आदिवासी कोण?

    दिनांक : 01-Jan-2020
-श्री.गुसयडा रेता भील 
 
रामायणातील ‘शबरी’, महाभारतातील ‘एकलव्य’ आणि श्रीकृष्णाकडून मृत्यू आला तो ‘व्याध’ किंवा ‘शिकारी’ हे सर्व आदिवासीच होते. भारतामध्ये आदिवासी म्हणून संबोधल्या गेलेल्या समुहांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला आहे. आदिवासी या संज्ञेत आदिम जाती, वनवासी, गिरीजन या संज्ञा अंतर्भूत आहेत. भारतीय राज्यघटनेत जमातीची व्याख्या देण्यात आलेली नाही, मात्र राष्ट्रपती आवश्यकतेनुसार आदिवासी जमाती किंवा त्या अंतर्गत काही गट किंव समूह यांना ‘अनुसूचित जमाती’ जाहीर करु शकतात.

ओ_1  H x W: 0 x 
 
१९ व्या शतकात मानववंशशास्त्रज्ञांनी ‘आदिवासी’ किंवा ‘आदिवासी समुदाय’ ही संज्ञा विकसित केली. या संज्ञेनुसार एकाच भूभागावर निवास करणार्‍या, सर्वसामान्यपणे एकच नाव किंवा ठराविक आडनावे, कुळे लावणार्‍या, एकाच प्रकारची भाषा बोलणार्‍या, विवाहसंबंध आणि व्यवसायाच्या बाबतीत एकाच प्रकारचे- मग ते निषेधात्मक असो वा संमतीदर्शक असे नियम पाळणार्‍या व निश्‍चितपणे एक विशिष्ट प्रकारची मूल्ये व विचारप्रणाली यांची जपणूक करणार्‍या कुटुंबाच्या समुदायाला ‘आदिवासी समुदाय (ट्रायबल कम्युनिटी) किंवा आदिवासी समाज(ट्रायबल सोसायटी) म्हणतात. कुटुंबाच्या या समुहाला ‘जमात’ असेही म्हणतात.
 
 
गिलीज- यांच्या मते जो पूर्वशिक्षित स्थानिक समुदाय, जो एकच भूप्रदेश व्यापतो, एकच भाषा बोलतो आणि एकाच संस्कृतीचा अवलंब करतो त्याला ‘जमात’ म्हणतात. डॉ. डी. डी. मुजुमदार- यांनी केलेली व्याख्या व्यापक आहे. जमात म्हणजे कुटुंबांचे अगर समुहाचे संकलन असून ती एकच नाव धारण करते, ते एकाच भुप्रदेशात वास्तव्य करतात. एकच बोली बोलतात, विवाहाचे विशेष नियम, एकच उद्योग, व्यवसाय करतात आणि परस्पर सहकार्याची एकच निश्‍चित पद्धती पाळतात. एक नाव, एक भाषा, एकाच भूभागावर वास्तव्य असणार्‍या सर्वांसाठी समान असे विवाह, उद्योग, व्यवसायविषयक- भोगनिषेध असणारा समूह हे त्याचे वैशिष्टय आहे. जातीचे लोक अनेकठिकाणी विखुरलेले असतात. प्रत्येक जातीचा एखादा असा व्यवसायही असतो. परंतु जमातीच्या बाबतीत दोन्ही लक्षणे नाही. जातीमध्ये वेगवेगळ्या उपजाती येतात, तशा उपजाती जमातीत येत नाहीत. भारतीय स्मृतीग्रंथात आदिवासी जमातींचा उल्लेख आहे. अनुलोम, प्रतिलोम, शरीरसंबंधातून या निर्माण झाल्याचा उल्लेख आहे. उदा. रामायण, महाभारतात उल्लेख असलेले शबरी, रक्श, निषाद (भिल्ल), पुलिंद या जमातीच होत्या. ते आदिवासीच होते.
 
 
अनुसूचित जमाती
 
अनुसूचित जमाती म्हणजे शेड्युल्ड ट्राईब "scheduled tribe means such tribes or tribal communities or parts of groups within such tribes or tribal communities as are deemed under article 342 to be scheduled tribefor the purposes of these communities..."
नागरी संस्कृती आणि वस्तीपासून दूर राहिलेले असे ते आदिवासी. संबंधित प्रदेशातील मूळचे रहिवासी. मात्र, भारतातील आदिवासींसाठी ‘ऍब ओरिजिनल’ हा शब्दप्रयोग वापरणे हे शास्त्रीयदृष्ट्या अनावश्यक आहे. बरेचआदिवासी डोंगरदर्‍यातून, जंगलातून राहत असल्याने त्यांचा उल्लेख ‘गिरीजन’ अथवा ‘वनवासी’ असाही होतो, परंतु या शब्दातून त्यांचे मागासलेपण दिसते, त्यांचा अधिवास सूचित होतो.
 
