कोरोनाचे आर्थिक आव्हान !

    दिनांक : 14-Jun-2020
Total Views |
 
corona_1  H x W
 
- रवींद्र दाणी
एका राजदरबारातील एक घटना ! राज्यात मोठी चोरी झाली. तपासानंतर चोराला पकडून राजासमोर उभे करण्यात आले. चोराने चोरी कबूल केली. राजाने त्याला शिक्षा सुनावली. शिक्षेचे दोन पर्याय ठेवले. शंभर कांदे खाणे वा शंभर फटके ! चोराने विचार केला, शंभर फटके खाणे फार वेदनादायक होईल. चोराने शंभर कांदे खाण्याचा पर्याय निवडला.
 
10-15 कांदे खाल्ल्यावर चोर म्हणाला. नाही महाराज ! आता मला कांदे खाणे शक्य नाही. मला फटके मारा ! काही फटके खाल्ल्यावर चोर म्हणाला, महाराज ! फटके फार वेदनादायक ठरत आहेत. मला कांदेच द्या ! काही कांदे खाल्ल्यावर पुन्हा तेच ! महाराज ! कांदे खाणे शक्य नाही. मला फटकेच मारा ! असे करीत चोर 100 कांदे खातो आणि शंभर फटकेही ! कोरोना हाताळताना काही देशांची स्थिती अशीच होत आहे. कोरोना केसेस वाढू नये म्हणून या देशांनी लॉकडाऊन घोषित केला. मग अर्थव्यवस्था घसरु लागली. ती सांभाळण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. मग, कोरोना केसेस वाढू लागल्या. मग पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला. मग,पुन्हा अर्थव्यवस्था ढासळू लागली.
कोरोनाचा निप्पात !
 
ब्राझिल, अमेरिका, ब्रिटन ही याची उत्तम उदाहरणे आहेत. मात्र काही देशांनी स्पष्ट भूमिका घेतली. प्रथम कोरोनाचा निप्पात, मगच अर्थव्यवस्थेला हात !
 
मागील सोमवारी न्युझीलंडला अधिकृतपणे कोरोना मुक्त देश म्हणून घोषित करण्यात आले. ‘आज रात्री 12 पासून कोरोनामुळे घालण्यात आलेले सारे निर्बंध मागे घेण्यात येत आहेत‘ अशी स्पष्ट घोषणा करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंग नाही, एकत्र येण्यावर बंधने नाहीत. सारे काही पूर्ववत करण्यात आले. देशातील लॉकडाऊन लेव्हल 1 वर आणण्यात आला. म्हणजे आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सोडून सारे काही पूर्ववत करण्यात आले. आता या देशाची अर्थव्यवस्था जोमाने पुढे जात आहे. हेच जपानमध्ये झाले. कोरोना नियंत्रणात आणल्यावर जपान सरकारने अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले.
दुसरीकडे अमेरिकेत ‘ओपन अप अमेरिका‘ असा प्रचार राष्ट्रपती ट्रंप करीत आहेत आणि अमेरिकेतील काही राज्यांमध्ये कोरोना केसेस वाढत आहेत. म्हणजे अमेरिकेच्या एका भागात अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचे प्रयत्न होत आहेत आणि दुसर्‍या भागात लॉकडाऊनची तयारी होत आहे.
 
ब्राझिलचा कळस
 
ब्राझिल हा असाच एक देश आहे. ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी कोरोनाकडे लक्ष दिले नाही. आता तेथे कोरोनामुळे मृत होणार्‍यांचा सामुहिक दफनविधी करावा लागत आहे. ब्राझिलमधील मृतांचा आकडा अमेरिकेच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. ब्राझिलच्या आरोग्यमंत्र्यांनी हायड्रोक्लोरोक्विन वापरण्यास मंजुरी न दिल्याने तेथील राष्ट्रपतींनी एक नव्हे दोन आरोग्य मंत्र्यांना सरकारमधून बरखास्त केले. कोरोनाची चिंता करण्याचे कारण नाही असे सांगून तेथील राष्ट्रपती समुद्रविहाराचा आनंद घेत असल्याची छायाचित्रे प्रसिध्द होत आहेत. आता देशात कोरोनाच्या केसेस जणू कळस गाठीत आहेत.
रशियातील कोरोना केसेस वाढत असताना, तेथील लॉकडाऊन मागे घेण्यात आला. राष्ट्रपती पुटिन यांना राष्ट्रपतीपदाची आपली कारकीर्द वाढविण्याची चिंता येवून पडली आहे. त्यासाठी त्यांना रशियन घटनेत दुरुस्ती करावयाची आहे.यासाठी त्यांना जनमतसंग्रह करावा लागणार आहे. म्हणून त्यांनी लॉकडाऊन मागे घेण्याची घोषणा केली असल्याचे म्हटले जाते.
 
