चीनचा नेपाळच्या रुई गावावर कब्जा

    दिनांक : 22-Jun-2020
Total Views |


 
Nepal_1  H x W:
 

काठमांडू : चीनच्या नादाला लागून भारतासोबतचा 150 वर्षांपूर्वीचा कालापानी वाद उकरून काढणाऱ्या नेपाळची चांगलीच जिरली आहे. नेपाळने कालापानी भाग नकाशात घेऊन भारताला प्रसंगी युद्धाची धमकी दिली आहे. मात्र, चीनने नेपाळचे रुई हे अख्खे गाव घशात घातले आहे. तरीही एक ब्र ही काढलेला नाही. गेल्या महिनाभरापासून चीनची फूस मिळाल्याने नेपाळने भारताविरोधात कारस्थाने रचण्यास सुरुवात केली आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली सरकारने भारताविरोधातील नकाशाला संसदेत मान्यता मिळवून दिली आहे. यामुळे नेपाळमध्ये आंदोलने होत होती. भारताला वेळोवेळी धमकावणाऱ्या ओली यांनी चीनवर मात्र तोंड बंद ठेवले आहे.

 

चीनने रुई गावावर गेल्या तीन वर्षांपासून कब्जा केला असून नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाने यावर चकार शब्द काढलेला नाही. हे गाव गेल्या 60 वर्षांपासून नेपाळच्या ताब्यात होते. यामुळे रुई गावातील गोरखा आता चीनच्या अधिपत्याखाली जिवन कंठत आहेत. नेपाळी वृत्तपत्र अन्नपूर्णानुसार हे गाव 2017 पासून तिबेटचा हिस्सा बनले आहे. या गावात 72 घरे आहेत. मात्र, हे गाव अद्यापही नेपाळच्या नकाशामध्ये आहे. रुई गावाच्या खांबांनाही अधिकृत कब्जा मिळविण्यासाठी हटविण्यात आले आहे.

 

नेपाळच्या महसूल कार्यालयानुसार त्यांच्याकडे आताही रुई गावच्या रहिवाशांकडून गोळा होणाऱ्या महसूलाचे रेकॉर्ड आहे. तर नेपाळी इतिहासकार रमेश धुंगल यांच्यानुसार 2017 पर्यंतच रुई आणि तेईगा गाव देशातील गोरखा जिल्ह्यात होते. आम्ही ही गावे ना ही युद्धामध्ये गमावली आहेत, नाही तिबेटला कोणत्या करारामध्ये दिली आहेत. ती नेपाळचीच गावे आहेत. नेपाळने सीमेवर खांब लावताना निष्काळजीपणा केल्याने आम्ही दोन्ही गावे गमवून बसलो आहोत.

 
भ्रष्ट अधिकाऱ्यांनी गावे दिली

चुमुबरी गावातील नगर पालिका वॉर्ड नंबर चे अध्यक्ष बीर बहादूर लामा यांचा दावा आहे की, रुई गाव आसपासचा परिसर गोरखाचाच हिस्सा होता. तेथील लोक नेपाळलाच महसूल देत होते. आता ते तिबेटचे निवासी झाले आहेत. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे35 नंबरचा पिलर समदो आणि रुई गावाच्या सीमेवर उभारण्यात आला. ही सीमा निश्चित केल्याने तो भाग चीनच्या ताब्यात गेला.