 
थोडक्यात, या शब्दांचा आशय एक असला तरी नि:संदिग्ध अर्थ प्राप्त करुन देणे अवघड आहे. मात्र अनुसूचित जमातीच्या नावाखाली सगळ्या जमाती येतात. भारतीय घटनेच्या अनुच्छेद ३४२ अन्वये काही मार्गदर्शक तत्त्वे सांगण्यात आली आहेत. त्या अन्वये या समाजांना असा दर्जा दिला जातो, अथवा काही ठळक वैशिष्ट्ये नक्की केली आहेत. उदा. प्रत्येक जमात एका विशिष्ट भूप्रदेशात राहते. ते क्षेत्र इतर प्रगत समाजापासून दूर किंवा जंगलात असते. त्यामुळेच हा समाज इतरांपेक्षा अलग असतो.
समाजात कुळांची व्यवस्था असते. त्यांचा धर्म हा सचेतनवादी असून तो निवासस्थानापुरताच असतो. त्यात मंत्रतंत्र, जादूटोणा असतो. प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र पंचायत असते. प्रत्येक जमातीची भाषा वा बोली स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यांच्या परंपरांमुळे लोकांच्या वागण्यात सारखेपणा असतो. याशिवाय अलिप्तता आणि एकाकीपणामुळे ‘मागासलेपणा’ आणि ‘बुजरेपणा’ हेही या समाजाचे ठळक वैशिष्ट्य आहे.
 
 
आदिवासी समाजाची ठळक वैशिष्ट्ये आपण पाहिली तर, सर्वसाधारणपणे आदिवासी समाज डोंगरदर्‍यात, पर्वतावर आणि जंगलात राहत आलेले आहेत. त्यामुळे ते इतर समाजापासून वेगळे आणि स्वतंत्र आहेत. सतत निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने त्यांच्या प्राथमिक गरजा ते निसर्गातूनच भागवितात. त्यांची अर्थव्यवस्था म्हणजेच अन्नपदार्थ मिळविणे आणि संकलन करणे होय. जंगल वापरावर आलेल्या बंधनांमुळे शेतीस चालना मिळाली. उत्पादनाची आणि संकलनाची त्यांची साधने ही साध्या स्वरुपाची, हाताने बनविलेली असतात. त्यामुळेच त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच प्राथमिक आणि वस्तुविनिमय स्वरुपाची आहे. बहुसंख्य आदिवासी समाजाची स्वत:ची अशी बोलीभाषा आहे. परंतु त्यांनंा स्वतंत्र लिपी नाही. त्यांच्यामध्ये बहिर्विवाही कुळी पद्धत असते. एका कुळातील सदस्य हे नातेसंबंधाने बांधलेले असतात.
 
 
महाराष्ट्रातील आदिवासी लोक ज्या भागात राहतात, त्या भागाचे भौगोलिकदृष्ट्या तीन विभाग पडतात.
 
 
सह्याद्री विभाग:-
सह्याद्री पर्वतरांगांच्या या विभागात महादेव कोळी, वारली, कोकणा, ठाकर, कामकरी या जमातींची वस्ती आहे.
 
सातपुडा विभाग:-
सातपुडा पर्वतरांगांमध्ये भिल्ल, कोकणा, धनका, गावीत, दुबळा पावरा, हेमले, बामणे, कुकड आमसे, पटले, भोसले या जमातींची वस्ती आहे.
 
गोंडवन विभाग:-
या विभागात विदर्भातील डोंगराळ आणि जंगलमय प्रदेशात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती मेळघाट एवढा मोठा विस्तृत प्रदेश येतो. त्यामध्ये गोंड, माडिया, बडा, माडिया, मुरिआ, परधान, कोरकू, कोलाम, आंध, हलवा या जमातींची वस्ती आहे. जिल्हावार विचार करता-ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींची मोठी संख्या आहे. महाराष्ट्रात एकूण ४७ आदिवासी जमाती आहेत. मात्र scheduled castes & scheduled tribes orders (amendment) act 2002 (No. 16 of 2003) नुसार ही संख्या ४५ झाली आहे. 
 
