कोरोनाबाधितांमध्ये भारत पाचव्या स्थानावर

    दिनांक : 11-Jun-2020
Total Views |
 एकूण संक्रमितांची संख्या 2 लाख 46 हजार 628

Corona_1  H x W 
नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत 9,971 नवे रुग्ण सापडल्यामुळे देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 2 लाख 46 हजार 628 झाली आहे. यामुळे जगातील सर्वाधिक कोरोना प्रभावित देशांच्या यादीत भारत पाचव्या स्थानावर आला आहे.
 
 
287 नव्या मृत्युमुळे देशातील मृतांचा आकडाही 6,927 वर पोहोचला आहे. मृतांपैकी 80 टक्के देशातील सर्वाधिक कोरोना प्रभावित 26 जिल्ह्यांतील आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद शहरांत कोरोना बळींची संख्या सर्वाधिक आहे. 1 लाख 19 हजार 293 लोक पूर्ण बरे झाले आहेत. बरे होण्याची टक्केवारी 48.36 आहे. 1 लाख 20 हजार 406 संक्रमितांवर उपचार सुरू आहेत.
 
 
एका दिवसात सर्वाधिक म्हणजे 9,971 नवे बाधित सापडण्याचा हा पहिला प्रसंग आहे. रुग्ण वाढीचा दर असाच कायम राहिला, तर भारत तीन-चार दिवसांत चौथ्या स्थानावरील ब्रिटनलाही मागे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
देशात सर्वाधिक म्हणजे 82,928 संक्रमित महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील कोरोना बळींची संख्या 2969 वर पोहोचली आहे. 30,152 संक्रमितांच्या संख्येमुळे तामिळनाडू देशात दुसर्‍या स्थानावर आहे. मात्र, राज्यातील कोरोनाबळींची संख्या अतिशय कमी म्हणजे 251 आहे. दिल्लीत 27,654 संक्रमित असून, बळींचा आकडा 761 झाला आहे. चौथ्या स्थानावरील गुजरातमध्ये 19,592 संक्रमित असून, मृतांचा आकडा 1,219 झाला आहे. मृतांच्या आकड्यात गुजरात देशात दुसर्‍या स्थानावर आहे.