डिवचाल तर ठेचून काढू

    दिनांक : 18-Jun-2020
Total Views |
  •  शांतता हवी, पण प्रत्युत्तर देण्याचीही तयारी
  •  पंतप्रधान मोदी यांचा चीनला कठोर संदेश

india_1  H x W:
 
नवी दिल्ली : भारत हा शांतीप्रिय देश आहे, संघर्ष निर्माण व्हावा, अशी भारताची भूमिका कधीच राहिली नाही. शेजारील देशांसोबत सीमांवर शांतता असावी, यावरच आम्ही नेहमी भर दिला आहे. मात्र, कुणी आम्हाला डिवचले, तर ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. शत्रूंच्या कोणत्याही धाडसाला त्यापेक्षाही प्रखर भाषेत प्रत्युत्तर देण्याची आमची तयारी आहे, असा कठोर संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी चीनला दिला.
चीनला जोडणार्‍या सीमेवर संघर्षाची स्थिती निर्माण व्हायला नको, यासाठी माझ्या सरकारने नेहमीच प्रयत्न केले. दोन्ही देशांमधील मैत्रीचे संबंध जास्तीतजास्त मजबूत करण्यावर मी भर दिला आहे. सीमेवर शांतता हाच माझ्या सरकारचा मंत्र आहे. मात्र, सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात आमचे 20 जवान शहीद झाले. त्यांचे बलिदान कदापि व्यर्थ जाणार नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
 
 
कोरोनाविरोधी लढ्यातील अनेक मुद्यांवर विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा सुरू करण्यापूर्वी मोदी यांनी सीमेवरील या भीषण आणि धक्कादायक घटनेचा उल्लेख केला. यानंतर सर्व मोदी आणि या आभासी बैठकीत सहभागी झालेल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी दोन मिनिटे मौन धारण करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
 
 
आमच्यासाठी देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. त्यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही. जगातील मोठ्यातमोठ्या शक्तींसोबतही यासाठी दोन हात करण्याची आमची तयारी आहे. मतभेद आणि तणावाची स्थिती संघर्षात परिवर्तीत होणार नाही, याची काळजी आम्ही नेहमीच घेतली आहे. सीमेवर शांतता असेल, तरच कोणताही देश प्रगती करू शकतो. शांतता हाच आमचा मंत्र आहे आणि जगालाही आम्ही शांततेचाच संदेश दिला आहे. मात्र कुणी जर आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही कदापि शांत बसणार नाही. त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
 
 
शहीद जवानांचा देश नेहमीच ऋणी राहील : अमित शाह
मातृभूमीसाठी बलिदान देणार्‍या जवानांचा देश नेहमीच ऋणी राहील. त्यांचा त्याग कधीच विसरता येणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. सीमेवरील संघर्षात अनेक जवान जखमी झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे. या महान सुपुत्रांच्या कुटुंबीयांना मी वंदन करतो, असे अमित शाह यांनी टि्‌वटरवर म्हटले आहे.