धक्कादायक; कोरोना संक्रमितांच्या यादीत भारत जगात चौथ्या स्थानावर

    दिनांक : 12-Jun-2020
Total Views |
 
corona_1  H x W
 
नवी दिल्ली :  गेल्या २४ तासातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता भारत युनायटेड किंगडमला मागे टाकत सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. सलग नऊ दिवस दहा हजारांच्या आसपास वाढणारी संख्या शुक्रवारी ११ हजारांच्या जवळ पोहोचली आहे.
 
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात देशात १० हजार ९५६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या २४ तासात ३९६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २४ तासात सर्वाधिक मृत्यू आणि नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
 
देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या तीन लाखांच्या जवळ पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत २ लाख ९७ हजार ५३५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १ लाख ४७ हजार १९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर उपचार घेण्याऱ्या रुग्णांपेक्षा ही संख्या जास्त आहे. सध्या १ लाख ४१ हजार ८४२ जणांनर उपचार सुरू आहेत. तर ८,४९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
 
भारतामध्ये १ लाख लोकसंख्येमागे ०.५९ मृत्यू झाले असून जगभरातील हे सर्वात कमी प्रमाण आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ४९.२१ टक्के झाले असून ते बुधवारी ४८.३७ टक्के होते. उपचाराधीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या गुरुवारीही जास्त होती.
 
 
एका संकेतस्थळाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या घरात पोहचली आहे. गेल्या आठवड्यात स्पेनला मागे टाकत भारत पाचव्या स्थानावर पोहचला होता. ही गोष्ट भारतासाठी अत्यंत चिंताजनक असल्याची बाब समोर येत आहे. तर अमेरिका, ब्राझील, रशियामध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्येत सतत झपाट्याने वाढ होत आहे.