दुहेरी आव्हान
 
कोरोनाने सार्‍या जगासमोर दोन प्रकारचे आव्हान उभे केले आहे. एक आरोग्यविषयक आणि दुसरे आर्थिक ! ही दोन्ही आव्हाने प्रत्येक देशाला हाताळावयाची आहेत. कोरोना फार काळ चालणार नाही असे तज्ञांना वाटते. कोरोनाचा जोर काही काळात कमी होईल असा आशावाद तज्ञांना वाटत आहे. दरम्यानच्या काळात कोरोना लस बाजारात येईल असे मानले जाते. जगभरातील शास्त्रज्ञ त्यावर काम करीत आहेत. कोरोना लसीची सर्वाधिक चिंता राष्ट्रपती ट्रंप यांना सतावित आहे. नोव्हेंबर महिण्यात अमेरिकेत राष्ट्रपतिपदाची निवडणुक होत असून, त्यापूर्वी ही लस बाजारात यावी यासाठी त्यांनी लाखो डॉलर - लस तयार करणार्‍या काही कंपन्यांना दिले आहेत. कोरोनाची लस बाजारात येण्या, न येण्यावर त्यांचा विजय अवलंबून आहे. सध्या तरी ते राष्ट्रपतिपदाच्या स्पधैत माघारले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोसेफ बायडन यांना जनमत चाचण्यांमध्ये मोठी आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे उध्वस्त झालेली अमेरिकन अर्थव्यवस्था तेथील एक मोठा मुद्या ठरत आहे. ही स्थिती सार्‍या जगात राहणार आहे. कोरोनामुळे जगात मोठी मंदी आली आहे व येणार आहे. नव्या नोकर्‍या मिळणे तर सोडाच असलेल्या नोकर्‍या जात आहेत. एमिराटस या जगातील मोठ्या विमान कंपनीने नोकर छटनीची घोषणा केली आहे.4300 पायलट व 22000 हजार हवाई सुंदर्‍या यापैकी एक तृतीयांश कर्मचार्‍यांना घरी पाठविण्यात आले आहे. कोरोनाचा फटका विमान कंपन्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. अमेरिकन, डेल्टा, युनायटेड या अमेरिकन विमान कंपन्यांना सरकारने मोठे पॅकेज दिले आहे. त्यामुळे त्या सध्या तग धरुन आहेत.
 
कोरोना युध्दात- अमेरिका,चीन, ब्रिटन, रशिया, फ्रान्स हे बिग ब्रदर्स पार थंडावले आहेत. आणि दोन महिला राष्ट्रप्रमुखांना आयर्न लेडी म्हणून गौरविले जात आहे. ब्रिटनच्या इतिहासात श्रीमती मार्गारेट थॅचर यांचा उल्लेख आर्यन लेडी म्हणून केला जात असे. जेव्हा केव्हा कोरोनाचा इतिहास लिहीला जाईल, न्युझीलंडच्या पंतप्रधान श्रीमती अर्डेन व जर्मनीच्या चान्सलर श्रीमती मकैल यांचे नाव आर्यन लेडी म्हणून आवर्जून लिहीले जाईल. श्रीमती मकैल यांचे कणखर नेतृत्व जर्मनीला तारक ठरले. श्रीमती मकैल यांनी काही बंधने शिथील केली असली तरी, चर्चमधील प्रार्थना, फुटबॉलचे सामने यावरील निर्बंधे 30 ऑगस्टपर्यंत राहतील असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
 
भारतालाही फटका
 
कोरोनामुळे जगात जी मंदीची लाट येत आहे, तिचा फटका भारतालाही बसला आहे. मुडीज या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने भारताचे मानांकन म्हणजे रेटिंग कमी केेले आहे. सुदैवाने एस अ‍ॅण्ड पी या दुसर्‍या संस्थेने मात्र ते कायम ठेवले आहे. 2020 च्या पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी 3.1 टक्के एवढा होता. तो 6-7 टक्के तरी असावयास हवा होता. आता दुसर्‍या तिमाहीत तर तो लॉकडाऊनमुळे अधिकच घसरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,अर्थमंत्री निर्मला सीतारांमन यांच्या अथक प्रयत्नांना यश यावे असे भारतीयांना वाटत आहे. पर्यटन, विमान, रेल्वे, लहान, मोठे दुकानदार, वेगवेगळ्या सेवा देणार्‍या संस्था यांचा आर्थिक गाडा विस्कळीत झाला आहे. याचा परिणाम केंद्र सरकारला मिळणार्‍या उत्पन्नावर झाला आहे. याचा दुसरा परिणाम केंद्राकडून राज्यांना दिला जाणार्‍या उत्पन्नावर होत आहे. दिल्ली सरकारजवळ तर आपल्या कर्मचार्‍यांना वेतन देण्यासाठी पैसेही शिल्लक राहिेलेले नाहीत. कारण, सारेच व्यवहार बंद असल्याने सरकारच्या तिजोरीत पैसा येणे बंद झाले. पण, अशा विपरित स्थितीतच तर नेतृत्वाची परिक्षा होत असते. दुसर्‍या महायुध्दात ब्रिटनची दुर्गती होत असताना, विन्स्टन चर्चिल यांना पंतप्रधान करण्यात आले. सारे काही ब्रिटनच्या विरोधात होते. बिटीश सैनिकांना माघार, माघार आणि माघार घ्यावी लागत होती.पण, चर्चिल यांनी असामान्य नेतृत्वक्षमता दाखवित ब्रिटनला पराभवाच्या दाढेतून बाहेर काढले आणि हिटलरला मात दिली. अशीच कामगिरी अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजावतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.