तोयबाचे अमली पदार्थ, शस्त्रास्त्र तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त

    दिनांक : 12-Jun-2020
Total Views |
-काश्मीर, पंजाबमध्ये पाच अतिरेक्यांना अटक
- काश्मीरमध्ये 21 किलो हेरॉईन, 1.34 कोटींची रोकड, पंजाबमध्ये शस्त्रसाठा जप्त
 

toyba_1  H x W: 
 
श्रीनगर/चंदीगड : काश्मिरातील दहशतवाद पोसण्यासाठी लागणारा पैसा अमली पदार्थांच्या तस्करीतून उभारायचा आणि सजग सुरक्षा दलामुळे काश्मिरातील हालचालींवर निर्बंध येत असल्याने येथील दहशतवादी कारवायांसाठी आवश्यक शस्त्रांची तस्करी पंजाबमधून करण्याचा लष्कर-ए-तोयबाचा प्रयत्न उधळण्यात आला. काश्मीरमध्ये तीन, तर पंजाबमध्ये दोन अतिरेक्यांना अटक झाल्याने लष्कर-ए-तोयबाचे अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र तस्करीचे रॅकेट आज गुरुवारी उद्ध्वस्त झाले आहे.
गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे पाक पुरस्कृत अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त झाले, असे अधिकार्‍याने सांगितले. अब्दुल मोमिन पीर, इस्लाम उल्‌ हक पीर आणि सईद इफ्तेखार इंद्राबी, अशी अटक केलेल्या तीन अतिरेक्यांची नावे असून, ते हंडवारा येथील रहिवासी आहेत.
 
 
या अतिरेक्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या 21 किलो हेरॉईनचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मूल्य 100 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. 1.24 कोटी रुपयांच्या रोख रकमेसह नोटा मोजण्याची मशीन देखील जप्त करण्यात आली. या रॅकेटमधील इतर सदस्यांची ओळख पटली असून, त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
 
अटक केलेले तिनही अतिरेकी पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाच्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात होते. त्यांच्या आदेशावरूनच हे अमली पदार्थांची तस्करी करायचे. या व्यतिरिक्त ते लष्करच्या सक्रिय अतिरेक्यांना आर्थिक रसदही पुरवायचे. या प्रकरणी हंडवारा पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरेकी संघटना, कट्टरवादी, तस्कर आणि देशविरोधी तत्त्वांमधील संबंधांची चौकशी करून त्यांची पाळेमुळे खोदण्यासाठी विशेष चौकशी पथकाची स्थापना करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
 
दरम्यान, पंजाब पोलिसांनी पठाणकोट येथे कारवाई करीत काश्मिरात शस्त्रास्त्र तस्करी करण्याचा लष्कर-ए-तोयबाचा प्रयत्न उधळला. खोर्‍यात शस्त्र नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या लष्करच्या दोन अतिरेक्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आमिर हुसेन वानी आणि वासिम हसन वानी, अशी अटक केलेल्या अतिरेक्यांची नावे असून, ते शापियॉं जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या ताब्यातून एक एके-47 रायफल, दोन मॅग्झिन, 60 गोळ्या जप्त करण्यात आल्या.
 
 
स्वयंचलित शस्त्र आणि ग्रेनेडची ते पंजाबमधून काश्मिरात तस्करी करायचे. पठाणकोट पोलिसांनी अमृतसर-जम्मू महामार्गावर एक ट्रक पकडून हा शस्त्रसाठा जप्त केला. जम्मू-काश्मीरचा माजी पोलिस हवालदार इशफाक अहमद दार उर्फ बशिर अहमद खान याच्याकडील शस्त्रे काश्मिरात नेण्याची जबाबदारी दिली होती, असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी दिली. इशफाक दार हा लष्करचा काश्मिरातील सक्रिय अतिरेकी आहे. तो 2017 पासून बेपत्ता होता, असेही त्यांनी सांगितले.
 
 
या पूर्वी पंजाबमधून हवाला माध्यमातून आलेले 20 लाख रुपये काश्मीरमध्ये नेण्याचे आदेश पाकिस्तानातील तोयबाच्या मोठ्या नेत्यांनी दिले होते. हे आदेश सध्या तुरुंगात असलेल्या रमीझ राजा या अतिरेक्याच्या माध्यमातून देण्यात आले होते, अशी कबुली या अतिरेक्यांनी दिली आहे.
 
 
अमृतसर येथे अज्ञातांनी सोपवली शस्त्रे
अमृतसरमधील भाजीबाजाराजवळ असलेल्या मकबूलपुरा मार्गावर आम्हाला अज्ञात लोकांनी शस्त्रे सोपवली. अमृतसर भाजीबाजारातून भाजीपाला आणि फळे ट्रकमध्ये लादून त्यातच शस्त्रास्त्रे लपवली जायची, असे दिनकर गुप्ता यांनी सांगितले.
 
हिजबुलच्या अतिरेक्यांनाही नेले काश्मिरात
यापूर्वी एका फेरीत हिजबुल आणि लष्करच्या दोन शस्त्रसज्ज अतिरेक्यांना काश्मीरमध्ये नेले होते. पण, या दोन्ही अतिरेक्यांचा सुरक्षा दलाने खातमा केला आहे.
 
गुप्तचर यंत्रणांनी दिला होता इशारा
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा पंजाब सीमेवरून शस्त्रास्त्र तस्करी आणि अतिरेक्यांची घुसखोरी करीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. आमिर आणि वासिमच्या अटकेमुळे पाकिस्तान पंजाबमधून अतिरेक्यांची घुसखोरी आणि शस्त्रांची तस्करी करीत असल्याचे आता स्पष्ट झाले.
 
एका अतिरेक्याला अटक
बडगाम जिल्ह्यात झडलेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलाने एका अतिरेक्याला अटक केली. मध्य काश्मिरातील पठाणपुरा येथे अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने या परिसराला वेढा घातला. सुरक्षा दलाने घेरल्याचे लक्षात येताच अतिरेक्यांनी जोरदार गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर शोध मोहिमेदरम्यान एका अतिरेक्याला अटक करण्यात आली. या अतिरेक्याकडून एक चिनी पिस्तूल, एक ग्रेनेड, एके-47 रायफलींचे सहा मॅग्झिन्स आणि 147 गोळ्या जप्त करण्यात आल्या. या अतिरेक्याला चकमक परिसरातून अथवा वेढा घातलेल्या परिसरातून अटक करण्यात आली, हे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले नाही.