तरुणांनी नोकरीच पाहिजे ही मानसिकता बदलून स्वयंरोजगाराची कास धरावी - पालकमंत्री गुलाबराव पाटील

    दिनांक : 13-Feb-2020

शासकीय योजनांच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

 

gulabrav pic_1   


जळगाव, 13: नोकरीच मिळाली पाहिजे ही जी तरुणांची मानसिकता आहे. त्यामध्ये बदल करुन नोकरी मागणारे नाही तर स्वयंरोजगाराच्या माध्यमातून नोकरी देणारे बना. याकरीता शासन आपल्या पाठिशी भक्कमपणे उभे आहे. असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

 
 

येथील के. सी. ई. सोसायटीच्या मैदानावर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, याकरीता जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या मेळाव्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. रंजनाताई पाटील, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर सौ. भारतीताई सोनवणे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधि‍कारी तथा मुद्रा बॅक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, के. सी. ई. सोसायटीचे सदस्य डी. टी. पाटील मान्यवर उपस्थित होते.

 
 

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, पूर्वीच्याकाळी व्यवसाय कोणता निवडावा, त्यासाठी लागणारे भांडवल कोठून उभे करावे.यासाठी कोणीही मार्गदर्शन करीत नसे. तशा व्यवस्थाही निर्माण झालेल्या नव्हत्या. परंतु आता मुद्रा योजनेच्या मेळाव्यांच्या माध्यमातून शासन आपल्यापर्यंत पोहचून अर्थसहाय्य करण्यास तयार आहे. तेव्हा सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता आपला व्यवसाय निवडावा. रोजगार निर्मितीचे स्वप्न बघा, बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी ठेवल्यास आपणास नावलौकीक प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. व्यवसाय केल्यामुळे आपल्याला आपल्या जीवनाचे स्वातंत्र्य उपभोगता येते असे सांगून व्यवसाय करताना आपली पत, प्रतिष्ठा जपण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

 
 

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले, तरुणांनी आपाल्या भागात जे व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू शकतात त्यांची निवड करावी. उद्योग, व्यवसायासाठी बँकाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. अर्थसहाय्यासाठी कोणाची अडवणूक होत असेल तर तसेही कळवावे. त्याचबरोबर लघु उद्योजकांनी आपल्या उत्पादनाचा दर्जा चांगला ठेवला तर त्याची विक्री वाढते ही बाब लक्षात घेउन उत्पादनाचा दर्जा चांगला राहण्यासाठी प्रयत्नशील रहावे. तसेच याप्रकारचे मेळावे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार असून सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी व लघु उद्योजकांनी या मेळाव्यास उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांची माहिती करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 
 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, तरुणांनी शिक्षण घेतांना परिक्षेतील मार्कांबरोबरच व्यावहारिक ज्ञान महत्वाचे आहे हे जाणून ज्ञान आत्मसात करावे. यावेळी महापौर भारतीताई सोनवणे यांनीही तरुणांनी व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन केले. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी सुनील पाटील, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक श्रीकांत झांबरे,

 
 

या मेळाव्याच्या ठिकाणी शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्र, आदिवासी विकास विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, कौशल्य विकास विभाग, महिला व बालविकास, विविध राष्ट्रीयकृत बँका तसेच शासनाचे अंगिकृत व्यवसाय असलेली विविध विकास महामंडळांचे स्टॉल लावण्यात आले होते. मेळावा यशस्वी होण्यासाठी जिल्हास्तरीय मुद्रा योजना समन्वय समितीचे सदस्य जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक अरुण प्रकाश, जिल्हा नियोजन कार्यालयातील लेखाधिकारी श्री. सोनार, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी श्री. शिरसाट, पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त श्री. गायकवाड, श्री. जोशी, श्री. सुर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
 

या मेळाव्यास शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध महाविद्यालयातील तरुण, तरुणी, सुशिक्षित बेरोजगार, लघु उद्योजक आदि मोठया संख्येने उपस्थित होते.

 
 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती राणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी मानले.