शहरी बेघर निवारा केंद्राने निराधारांना दिला आत्मविश्‍वास

    दिनांक : 10-Oct-2020
Total Views |
‘केशवस्मृती‘च्या बेघर निवारा केंद्राचे प्रकल्प प्रमुख दिलीप चोपडा यांचे ‘तरूण भारत’ भेटीत प्रतिपादन
 
 
dilipji 1_1  H
 
जळगाव : शहर आणि परिसरात भटकणार्‍या बेघर व्यक्ती अन् भिकार्‍यांना निवारा लाभावा आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटावा म्हणून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या येथील शहरी बेघर निवारा केंद्रांच्या माध्यमातून एक चांगले काम उभे राहिले आहे. या केंद्राच्या माध्यमातून अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्‍वास जागविण्याचे जे काम प्रारंभ केले गेले, त्याला उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे प्रतिपादन नवीन बसस्थानकाजवळील शहरी बेघर निवारा केंद्राचे प्रकल्प प्रमुख दिलीप चोपडा यांनी ‘तरूण भारत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान केले.
 
१० ऑक्टोबर रोजी पाळण्यात येणार्‍या जागतिक बेघर निवारा दिनानिमित्त या समस्येसंदर्भात त्यांनी सहकार्‍यांशी मनमोकळा संवाद साधला. दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेंतर्गत असलेल्या या प्रकल्पाच्या संचालनाची जबाबदारी महापालिकेने ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’कडे सोपविली असून ती जबाबदारी दिलीप चोपडा पार पाडीत आहेत.
 
डॉ.अविनाश आचार्य दादांचा मूळ विचार
‘समाजावर आईसारखे निःस्वार्थ प्रेम करूया’ या केशवस्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. अविनाश आचार्य दादा यांनी घालून दिलेल्या सेवाभावाचे हे उत्तम उदाहरण ठरावे, असे सांगून ते म्हणाले की, ६० वर्षांवरील बेघर स्त्री-पुरुषांना आश्रय देणार्‍या या केंद्राचेही काही नियम आहेत. त्या शासकीय निर्देशानुसारच काम करावे लागते. हा प्रकल्प मूळ महानगरपालिके अंतर्गत असल्याने त्यांच्या सूचनांचेही पालन येथे काटेकोरपणे केले जाते. डॉ.आचार्य दादा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच सेवेचे हे व्रत स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
 
महिन्यातून दोनदा सर्वेक्षण
शहरात सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर राहत असलेल्या वृद्ध बेघरांचा शोध घेण्यासाठी महिन्यातून दोनवेळा सर्वेक्षण केले जाते, असे सांगून ते म्हणाले की, सर्वेक्षणादरम्यान योग्य आढळलेल्या व्यक्तींशी संवाद साधून, बोलून, त्यांची अडचण समजून घेवून आणि ते रस्त्यावर राहिले तर कसे असुरक्षित आहेत, याची जाणीव करून दिली जाते. त्यांनी केंद्रात येण्याची तयारी दर्शविली तर त्यासाठी व्यवस्था केली जाते. यासाठी शक्यतो रात्री सर्वेक्षण केले जाते. कारण दिवसभर इकडे-तिकडे फिरल्यावर रात्री ही सर्व मंडळी एकत्र येत असतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलणे सोपे होते. शिवाय यात कुणी व्यसनी असेल तर तसेही लगेच कळते. व्यसनी व्यक्तीला केंद्रात स्वीकारले जात नाही. तसेच मानसिक रुग्ण व्यक्तींनाही येथे प्रवेश न देता त्याची संबंधित यंत्रणेकडे व्यवस्था केली जाते. जानेवारी २०२० मध्ये या केंद्राच्या संचालनाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा या केंद्राची अवस्था अत्यंत वाईट होती. या इमारतीच्या बेसमेंट कचरा आणि घाणीचे साम्राज्य होते. ते सर्व स्वच्छ करण्यात बराच कालावधी गेला, तेव्हा कुठे आजचे स्वरूप दिसते. मार्च महिन्यात सुमारे ५२ स्त्री-पुरुष येथे होते, त्यामुळे संख्या ८२ वर गेली होती. आता ४० जणांना त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा व समुपदेशन करून त्यांना स्वतःच्या घरी पोहचविल्याचेही त्यांनी सांगितले.
 
dilipji 2_1  H
 
दिव्यांग, साठ वर्षांवरील व्यक्तींसाठीच मिळते शासकीय अनुदान
शहरी बेघर निवारा केंद्रात असणार्‍या साठ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींनाच शासनाच्या निर्देशानुसार केवळ भोजन आणि चहासाठी अनुदान दिले जाते. मात्र ज्यांचे वय साठ वर्षांपेक्षा कमी असेल आणि ते दिव्यांगही नसतील अशा व्यक्ती रस्त्यांवर भीक मागतांना आढळल्यास त्यांचीही व्यवस्था येथे आम्ही करतो. मात्र त्यासाठी स्वत: खर्च करावा लागतो. हे अधिक काळ शक्य नसल्याने सेवाभावी संस्था आणि व्यक्तींच्या आर्थिक सहयोगातून हा खर्च भागविण्याचा प्रयत्न केला जातो, असे सांगून ते म्हणाले की यासाठी सहृदयी दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
 
