व्यवसायाला विश्‍वासाची जोड, म्हणूनच डॉ.विल्सन फार्मा बनले अजोड

    दिनांक : 07-Oct-2020
Total Views |
डॉ.विल्सन फार्माचे संचालक लखीचंद जैन यांनी ‘तरूण भारत’ भेटीत सांगितला यशाचा मंत्र

jain 1_1  H x W
 
 
जळगाव : कुठल्याही व्यवसायात ग्राहकांचा विश्‍वास संपादन करणे महत्त्वाचे असते. ते एकदा साधले की, मग आयुष्यात कशाचीच कमतरता भासत नाही. कारण आपल्या गरजेएवढा पैसा रितसर मार्गाने आपल्याला मिळू शकतो. औषध विक्री सारख्या क्षेत्रात तर प्रसंगी मागू ती किंमत द्यायला लोक तयार असतात. मात्र अशा लोकांचे तळतळाट घेण्यापेक्षा न्यायोचित मार्गाने घरात येणारा पैसाच खरे समाधान आणि आनंद देऊन जीवनात प्रगतीचा मार्ग दाखवू शकतो, अशा शब्दात डॉ. विल्सन फार्माचे संचालक लखीचंद जैन यांनी केमिस्ट, हॉटेलिंग आणि रियल इस्टेट आदी क्षेत्रातील आपल्या यशाचे सूत्र उलगडून दाखवले. बुधवारी त्यांनी ‘तरुण भारत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी सहकार्‍यांशी ते बोलत होते.
ते मूळ रहिवाशी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील असून १९९६ मध्ये जळगावला आले. बी.फार्म आणि एम.बी.ए.ची पदवी घेतल्यावर त्यांनी जळगावला व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय हा जिनिंग अँड प्रेसिंगचा होता. मात्र वेगळा मार्ग म्हणून ते केमिस्ट झाले.
वडिलांचा आदर्श प्रमाण
वडिलांचा आदर्श होता की, कमाई करायची ती सचोटीने. तोच वारसा पुढे चालवत लखीचंद यांनी केवळ जळगाव जिल्हाच नव्हे तर नाशिक, बुलढाणा, औरंगाबाद येथेही आपला औषध विक्रीचा व्यवसाय सुरू करून आज ते एक ‘ब्रँण्ड’ बनले आहे. जळगावात त्यांची १५ आणि अन्य ठिकाणी १० अशी एकूण २५ औषधी विक्रीची दुकाने हा त्यांच्या प्रगतीचा आलेख ठरावा. त्याबाबत सांगतांना ते म्हणाले की, पूर्वी त्यासाठी मी १६-१६ तास काम करायचो. आता केवळ आठ तास काम केले तरी भागते. उर्वरित वेळ मग कुटुंबियांसाठी व सामाजिक कार्यासाठी देतो. या सर्व दुकानातील कामकाज पाहण्यासाठी ११० कर्मचारी असून ते आज घरातील एक सदस्यच बनले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होतानाच त्यांच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठीही मदत करीत असल्याने आजवर कुणीही काम सोडून गेले नसल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

