परिश्रम, सचोटी अन् नम्रता हिच व्यवसायातील यशाची त्रिसूत्री

    दिनांक : 06-Oct-2020
Total Views |
व्यावसायिक आणि ‘भंगाळे गोल्ड’चे संचालक भागवतदादा भंगाळे यांचे ‘तरुण भारत भेटीत प्रतिपादन
 
bhan 1_1  H x W

जळगाव : कुठल्याही व्यवसायात प्रगती करण्यासाठी अनुभवासह परिश्रम, सचोटी आणि नम्रता या त्रिसूत्रीचा अवलंब करायला हवा. यांचा अवलंब करुन जी व्यक्ती आपला व्यवसाय करते त्यात ती नक्कीच यश मिळवू शकते, अशा शब्दात शहरातील प्रख्यात उद्योजक आणि ‘भंगाळे गोल्ड’चे संचालक भागवतदादा भंगाळे यांनी आपल्या यशाचे रहस्य सांगितले. ‘तरुण भारत’ कार्यालयाला मंगळवारी त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यानंतर सहकार्‍यांशी विविध विषयांवर आपली मते दिलखुलासपणे व्यक्त करताना ते बोलत होते.
 
भागवतदादा भंगाळे हे मूळचे चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील रहिवासी. त्यांचे वडिल गणपतराव भंगाळे हे नावाजलेले व्यक्ती होते. भागवतदादांना ज्येष्ठ बंधू रामदासजी, त्यानंतर डॉ. अर्जुनजी आणि कनिष्ठ बंधू शिवाजीराव अशी भावंडे असून या सर्वांचे एकमेकांशी नाते घट्ट आहे. भागवतदादा बी.ए.ची पदवी घेतलेले असून ते गावात कुस्तीमध्ये आघाडीवर होते. मात्र, कुस्तीमुळे कुठलाही अकारण वाद निर्माण होऊ नये म्हणून ते जळगावला आले आणि येथेच स्थायिक झाले.
 
परिवाराचे योगदान अन् सहकार्य
घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करण्याची संस्कृती परिवारात आहे. त्याचे प्रतीक म्हणून आम्ही सर्व डॉ. प्रकाश, शाम, सुनील, आणि विष्णू या पुतण्यांकडे बघतो. प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगळे जसे आहे तशीच त्यांची कार्यशैलीही वेगळी आहे. या सद्गुणांचा लाभ व्यवसायातही वेळोवेळी होतो, असे सांगत ते म्हणाले की, परिसरात कुठलाही समारंभ असल्यास त्यावेळी आम्ही परिवारातील सर्व सदस्य एकत्र येवून हातभार लावतो. या गोष्टीचा मला अभिमान असून आमच्या परिवाराचे उदाहरण अन्यजण देतात, तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो, असेही त्यांनी सांगितले.'
 
 
bhan 2_1  H x W
प्रारंभी एस.टी. महामंडळात नोकरी
१९७८ मध्ये जळगावला आल्यानंतर कै. सुधीरदादा सोनवणे यांनी त्यांना एस.टी.महामंडळात नोकरी लावून दिली. मात्र नोकरी हे ध्येय नसल्याने व्यवसाय करायचा की कसे असा विचार करीत असतांना अचानक कै. दिलीपअण्णा कोल्हे यांनी त्यांना एस.टी. स्टँण्ड शेजारी हॉटेल चालवण्यास सांगितले. ते सुरूही झाले. पुढे ती जागा सोडून सध्याच्या ‘रूपाली’ हॉटेल्सची निर्मिती झाली. त्यानंतर एका मागोमाग एक अशी हॉटेल्सची श्रृंखला सुरू झाली, असे सांगून ते म्हणाले, माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंचा सल्ला नेहमीच लाभदायी ठरला. समाज आणि परिवाराचे सहकार्य व मार्गदर्शनामुळे हॉॅटेल्स सिल्व्हर पॅलेससह ७ हॉटेल्सची मालकी आमच्या परिवाराकडे असल्याचा आनंद असल्याचे सांगून आता हा व्यवसाय हळूहळू कमी करण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले. मोठ्या भावांनी बर्‍याच आधी सुवर्ण व्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता. त्या प्रेरणेतूनच ‘भंगाळे गोल्ड’ ही सुवर्ण व्यवसाय करणारी पेढी प्रारंभ झाली.'
 