देणगीदारांनी मदतीचा हात द्यावा
बेघर निवारा केंद्रात येणार्‍या वृद्ध व्यक्ती या निरूपाय म्हणून नव्हे तर तात्पुरती सोय म्हणून यावेळी असा आमचा प्रयत्न असल्याचे सांगून ते म्हणाले की, मनातील भिकारी किंवा भिक्षेकरी ही वृत्ती निघून जावी आणि मी करू शकतो असा आत्मविश्‍वास त्यांच्यात यावा, यासाठी सर्वार्थाने प्रयत्न केले जातात. व्यक्ती स्वावलंबी व्हावी असा प्रयत्न असतो. मात्र रोजचा पोटापाण्याचा प्रश्‍न सुटला तरच तो इतर विचार करू शकतो हे लक्षात घेवून यांच्या मदतीसाठी देणगीदारांनी मदतीचा हात द्यावा. ही मदत वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, आई-वडिल आणि आप्तस्वकियांचे स्मृतिदिन तसेच विविध सण आणि समारंभांच्या निमित्ताने करता येईल. त्यामुळे अनुदानेतर अन्य खर्च यातून भागवता येवू शकेल. केंद्रात असलेल्या या बेघरांसाठी एक वेळच्या भोजनासाठी रुपये ३१००, सकाळच्या नाश्ता रु.११०१ आणि दोन वेळच्या चहासाठी रु. ५०१ असा मदतनिधीही स्वीकारला जातो. तसेच रु. २१०० देणगी दिल्यास स्नानाचा आणि कपडे धुण्याचा साबण, खोबरेल तेल, दंतमंजन आदी साहित्य या दात्यांच्या मदतीतून पुरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
 
समाजप्रवाहात आणण्याचा प्रयत्न
बेघर निवारा केंद्रात दाखल होणार्‍या व्यक्तींचे नियमित समुपदेशन करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासोबतच ते जे काम अधिक चांगले करू शकतात ते त्यांना सोपविले जाते. जेणेकरून ते अन्य अनुचित विचार करणार नाहीत. शारीरिक सक्षमतेनुसार ही निवड केली जाते. त्यांना व्यवसाय व काम करण्यासाठी केंद्राकडून प्रोत्साहित केले जाते. कोरोना महामारी काळात लॉकडाऊन असल्यामुळे येथील रहिवासी केंद्रात अडकून पडले होते. बाहेर जाणे शक्य नसल्याने त्यांना कामात गुंतवून ठेवण्यासाठी या केंद्राद्वारे आयुर्वेदिक ‘आयुष काढा’ची शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्मिती करण्यात आली. त्याची विक्रीही करण्यात आली. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी या काढ्याचा चांगला उपयोग झाला होता, असेही ते म्हणाले.
 
चार महिलांवर अंत्यसंस्कार
शहरी बेघर निवारा केंद्रातर्फे कोरोना महामारी काळात निवासी असलेल्या चार वृध्द महिलांवर अंत्यसंस्कारही करण्यात आला. त्यांच्या नातेवाईकांना बोलावून हे कार्य केंद्राच्यावतीने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलेे. निवारा केंद्रात केवळ जिवंतपणी आश्रयच नव्हे तर त्यांचा अंतिम विधीही पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडल्याचे दिलीप चोपडा यांनी स्पष्ट केले.
 
आरोग्याची विशेष काळजी
शहरी बेघर निवारा केंद्रांत वास्तव्यासाठी स्वीकारलेल्या व्यक्तींच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. त्यांची वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. तसेच मानसिक समस्या असल्यास मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचारही केले जातात. आरोग्याच्या समस्येनुसार त्यांच्यावर औषधोपचारही केले जातात. या केंद्रात आठ-आठ तासांची अशी एकूण २४ तास काळजीवाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे. काळजीवाहक या रहिवाश्यांच्या दैनंदिन सेवा-सुविधांकडे लक्ष पुरवितात, अशी माहितीही त्यांनी दिली.
 
निराधार व्यक्ती आढळल्यास केंद्राला कळविण्याचे आवाहन
रस्त्यावर कुणालाही एखादी निराधार, वृद्ध, दिव्यांग व्यक्ती आढळली तर त्यांनी याबाबत शहरी बेघर निवारा केंद्रास सूचित करण्याचे आवाहनही प्रकल्प प्रमुख दिलीप चोपडा यांनी शेवटी केले. या व्यक्तीही समाजाचा घटक असल्याने त्यांच्या कल्याणाकडे समाजाने थोडेसे लक्ष देण्याची गरज असल्याची कळकळीची विनंतीही त्यांनी केली. ‘माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठान’चे सचिव संजय नारखेडे यांनी ‘तरुण भारत’चे विशेषांक आणि ‘सेवाभावे उजळो जीवन’ हे पुस्तक देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘तरुण भारत’ मधील सहकारी उपस्थित होते.