सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख कोटींवर

    दिनांक : 02-Jan-2020
नवी दिल्ली: वसुलीच्या स्तरावर केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख कोटींवर गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय बिकट असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारसाठी दिलासा मिळाला आहे.
 

u_1  H x W: 0 x 
डिसेंबर 2019 या महिन्यात एक लाख 3 हजार 184 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यात एकूण 1,03,492 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. तर ऑक्टोबर महिन्यात 95,380 कोटी रुपये आणि सप्टेंबर महिन्यात 91,916 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते.
एकूण जीएसटीमध्ये केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) 19,962 कोटी रुपये, तर राज्य जीएसटी (एसजीएसटी) 26,792 कोटी रुपये वसूल झाले आहेत. एकात्मिक जीएसटी (आयजीएसटी) 48,099 कोटी रुपये आहे. उपकर 8,331कोटी रुपयांचा आहे. दरम्यान, सरकारने जीएसटी संकलन वाढविण्यासाठी जास्त प्रयत्न करत आहे. नवीन योजना सुचविण्यासाठी आणि जीएसटी सिस्टिम आणखीच मजबूत करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय, केंद्र सरकारने टॅक्स चोरीच्या विरोधात अभियान सुरु केले आहे. जे लोक खोटी बिले दाखवून फायदा घेत आहेत. त्यांच्याविरोधात चौकशी वेगाने करण्यात येत आहे.