काश्मिरात चार अतिरेक्यांचा खातमा

    दिनांक : 14-Jun-2020
Total Views |

army_1  H x W:  
 
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम आणि अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये चार अतिरेक्यांचा खातमा केला. यात अनंतनागमध्ये दोन आणि कुलगाममध्ये दोन अतिरेकी ठार झाले.
 
पुलवामातही चकमक झडली, पण अतिरेक्यांनी पळ काढला. त्यांचा शोध घेण्यासाठी जवानांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. पुलवामाच्या गुलाब बाग तिरल, कुलगामच्या निपोरा आणि अनंतनागच्या लल्लन भागात अतिरेकी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांनी ही कारवाई केली. अनंतनागमध्ये जवानांना पाहताच अतिरेक्यांनी गोळीबार केला. यावेळी झडलेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली.
कुलगामच्या निपोर भागातही जवानांनी दोन अतिरेक्यांना ठार केले. त्यांच्याजवळून शस्त्र व काही ग्रेनेड्‌स ताब्यात घेण्यात आले आहेत. या अतिरेक्यांची ओळख आणि त्यांच्या गटाची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही, असे प्रवक्ता म्हणाला. पुलवामाच्या गुलाब बाग तिरल येथील एका घरात तीन अतिरेकी लपले होते. मात्र, गोळीबार सुरू होताच अतिरेक्यांनी पळ काढला, असे प्रवक्त्याने सांगितले.
 
 
पाकी सैनिकांचा गोळीबार सुरूच
श्रीनगर : पाकिस्तानी सैनिकांनी संघर्षविरामाचे उल्लंघन सुरूच ठेवताना, आज पुन्हा जम्मू-काश्मीरच्या कमलकोट सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर बेछूट गोळीबार आणि तोफांचा मारा केला. भारतीय जवानांनीही याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. दुपारी उशिरापर्यंत दोन्ही बाजूंच्या बंदुका व तोफा सीमेवर आग ओकत होत्या. शुक्रवारी पाकी सैनिकांच्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला होता.