चीनविरोधी तणावात संरक्षणमंत्री राजनाथसिंह रशिया दौऱ्यावर रवाना

    दिनांक : 22-Jun-2020
Total Views |


 
RajnathSinh_Russia_1 

नवी दिल्ली : भारत-चीनच्या सैनिकांमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षामुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण आहे. या पृष्ठभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह रशियाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत. रशियाची राजधानी मास्को शहरात 75 व्या विजयी दिवसाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय वायूसेनेच्या विशेष विमानाने रशियाकडे निघाले आहेत.

 

 भारत आणि चीनमध्ये लडाख सीमारेषेवर तणावाचे वातावरण असून 4 दिवसांपूर्वी भारतीय सैन्याच्या 20 जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे. त्यामुळे, देशातील जनतेमध्ये चीनबद्दल प्रचंड संताप आहे. चिनी ड्रॅगनचा उद्दामपणा ठेचून काढण्याची पूर्ण तयारी भारताने केली आहे. लष्करी सामर्थ्यात भिन्नता असली तरी इंच-इंच भूभागाच्या रक्षणासाठी सज्ज राहण्याचे निर्देश संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी लष्करास दिले. तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांसमवेत त्यांची दिल्लीत चर्चा झाली. गलवान खोऱ्यातील झटापटीत भारतीय जवानांवर तार गुंडाळलेल्या दांडुक्याने भ्याड हल्ला चिनी सैनिकांनी केल्यामुळे झटापटीत हत्यार वापरण्याच्या करारातही बदल करण्यावर भारताकडून विचार सुरू आहे. मात्र, त्यास दुजोरा मिळाला नाही.

 

सीमारेषेवर तणाव असतानाच दुसरीकडे संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे तीन दिवसीय रशिया दौऱ्यावर निघाले आहेत. मॉस्को येथील रशियाच्या 75 च्या विजयी दिवस कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी चीनलाही आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, चीनी मंत्र्यांशी कुठल्याही प्रकारचे संभाषण होणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. राजनाथसिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन रशिया दौऱ्याची माहिती देत, रशिया भारतात संरक्षण यंत्रसामुग्रीबद्दल काही करार अपेक्षित असल्याचेही सिंह यांनी म्हटलंय. दोन्ही उभय देशासाठी हा दौरा महत्त्वाचा मानण्यात येतो.

 

दरम्यान, लॉकडाउननंतर एखाद्या केंद्रीयमंत्र्याचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये सर्वच आंतरराष्ट्रीय उड्डाण रद्द करण्यात आले होते.