थंडी, अवकाळी पाऊस आणि आम्ही!

    दिनांक : 02-Jan-2020
नागपूर-विदर्भात अचानक थंडीची लाट आली आहे. लोकांना हुडहुुडी भरली आहे. जिकडेतिकडे या थंडीचीच चर्चा आहे. थंडीसोबतच अवकाळी पाऊसही आला आहे आणि या पावसाने रबी पिकांचीही नासाडी केली आहे. यंदा आधीच ओला दुष्काळ पडल्याने शेतकर्‍यांच्या हातून खरिपाची पिकं गेलीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सरकारने कर्जमाफीची घोषणाही केली. ही कर्जमाफी शेतकर्‍यांना तारेल की नाही, याची काहीच शाश्वती नसताना, आता डिसेंबर-जानेवारी महिन्यात आलेल्या पावसाने गहू, हरबरा आणि अन्य पिकांची प्रचंड नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल होणे स्वाभाविक आहे. परंतु, ही थंडी का आली, अवकाळी पाऊस का आला, याची कारणं स्पष्ट आहेत. जागतिक तापमानात, हवामानात जे बदल झाले आहेत, त्याचा फटका भारतालाही बसतो आहे. जगभरात पर्यावरण संरक्षणाकडे जे दुुर्लक्ष होते आहे, त्याचे परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागत आहेत.
 

ol_1  H x W: 0  
 
भारतात मोठ्या प्रमाणात होत असलेली जंगलकटाई, कार्बन डाय ऑक्साईडचे प्रचंड उत्सर्जन यामुळे प्रदूषण फार वाढले आहे आणि त्याचे दुष्परिणाम आम्हाला भोगावे लागत आहेत. भारतात केवळ हवाच नाही तर पाणीही दूषित झाले आहे. त्यात जागतिक तापमानातील बदलाने भर घातल्याने दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकातासारख्या मोठ्या शहरांमधील प्रदूषणाचा स्तर धोक्याच्या पातळीवर गेला आहे.
दूषित पाण्यापेक्षा दूषित हवेमुळे जगात अधिक लोकांचा मृत्यू होतो, हे ऐकून आता आश्चर्यही वाटेनासे झाले आहे. दिवसेंदिवस जगातील बहुतांश देशांमधील हवा प्रदूषित होत चालली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील प्रदूषणाची चर्चा संपूर्ण देशभर झाली. प्रदूषणाचा स्तर एवढा वाढला होता की, राजधानीतील शाळा आठवडाभर बंद ठेवाव्या लागल्या. राजधानी दिल्लीतील प्रदूषणामुळे तेथील नागरिकांचे आयुष्य साडेसहा वर्षांनी कमी होण्याचा धोका आहे, असा जो निष्कर्ष काढण्यात आला आहे, तो आम्ही गांभीर्याने घेतला नाही, तर आमचा भविष्यकाळ कठीण आहे. मोठ्या प्रमाणावर लाकडं जाळली जाणं, शेतातील पिकांचे अवशेष जाळले जाणे, भेसळयुक्त इंधनाचा अतिवापर केला जाणं, वाहतूक जाम झाल्यामुळं रस्त्यांवर उभ्या राहणार्‍या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड बाहेर पडणं, या व अशा अनेक कारणांमुळे भारतात हवा प्रदूषित होते.
 
 
दिल्लीच्या आकाशात मध्यंतरी जो प्रचंड धूर होता, तो उत्तरप्रदेश, हरयाणा-पंजाबमधील शेतकरी पिकांचे अवशेष जाळत असल्यामुळे आला होता. हवा वेगवान असेल आणि हवेची दिशा दिल्लीकडे असेल, तर तिकडचा धूर दिल्लीच्या आकाशात पसरतो आणि तिथल्या प्रदूषणाचा स्तर वाढून नागरिकांना त्रास होतो, हा अनुभव आहे. आपल्याकडे कचरा जाळण्यास बंदी असतानाही तो मोठ्या प्रमाणात जाळला जातो. कचरा व्यवस्थापन नीट न करता तो जाळण्यात आला, तर त्यातून जे अनेकविध विषारी वायूू बाहेर पडतात, ते शुद्ध हवेत मिसळतात आणि हवा अशुद्ध होते. या अशुद्ध हवेलाच आम्ही प्रदूषण म्हणतो. आम्हाला हे प्रदूषण कशामुळे होते हे माहिती आहे, त्यावरील उपायही माहिती आहेत, पण आम्हाला ते करायचे नाहीत आणि दूषणं मात्र देत राहायची, ही आमची सवय आहे. देशातल्या लोकांचं जे सरासरी आयुष्मान आहे, ते तीन ते चार वर्षांनी कमी होत आहे आणि राजधानी दिल्लीतल्या नागरिकांचं आयुष्मान साडेसहा वर्षांनी कमी होत आहे, हीसुद्धा जर आम्ही गंभीर बाब मानत नसू, तर आम्ही कोणत्या बाबतीत गंभीर आहोत, हा प्रश्नच आहे.
 
