जुलै-ऑगस्टमधील क्रिकेटचे टीम इंडियाचे दोन दौरे रद्द

13 Jun 2020 15:03:32
 
India Team_1  H
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेला धोका लक्षात घेता श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौर्‍यावर भारतीय क्रिकेट संघ जाणार नसल्याचे जाहीर केले. २४ जून जूनपासून भारतीय संघ श्रीलंका दौर्‍यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार होता. तर त्यानंतर २२ ऑगस्टपासून नियोजित असलेल्या झिम्बाब्वे दौर्‍यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता. हे दोन्ही दौरे लांबणीवर टाकण्यात येतील अशी शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात येत होती, पण आता हे दोनही दौरे बीसीसीआयने रद्द केले आहेत.
 
१७ मे रोजी बीसीसीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, मैदानातील परिस्थिती क्रिकेटसाठी अनुकूल आणि सुरक्षित असल्यानंतरच वार्षिक कराराअंतर्गत बांधिल असलेल्या खेळाडूंसाठी बीसीसीआय क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करेल. आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत क्रिकेट पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यासाठी बीसीसीआय कटिबद्ध आहे, पण कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार तसेच इतर संबंधित संस्थांनी केलेल्या प्रयत्नांना धोकादायक ठरणारा कोणताही निर्णय बीसीसीआय घेणार नसल्याचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0