jain 2_1  H x W 
 
कोरोनाने शिकवला धडा
कोरोना काळात मुबलक पैसा मिळविण्याची संधी होती, पण वडिलांच्या आदर्शावर चालत असल्याने आम्ही मात्र योग्य दरातच औषधे, इंजेक्शन दिल्याचे सांगून ते म्हणाले की, कोरोनाने आपल्याला आयुष्याची किंमत शिकविली आहे. त्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील ग्रामस्थांची अडचण दूर करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात १०० किराणा कीट वितरीत केले. त्यावेळी ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर कृतज्ञतेचा जो भाव होता त्यामुळे आपले जीवन सफल झाल्यासारखे वाटले. याच काळात मुंबईकडून येणार्‍या स्थलांतरीत कामगारांनासुध्दा अशीच मदत करण्यात आली. तसेच शिवकॉलनीतील अनाथाश्रम आणि वृध्दाश्रमातही जिल्हा केमिस्ट असो.च्या मदतीने लागणारी औषधे मोफत पुरविली आहेत. तसेही जैन समाज बांधव अन्नदान आणि सामाजिक कार्यात आघाडीवर असतात, त्याचे चांगले दर्शन या काळात घडले, असे ते म्हणाले.
विश्‍वासास ठरलो पात्र
कोरोनाच्या काळात शासनाकडून येणार्‍या औषधांचा साठा आणि त्याचे सुयोग्य वितरण याची जबाबदारी आमच्यावर सोपविण्यात आली होती. हा आमच्यासाठी जेवढा आनंदाचा तेवढाच जबाबदारीचाही भाग होता. त्यामुळे सर्व हिशोब चोख राखण्याची खबरदारी घेतली होती. परिणामी, कुठेही गडबड न होता वितरण योग्य झाले आणि आमच्यावरील विश्‍वासाला पात्र ठरता आले, असेही ते म्हणाले. आम्ही कोरोनासाठीचे महत्त्वाचे ठरणारे रेमिडेसिव्हीर हे इंजेक्शन ठरलेल्या म्हणजे आयसीएमसीआरच्या निर्देशानुसार प्रत्येकी रू. ५४००/- प्रमाणे ६ इंजेक्शनला रू. ३२,४००/- असेच दिले. यात अवाजवी एक रूपयाही अधिक घेतला नाही. विशेष म्हणजे या इंजेक्शनची विक्री मी माझ्या उपस्थितीतच केली. त्यामुळे कुठलाही गैरप्रकार होण्याचा वावच ठेवला नाही. रूग्णांना रात्री-बेरात्री या इंजेक्शनची गरज भासल्यास ती त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी घरी जातांना मी काही इंजेक्शन सोबत न्यायचो असा अनुभवही त्यांनी सांगितला.
जी.एम.फाऊंडेशनमध्ये मेडिकल केले सुरू
जामनेर येथे जी.एम. फाऊंडेशनने सुमारे २०० बेड्स असलेले कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. तेथे रूग्ण सेवाही सुरू झाली आहे. मात्र ती अडचण लक्षात घेवून माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी येथे मेडिकलची व्यवस्था करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली, असे सांगून लखीचंद जैन म्हणाले की, ही जबाबदारी सर्वार्थाने खूप मोठी होती. कारण औषधांची व्यवस्था आणि रूग्णांना व्यवस्थित मिळणे आवश्यक होते. मी येथे जबाबदारी घ्यावी असे जिल्हा केमिस्ट असो.चे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनाही वाटत होते. सर्वांच्या आग्रहाने मी ही जबाबदारी स्वीकारली आहे. या व्यवसायातील २० वर्षांचा अनुभव आणि सर्व सहकार्‍यांचे लाभणारे सहकार्य लक्षात घेता येथे कुठलीही तक्रार असणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
शुध्द शाकाहारी ‘व्हेज अरोमा’
औषध विक्री व्यवसायाची आता व्यवस्थित घडी बसली असल्याने मी हॉटेल व्यवसायात प्रयत्न करतोय असे सांगून ते म्हणाले की, रिंगरोडवर चिरायू हॉस्पिटलच्या खाली ‘व्हेज अरोमा’ हे शुध्द शाकाहारी पदार्थांचे हॉटेल सुरू केलेय. २०१९ ला प्रारंभ केलेल्या या हॉटेलमध्ये स्वच्छता, चवदारपणा आणि गुणवत्ता यांना प्राधान्य दिले जाते. येथील कर्मचार्‍यांना आम्ही उत्तम वेतन देतो. त्यामुळे ते सुध्दा अत्यंत जबाबदारीने काम करतात. येथे ग्राहक ‘वेटींग’मध्ये असतात हे विशेेष.
पत्नीची आणि शालक पवन जैन यांची सदैव साथ
या सर्व उपक्रमात पत्नी प्रीती जैन आणि शालक पवन जैन यांची सदैव साथ असते असे सांगून ते म्हणाले की, खरे तर मी जळगावला येण्याचे मूळ कारणही पत्नीच आहे. तिलाही समाजकार्याची आवड असून धरणगावजवळील पिंपळेसिम येथील ५० लहान मुलांना दत्तक घेवून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे. आम्ही तेथे जावून औषधी, गरजू वस्तू आणि शैक्षणिक साहित्य दिले आहे आणि वर्षभर ते देणार आहोत. आपले स्वत:चे घर, छोटासा स्वत:चा व्यवसाय आणि एक गाडी असावी असे माझे स्वप्न होते. त्या तुलनेत परमेश्‍वराने मला भरभरून दिले आहे, अशी कृतज्ञताही त्यांनी शेवटी व्यक्त केली. या प्रवासात जिल्हा केमिस्ट असो.चे अध्यक्ष सुनील भंगाळे आणि सीए अनिल कोठारी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही लखीचंद जैन म्हणाले.
माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सचिव संजय नारखेडे यांनी ‘तरुण भारत’चे विशेषांक आणि ‘सेवाभावे उजळो जीवन’ हे पुस्तक देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘तरुण भारत’ मधील सहकारी उपस्थित होते.