गलवान नदीवर 72 तासांत बांधला पूल

    दिनांक : 21-Jun-2020
Total Views |
डीत लष्करी अभियंत्यांचा पराक्रम

river_1  H x W: 
 
 
गलवान खोरे,
लडाखच्या गलवान खोर्‍यात 15 जूनच्या रात्री भारत आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. त्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र, या स्थितीतही भारतीय लष्कराने रणनीतिक सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या पुलाचे बांधकाम अवघ्या 72 तासांत पूर्ण करून दाखविले.
चिनी सैनिकांची घुसखोरी रोखण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने लष्करी अभियंत्यांना गलवान नदीवर अतिशय जलदगतीने पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. ते अवघ्या तीन दिवसांत पूर्ण करण्यात आले.
 
 
60 मीटर लांबीच्या या पुलामुळे भारतीय लष्कराच्या तुकड्यांना वेगाने नियंत्रण रेषेजवळ पोहोचता येणार आहे. मंगळवारी या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि गुरुवारी दुपारी काम पूर्ण करण्यात आले. अभियंत्यांनी दोन तास या पुलावर वाहनांची चाचणी घेतली. या पुलामुळे भारतीय जवानांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ वेगाने हालचाली करता येतील, हे ठाऊक असल्यानेच चीनने या बांधकामाला विरोध केला होता. चीनच्या या दादागिरीला भारताने या पुलाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. एका इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त आज शनिवारी प्रकाशित केले आहे.
 
 
संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानंतर लष्कराच्या कारू स्थित माऊंटन डिव्हिजनने अभियंत्यांना शक्य तितक्या लवकर या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. रणनीतिकदृष्ट्या हा पूल महत्त्वाचा असल्याने, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जवानांनी अभियंत्यांना आवश्यक ती सुरक्षा प्रदान केली होती. मंगळवारी आणि बुधवारी रात्री अत्यंत कडाक्याच्या थंडीतही या पुलाचे बांधकाम सुरू होते.
 
 
माऊंटन डिव्हिजन तुकडीचे कमांडर मेजर जनरल अभिजित बापट 16 जून रोजी सकाळी पॅट्रोल पॉईंट 14 जवळ चिनी अधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी त्यांना पुलाच्या बांधकामातील प्रगतीची माहिती दिली. आता हा पूल बांधून पूर्ण झाला असून, वाहतूकही सुरू झाली आहे.
 
 
दरम्यान, श्योक नदीच्या पूर्वेला डीएसडीबीओ रस्त्याचे बांधकाम सुरू असून, त्यावरही चीनला आक्षेप आहे. या पूल आणि रस्त्यामुळे फक्त गलवान खोर्‍यातच नाही, तर उत्तर सेक्टरमध्येही भारतीय जवानांना सहजतेने हालचाल करता येणार आहे.