कर्नाटकात ५वी पर्यंत ऑनलाईन शिक्षण बंद

    दिनांक : 13-Jun-2020
Total Views |
 
Online Education_1 &
 
बंगळुरु : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा, कॉलेज बंद आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण सर्वत्र सुरू करण्याचा निर्णय होताना दिसतोय, ऑनलाईन शिक्षणाबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला असला तरी यासंदर्भात कर्नाटक राज्याच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.
 
 
दरम्यान कर्नाटक राज्याच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे तसेच एलकेजी-युकेजीचेही ऑनलाईन क्लासेस, शिक्षण ऑनलाईन घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. खाजगी शाळांना ई क्लासेससाठी फी आकारता येणार नाही. ऑनलाईन क्लासेससाठी सर्वांकडेच तशाप्रकारच्या सुविधा असतील असे नाही. अशा लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यास थांबू नये, याकरता प्रयत्न केले जाणार असून त्याबाबतचे सर्व मार्गदर्शक तत्व लवकरच जाहीर केले जाणार आहेत.
 
 
कर्नाटकचे शालेय शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी ट्विट करुन पाचवीपर्यंतचे ऑनलाईन क्लासेस बंद असतील असे सांगितले आहे. तसेच अनौपचारीक चर्चेत काही कॅबिनेट मंत्र्यांनी सातवीपर्यंत बंद करण्याचा प्रस्ताव देखील मांडला होता. मात्र तो निर्णय अद्याप झालेला नाही, असंही त्यांनी सांगितले आहे.
 
 
१ ली ते ५ च्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण रद्द
सुरेश कुमार यांनी सांगितल्यानुसार, शासकीय, खासगी, अनुदानीत व विनाअनुदानित शाळांतील पहिली ते पाचवीच्या वर्गातील मुलांचे ऑनलाईन शिक्षण सरकारने रद्द केले आहेत. राज्यात बालवाडी, उच्च बालवाडी आणि प्राथमिक वर्ग वर्गातील विद्यार्थ्यांसाठी लाइव्ह व्हर्च्युअल वर्ग घेता येणार नाहीत. यासोबतच लहान मुलांना ऑनलाईन शिक्षण दिल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील शाळांना सुट्टी असली तरी अनेक खासगी व सरकारी शाळांकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. तर कर्नाटक शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोज विविध विषयाची ऑनलाईन वर्ग देखील सुरू केले आहेत.
 
 
६ वर्षांपर्यंतच्या मुलांनी जास्त वेळ स्क्रिन बघणं धोकादायक
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सने ६ वर्षाखालील मुलांसाठी ऑनलाईन क्लासेस चांगले नसल्याचा अहवाल दिला आहे. त्याचा हवाला मंत्री सुरेशकुमार यांनी दिला आहे. दरम्यान ६ वर्षांपर्यंतच्या मुलांनी रोज एक तासापेक्षा जास्त वेळ स्क्रिन बघणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करुन माध्यमिक शाळांसाठीचे ऑनलाईन क्लासेस सुरु असतील असं त्यांनी म्हटले आहे.