क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी कोरोनाबाधित

    दिनांक : 13-Jun-2020
Total Views |
 

Shahid Afridi Corona_1&nb 
 
इस्लामाबाद : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीला ’कोरोना’ची लागण झाली आहे. खुद्द आफ्रिदीनेच आपण ’कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे.प्रकृती बिघडल्यामुळे शाहीद आफ्रिदीने ’कोरोना’ चाचणी केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा, असे आवाहन आफ्रिदीने ट्विटरवरुन केले.
 
 
गुरुवारपासून माझी तब्येत ठीक नव्हती; माझे अंग खूप दुखत होते. माझी चाचणी घेण्यात आली आहे आणि दुर्दैवाने मी कोविड पॉझिटिव्ह निघालो. प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी यासाठी तुमच्या प्रार्थना आवश्यक आहेत, इंशाअल्लाह’ असे ट्वीट शाहीद आफ्रिदीने केले आहे.
 
 
पाकिस्तानात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासूनच आफ्रिदी पाकिस्तानमधील गरीब आणि गरजू नागरिकांना सतत मदत करत होता. धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जाणारा शाहीद आफ्रिदी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतो. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर सेकंड इनिंगमध्ये आपल्या बेधडक वक्तव्यांमुळेही तो चर्चेत राहिला आहे.
आफ्रिदीने यापूर्वी काश्मीर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त भाष्य केले होते, त्यानंतर भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांच्याशी संबंध तोडले.
 
 
क्रिकेट कारकीर्द
४० वर्षीय शाहीद आफ्रिदीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत चढउतार राहिले आहेत. फॉर्म न गवसल्यामुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ताही दाखवण्यात आला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत ३९८ वनडे, ९९ टी२० आणि २७ कसोटी सामने खेळले. आफ्रिदीने (४७६) तीनही आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये ख्रिस गेल (५३४) नंतर सर्वाधिक षटकार लगावले आहेत.