 
आदिवासी हे संस्कृतीच्या विविध टप्प्यांवर उभे आहेत. संस्कृतीच्य अवस्थेनुसार आदिवासींचे वर्गीकरण केले असता, अतिशय मागासलेपण, स्थित्यंतर होत असलेले, बाह्य संपर्काने स्वत:ची संस्कृती विसरलेले आणि बाह्य संपर्कात येऊनही आपली संस्कृती टिकवून ठेवलेल्या प्रत्येक गटातील आदिवासींच्या समस्या निरनिराळ्या आहेत. आज सुरु असलेल्या ‘आदिवासी विकासाच्या’ अथक प्रयत्नांमुळे पहिल्या गटातील आदिवासींचे प्रमाण पूर्वीइतके राहिले नाही; तरीही भूमिहिन आणि व्यवसाय अथवा पोटापाण्यासाठी स्थलांतर करणारे आदिवासी आहेतच. आजकाल शिकार तर राहिलेलीच नाही. मात्र बदललेल्या काळाला अनुसरुन साखर कारखाने, ऊस तोडणी, वीटभट्टी असे जे ठराविक काळात चालणारे व्यवसाय आहेत त्यानुसार स्वत:ही स्थलांतर करणारे आदिवासी आहेतच. त्यांची स्थिती अधिक मागास आहे. शिवाय स्थलांतर कमी करणारे परंतु दुर्गम आणि एकाकी ठिकाणी राहणारेही आहेत. पारंपरिक पद्धतीनुसार मध किंवा कंदमुळे जमा करणे हे सुरु असले तरी संपूर्ण जमातीची त्यावर गुजराण होऊ शकत नाही.
 
 
इरावती कर्वे यांनी भारतीय समाजांना, जमातींना गोधडीची उपमा दिली आहे. प्रत्येक चिंधी स्वतंत्र आहे, पण गोधडीत मी अशी बसली आहे की, त्या गोधडीतून चिंधी वेगळी काढणे शक्य नाही. ‘आदिवासी’ या शब्दाभोवती हिन्दुस्थानात अद्यापही एक कुतूहलाचे, जिज्ञासेचे वलय आहे. या वलयात वेगवेगळ्या रंगछटाही आहेत. त्यामुळे कोणाला या आदिवासींविषयी सहानुभूती वाटते, कोणाला करुणा वाटते तर त्यांच्याजवळ जायला भय वाटले, तर कोणाला तुच्छता! काहींना ती निसर्गाची भोळीभाबडी लेकरे वाटतात, तर कोणाला अंधश्रद्धांचे बळी. कोणाला ते पळून गेलेल्या नायक-नायिकांचे आश्रयस्थान वा लोकनृत्य, लोकसंगीतामुळे होणार्‍या मनोरंजनाचे हुकमी एक्के वाटतात. एकेकाळी या समुहाला एक वेगळा व अलग समाज मानण्याची प्रवृत्ती होती. त्यामुळे ते मुख्य प्रवाहापासून दूर होते. भारतात ब्रिटीश अंमल प्रस्थापित झाल्यानंतर ब्रिटीश सत्ताधारी आणि अभ्यासकांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. ब्रिटिशांना जशी जिज्ञासा होती, त्याचप्रमाणे राज्यकर्ते या नात्याने एतद्देशीयांवर सत्ता गाजवण्यासाठी त्यांना जाणून घेण्यातही त्यांचा स्वार्थ होताच. याच काळात ख्रिश्‍चन मिशनर्‍यांचेही लक्ष त्यांच्याकडे गेले. या मिशनर्‍यात सेवाभावी वृत्ती होती, हे नाकारण्याचे काहीच कारण नाही; परंतु त्याचबरोबर धर्मांतराची प्रेरणाही कार्यरत होती. त्यामुळे इतकी वर्षे आदिवासींबरोबर अलिप्ततेने वागणार्‍या हिन्दूंनाही जाग आली आणि मग अगदी शब्दांचेही राजकारण होऊ लागले. ‘आदिवासी’ शब्दाऐवजी ‘वनवासी’ हा पर्याय पुढे आला. सन २०१९ मध्ये ‘वनवासी’ऐवजी ‘देवगिरी’ केल्याचे उल्लेख गुसायडा भील सांगतात. इकडे खुद्द काही आदिवासींनाही आपल्या स्थानाचे महत्त्व समजून हक्कांची जाणीव होऊ लागल्याने ‘मूळनिवासी’पणाचे दावे करण्यात येऊ लागले आहेत.
 
रा.भुजगाव,ता.धडगाव,
जि.नंदुरबार,मो.८२७५०५३०८४
(मार्गदर्शक-डॉ.प्रकाश ठाकरे, आधार हॉस्पिटल, नंदुरबार)
 
( नंदुरबार येथे २०१९-२० मध्ये  चेतना परिषद पार पडली.  या ठिकाणी 'जळगाव तरुण भारत'ने  'आत्महुंकार' या विशेषांकाचे प्रकाशन केले. या माध्यमातून जनजाती समाजाची उर्जस्वल संस्कृतीची ओळख करून देताना त्यांच्या वर्तमान स्थितीवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामधील लेख माला आमच्या वाचकांसाठी जळगाव तरुण भारतच्या पोर्टल वर प्रकाशित करीत आहोत.)