 
प्रदूषण ही काही आता आपल्याच देशातील चिंता राहिली आहे, असे नाही. संपूर्ण जग वाढत्या प्रदूषणामुळे चिंतित आहे. परंतु, वाढलेले प्रदूषण कमी करण्याच्या संदर्भात जे संभाव्य उपाय आहेत, त्यावर कुणी गांभीर्याने चिंता करताना दिसत नाही. आपल्याकडे, आपल्या नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कायम या विषयावर चिंता करताना दिसतात, त्यावर उपाय करण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात. जेवढी वाहने आहेत, ती सगळी जैवइंधनावर चालवावीत, असा त्यांचा आग्रह आहे. त्याचप्रमाणे पुढल्या काळात वाहनं ही इलेक्ट्रिकवर चालावीत, हाही त्यांचा प्रयत्न आहेच. वाहनांचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांना त्यांनी आधीच इशारा दिला आहे. भविष्याचा वेध घेणारा आणि त्यानुुरूप नियोजन करणारा नितीन गडकरी यांच्यासारखा नेता देशातल्या प्रत्येक जिल्ह्याला लाभला तर प्रदूषणच काय, पण सगळ्याच समस्या संपुष्टात येतील. इथेनॉलचा वापर करण्यावरही नितीन गडकरी भर देताना दिसतात. पण, त्यांच्या प्रयत्नांना हरताळ फासण्याचे काम आपल्याच देशातील स्वार्थी लोक करीत आहेत, हे दुर्दैवीच! मात्र, गडकरी हे जिद्दी आणि परिश्रमी आहेत. एक दिवस त्यांचे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील आणि आम्हाला ‘अच्छे दिन’ अनुभवास येतील, याची आम्हाला खात्री आहे.
 
 
आमची भौतिक सुखाची भूक वाढली आहे. त्यामुळे आधुनिकता आणि प्रगतिशीलतेच्या नावावर निसर्गाचे प्रचंड शोषण आम्ही करीत आहोत. जोपर्यंत आम्ही निसर्गाचे शोषण थांबवत नाही, तोपर्यंत समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अंधारात सुई शोधण्यासारखे कठीण काम आहे. आम्ही आमच्या आचरणानेच निसर्गाचे संतुलन बिघडवत आहोत, याचा आम्हाला सोईस्कर विसर पडत आहे. हिरवीगार वनं तर आता दुर्मिळच होत चालली आहेत. आज आपल्या महाराष्ट्राचाच विचार केला, तर जंगलाचे प्रमाण हे 20-21 टक्के आहे. पण, ते विदर्भात असलेल्या 46 टक्के जंगलांमुळे आहे. विदर्भ जर महाराष्ट्रापासून वेगळा केला तर महाराष्ट्रातले जंगल दहा टक्के तरी असेल का, याची शंकाच वाटते. जंगलंच काय, देशातल्या अनेक बारमाही वाहणार्‍या नद्याही कोरड्या पडल्या आहेत. ज्या नद्यांमध्ये आज पाणी दिसते आहे, ते वीस वर्षांआधी दिसत होते, त्याच्या अर्धेही दिसत नाही, ही बाब चिंताजनक आहे. अनेक नद्यांचे प्रवाहच थांबल्यासारखे झाले आहेत. एकीकडे हवेचे प्रदूषण आणि दुसरीकडे पाण्याचा अभाव, उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी अर्धे पाणी दूषित असणे आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या व्याधी होणे, ही बाब आता नित्याची झाली आहे.
 
 
शेतीचेही आता वेगाने यांत्रिकीकरण होते आहे. शेतात यंत्र चालविले जात असल्याने आणि उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने जमिनीचा कसही कमी होत चालला आहे. कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने फळे, भाजीपाला, अन्नधान्याच्या माध्यमातून माणसाच्या शरीरात विषारी घटक प्रवेश करीत असल्यानेही नवनव्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. जे किडे-माकोडे आम्ही कधी बघितले नव्हते, ते अनेक प्रकारचे नवीन कीटक आम्हाला त्रास देऊ लागले आहेत. दरवर्षी जगात कुठल्या तरी देशात प्रदूषणावर चिंता व्यक्त करण्यासाठी सेमिनारचे आयोजन केले जाते. जगभरातील प्रतिनिधी तिथे येतात, आपापली मतं मांडतात अन्‌ मायदेशी परततात. पण, त्याचे सकारात्मक फलित कधीच दिसून येत नाही. विकसित देश विकसनशील देशांवर खापर फोडतात आणि विकसनशील देश विकसित देशांना दूषणं देतात. पण, तोडगा काढायला कुणीच तयार नाही. एकूण परिस्थिती लक्षात घेता, सगळेच एकमेकांना घेऊन बुडणार, असे दिसते आहे...