माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूकदारांचे स्वागत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :20-Feb-2019

‘नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2019’ या जागतिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत

 
 
 
मुंबई, दि. 20 : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आवश्यक असे पोषक वातावरण महाराष्ट्रात आहे. या क्षेत्राच्या वाढीसाठी राज्य तयार असून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे राज्यात स्वागत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. ‘नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2019’ या जागतिक परिषदेत झालेल्या एका मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. येथील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये ही परिषद 22फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या परिषदेचे हे 27 वे वर्ष आहे. नॅसकॉमचे व्हाईस चेअरमन आणि विप्रोचे चिफ स्ट्रॅटजी अधिकारी रशिद प्रेमजी यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी नॅसकॉमच्या अध्यक्ष श्रीमती देबजानी घोष उपस्थित होत्या.


नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फोरम 2019 या परिषदेची यावर्षीची संकल्पना ‘संधी आणि वास्तविकता’ अशी आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन शासनाकडून उपलब्ध असलेल्या संधीचा फायदा हा तळागळातील शेवटच्या माणसापर्यंत होणे आवश्यक आहे. या दृष्टीने राज्य शासनाने पावले उचलली आहेत. राज्य डिजिटली अग्रेसर आहे. ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे पोहोचण्यासाठीचा राज्याचा रोडमॅप तयार आहे. सन 2025 पर्यंत हे ध्येय गाठण्यासाठी कृषी विकासाचा दर 6 टक्के, औद्योगिक वृद्धीचा दर 13 टक्के तर सेवा क्षेत्राचा दर हा 15.5 टक्के असावा लागणार आहे. सेवा क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत. यासाठी कृषीबरोबरच सेवा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता उद्योगाची सांगड घालणारे ‘इंडस्ट्री 4.0’ हे धोरण अवलंबण्यात येत आहे. शासकीय कामकाजात उत्पादकता, सर्वसमावेशकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून सुमारे 400 सेवा नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध आहेत. सुमारे 55 लाख लोकांनी आतापर्यंत याचा वापर करून कागदपत्रांची व इतर शासकीय कामे पूर्ण केले आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक वितरण प्रणालीचे संगणकीकरण केल्याने सुमारे दहा लाख बोगस रेशन कार्ड रद्द करता आले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
 
माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचता यावे हा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी या क्षेत्रातील खासगी कंपन्यांनी शासनासोबत काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. ते म्हणाले, मायक्रोसॉफ्ट या कंपनीच्या मदतीने कुपोषित भाग म्हणून ओळख असलेल्या हरिसाल या गावाचा कायापालट करता आला. या गावात आता कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मूलभूत गरजा पुरविता आल्या. महिला उद्योजकांना हस्तकलेला ऑनलाईन विक्री करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता आला. शासकीय कामकाज ‘पेपरलेस’ आणि ‘लेस पेपर’ असा होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. पूर्वी येणाऱ्या अडचणी आता कमी होत आहेत. ‘आधार’ सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या डेटाबेसमुळे बरीच मदत होते आहे. आरोग्य विमासारख्या योजनेत तंत्रज्ञानामुळे योग्य लाभार्थ्याला लाभ देणे शक्य होत आहे. ‘भारत नेट’ मुळे प्रत्येक ग्रामपंचायतींपर्यंत फायबर नेटने जोडणी होत आहे. येत्या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रातील गावांना नेटने जोडण्याचे काम पूर्ण होईल, त्यामुळे विकासाच्या मार्गातील दरी तंत्रज्ञानाचा वापर करुन भरून काढता येणार आहे.
 

 
 
मुख्यमंत्री म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजात वापर करण्यात राज्य अग्रेसर आहे. माहिती तंत्रज्ञान संदर्भातील सर्वंकष धोरण तयार करणारे प्रमुख राज्य आहे. फिन्टेक धोरण, स्टार्टअप, इज ऑफ डुईंग बिझनेस, पायाभूत सुविधांसाठी राज्याने धोरण आखले आहे. मुख्यमंत्री डॅशबोर्ड सारख्या माध्यमातून शासकीय कामकाजात गतिमानता आणण्यास मदत झाली आहे. प्रशासकीय कामातील अडचणी तात्काळ दूर करून त्यावर निर्णय घेतला जातो. उद्योगातील सुलभतेसह विकासाच्या इतर बाबींमध्ये आय टी क्षेत्राचा वापर वाढविण्यात येत आहे. ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे वाटचाल करीत असताना कृषी क्षेत्राच्या विकासावर भर देण्यात येत आहे. कृषी क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून रियल टाईम माहिती मिळवून त्याद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. ई-नाम या पोर्टलमुळे कृषी उद्योगाला चालना मिळाली आहे.
श्रीमती देबजानी यांनी नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फोरम या परिषदेची पार्श्वभूमी सांगितली तर नॅसकॉमचे उपाध्यक्ष केशव मुरुगेश यांनी आभार मानले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फोरम स्टार्टअप पुरस्कार देण्यात आले. यात सागर डिफेन्सचे कॅप्टन निकुंज पराशर, पॅडकेर लॅब्सचे अजिंक्य धैर्य, बोधी हेल्थचे देबेंगा गोगोई, सरल डिजाईनचे कार्तिक मेहता, आणि हेस्टॅक या कंपनीचे अनिवरन चॅटर्जी यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
नॅशनल असोसिएशन ऑफ सर्व्हिसेस अँड सॉफ्टवेअर कंपनी म्हणजे नॅसकॉम ही माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील शिखर संस्था असून पुढील वार्षिक 5 वर्षे महाराष्ट्रातील नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम - वार्षिक आयोजन करण्यासाठी करारबद्ध आहे. राज्यानेही या पाच वर्षात या परिषदेचे अधिकृत आयोजक म्हणून संमती दिली आहे. अनेक राज्य ही परिषद त्यांच्या राज्यात व्हावी यासाठी प्रयत्न करीत असतात. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने या परिषदेचे आयोजन महाराष्ट्रात होत आहे. जागतिक स्तरावरील या परिषदेला उद्योग जगतातील दिग्गज, तंत्रज्ञान प्रचारक, शासकीय अधिकारी आणि जगभरातील माध्यम प्रतिनिधी उपस्थित आहेत. आयटी आणि संलग्न उद्योग क्षेत्रातील ही परिषद जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण मानली जाते.