आडगाव येथे वीजकोसळून दोन युवक ठार

    दिनांक : 17-Oct-2020
Total Views |
चोपड्यातही वीज पडून एकाचा मृत्यू , जिल्ह्यात तिघांचा मृत्यू
आडगाव, ता.एरंडोल : येथे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अवकाळी वादळी वार्‍यासह पाऊस झाला. याचदरम्यान वीज कोसळूनआडगाव येथील दोन युवक ठार झाले तर एक युवक जखमी झाल्याची घटना घडली.वीज कोसळून दोन युवकांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.तर चोपडा येथेही एकाचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत माहिती अशी,की आडगाव येथील उखर्डू पवार यांच्या ढोली शिवारातील शेतात त्यांची मुले महेंद्र उखर्डू पवार, जगदीश उखर्डू पवार आणि त्यांचा मित्र रवींद्र प्रभाकर महाजन हे कापूस वेचण्यासाठी गेले होते. तिघाही युवकांनी दिवसभर कापसाची वेचणी केली.सायंकाळी कापूस वेचणी झाल्यानंतर तिघेही युवक घरी जाण्याच्या तयारीत असतांना अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरु असल्यामुळे तिघेही युवक पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाच्या आडोशाला उभे असतांना अचानक जोरदार आवाज होऊन तिघांच्या अंगावर वीज कोसळली. यात महेंद्र उखर्डू पवार (वय २३) व रवींद्र प्रभाकर महाजन (वय २२) हे दोन युवक जागीच ठार झाले. जगदीश उखर्डू पवार हे गंभीर जखमी झाले. वीज कोसळल्याचा जोरदार आवाज झाल्यामुळे परिसरात शेतात काम करणारे शेतकरी व शेतमजुरांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.वीज कोसळून दोन युवक ठार झाल्याची घटना ग्रामस्थांना समजताच नागरिकांनी शेताकडे धाव घेतली आणि जखमी झालेल्या जगदीश पवार यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.
वीज कोसळून मयत झालेले दोन्ही युवक अविवाहित असून रवींद्र महाजन हा प्रभाकर महाजन यांचा एकुलता एक मुलगा होता. प्रभाकर महाजन यांनी मुलगा रवींद्र यास शेतात कापूस वेचणीसाठी जाण्यास विरोध केला होता. मात्र मित्राच्या शेतात मित्रांसोबत कापूस वेचण्यासाठी जात आहे असा अट्टाहास त्याने केला आणि सायंकाळी आपला जीव गमावून बसला. दरम्यान गावातील दोन युवक ठार झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत कासोदा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आडगाव येथे वीज कोसळून दोन युवक ठार झाल्यानंतर देखील रात्री साडेआठ वाजेपर्यंत शासकीय अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिलेली नसल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
चोपड्यातही वीज पडून एकाचा मृत्यू
चोपडा : येथील रामपुरा भागातील रहिवाशी दिपक भागवत पारधी (बागुल) (वय २९) हा चोपडा येथील नगरपालिका येथे पाणी पुरवठा विभागात तो कामाला होता. तो शनिवारी दुपारी रोजी शेळीना चारा खाण्यासाठी जंगलात गेला होता. परतीच्या पावसामुळे विजेच्या तांडवात वीज मयत दिपकच्या अंगावर पडली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील , दोन भाऊ, त्याचा दोघे भावाचा परिवार आहे. त्यांना पत्नी, दोन मुली आहेत.