सुवर्ण व्यवसायात पारदर्शकता महत्त्वाची
सुवर्ण व्यवसायासाठी २०१७ मध्ये ‘भंगाळे गोल्ड’ नावाने भव्य शोरुम उभारण्यात आले. या व्यवसायात पारदर्शकता महत्त्वाची असते. त्याचे पहिल्या दिवसापासून पालन करीत व्यवहार केल्याने आमची विश्‍वासार्हता वाढली आणि व्यवसायही वाढला. ग्राहकांची कधीही दिशाभूल होवू न दिल्याने आज शहरात विश्‍वासू सुवर्ण व्यावसायिक म्हणून आम्ही ओळख निर्माण केली आहे. येथे येणार्‍या प्रत्येक ग्राहकाशी अत्यंत विनम्र व्यवहार केला जातो. त्याचे अधिकाधिक समाधान कसे होईल याची काळजी घेतली जाते. कारण दागिने खरेदी केल्यानंतर त्याची जी प्रतिक्रिया असते त्यातून आम्ही शिकत असतो. ग्राहक समाधानी असेल तर तो इतरांना तसे सांगतो. त्यामुळे त्याचा विश्‍वास टिकवून ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान असते. शोरुमची जबाबदारी सागर आणि आकाश हे दोन्ही मुले योग्य पद्धतीने सांभाळतात. सुवर्ण व्यवसायात अल्पावधीतच मिळालेल्या यशात लेवा पाटीदार समाज बांधवांसह अन्य बांधवांचाही मोलाचा वाटा असल्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, त्यांच्या विश्‍वासावरच मी यशस्वी होऊ शकलो. सावदा परिसरातील ग्राहकांच्या सततच्या मागणीमुळे येत्या काळात सावदा येथेही सुवर्ण व्यवसायासाठी भव्य शोरुम उभारण्याची इच्छा आहे. वर्षभरात ते ग्राहकांसाठी खुले होईल, असेही त्यांनी सांगितले.
हॉटेल सिल्व्हर पॅलेसने मिळविली ख्याती
हॉटेल व्यवसायातून मिळालेल्या अनुभवातून २००१ मध्ये हॉटेल ‘सिल्व्हर पॅलेस’ची निर्मिती केल्याचे सांगून ते म्हणाले की, या ठिकाणी चांगले सुरू असलेले हॉटेल सुमारे साडेतीन वर्षे व्यवसाय बंद ठेवून सिल्व्हर पॅलेसचे काम चालले. हे हॉटेल आम्हा सर्व कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्‍न होता. कारण शहरात अन्य मोठी आणि नावलौकीक प्राप्त हॉटेल्स होते. त्यामुळे व्यवसाय होईल की नाही अशी चिंता होती. परंतु कुटुंबियांचे पाठबळ आणि परिश्रम, सचोटी आणि नम्रता यांचे झालेले संस्कार यश मिळवून देईल असा विश्‍वास होता. तो फलद्रुप झाल्याचे समाधान खूप मोठे आहे. या हॉटेलमधील खोल्या कधीच रिकाम्या नसतात हे विशेष. येणार्‍या ग्राहकांची कुटुंबातील सदस्याप्रमाणे घेतली जाणारी काळजी, विनम्र व्यवहार आणि चविष्ट खाद्य पदार्थ यामुळे आम्ही ग्राहकांचा विश्‍वास संपादन करू शकलो, असेही ते म्हणाले. हॉटेल बांधतांना हॉटेल प्लाझाचे संचालक छत्रसेन लापसिया यांच्या सूचना आणि मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
येणार्‍या काळात सोन्याचा भाव कमी होणार ?
सध्या सोन्याचा पुरेसा साठा असल्यामुळे सोन्याचा आज भाव स्थिर आहे. भविष्यातही सोन्याचे भाव फार वाढणार नसून दिवाळीतसुद्धा ते अजून कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करून ते म्हणाले की, लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायांवर विपरित परिणाम होवून अनेकजण बेरोजगार झाले. मात्र त्याचा सुवर्ण व्यवसायावर फारसा बदल किंवा परिणाम झालेला दिसला नाही. त्याकाळातही ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल होता. तसेच सध्या अधिक महिना असल्यामुळे या महिन्यातही ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी असल्याचे ते म्हणाले.
 
चार प्राणघातक हल्ल्यातून बचावलो
व्यवसायासाठी हॉटेल हा चांगला पर्याय आहे, मात्र व्यावसायिक स्पर्धा आणि हेवेदावेही खूप आहेत. त्यामुळे हळूहळू या व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कारण अशाच स्पर्धेतून माझ्यावर चारवेळा प्राणघातक हल्ला झाला होता. मात्र, काम करण्याची चांगली वृत्ती आणि नम्रतेमुळे हा व्यवसाय आजवर सुरु ठेवल्याचे ते म्हणाले. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याशी माझा संबंध आला. त्यांचा अधिकार्‍यांवरील असलेला प्रभाव मी पाहिला आहे. विरोधी पक्षात असताना त्यांनी केलेले कार्य सर्वांना परिचित असून नाथाभाऊंसारखा राजकीय नेता यापुढे होणे अशक्य असल्याचेही ते म्हणाले. आ.सुरेश भोळे यांचा स्वभाव शांत असून ते प्रत्येक नागरिकांच्या कार्यात सहज सहभागी होतात. यामुळे त्यांचा सामान्यांपर्यंत संपर्क चांगला असून त्यांनी नागरिकांचा विश्‍वास जिंकला आहे, असेही भागवतदादा भंगाळे शेवटी म्हणाले.
‘माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठान’चे सचिव संजय नारखेडे यांनी ‘तरुण भारत’चे विशेषांक आणि ‘सेवाभावे उजळो जीवन’ हे पुस्तक देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘तरुण भारत’ मधील सहकारी उपस्थित होते.