : 22-Jun-2020
Total Views |


पीयूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास

 Piyush Goyal_1   

 
नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात घसरलेली भारताची निर्यात आता वाढत असून, लवकरच ती सुरळीत होईल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सोमवारी व्यक्त केला.

आता जूनमध्ये देशाची निर्यात केवळ 10 ते 12 टक्क्यांनी कमी आहे. आपले निर्यातदार झपाट्याने परिस्थिती बदलवीत आहेत, असे त्यांनी सीआयआयच्या बाराव्या होरासिस बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करताना सांगितले. रेल्वेची मालवाहतूक सेवा जुलैपर्यंत सुरळीत होईल, असेही त्यांनी सांगितले.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मालवाहतूक वाढल्याचे दिसून येईल. मालगाड्यांचा सरासरी वेग दुपटीने वाढवण्याचा प्रयत्न भारतीय रेल्वेकडून केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात रेल्वेने 75 लाख कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवले. आता 4,553 प्रवासी गाड्या त्यांना घरी सोडण्यासाठी धावत आहेत. प्रवाशांसाठी आम्ही 230 नियमित गाड्या सुरू केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकार नवीन मार्ग उपलब्ध करून देण्यास तयार असल्याने खाजगी क्षेत्राने समोर यावे, असे आवाहन त्यांनी केले. आत्मनिर्भर भारत म्हणजे सरकारने विदेशी गुंतवणूक बंद केली, असा होत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.