जीएसटी काऊन्सिलची बैठक : सिमेंट, घरे स्वस्त होणार ?
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :20-Feb-2019
 
 
नवी दिल्ली : वस्तू व करांसंदर्भात बुधवार, दि. २० फेब्रुवारी रोजी महत्वाची बैठक होणार आहे. यात बांधकाम क्षेत्रात परवडणाऱ्या घरे खरेदी करण्यासाठी दिलासादायक निर्णय हाती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नितीन पटेल आणि राज्याचे महसूल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रीगटाने परवडणाऱ्या घरांवरील जीएसटी ८ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणावा, अशी शिफारस केली होती. संबंधित अहवाल जीएसटी काऊन्सिलकडे सोपवला आहे.
 
एसटी (वस्तू व सेवा कर) परिषदेत सिमेंटवरील जीएसटीत २८ टक्क्यांवरुन १८ टक्के घट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. घर खरेदीदार आणि बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच कालावधीपासून सिमेंटवरील जीएसटी कमी करण्याची मागणी केली जात आहे. सध्या सिमेंटवर २८ टक्के जीएसटी आकारला जात आहे. लॉटरीवर सरासरी एकाच टक्केवारीत जीएसटी आकारण्याचा विचारही सरकार करत आहे. सद्यस्थितीत विविध राज्ये भिन्न टप्प्यांमध्ये जीएसटी आकारत आहेत. हा कर १२ टक्क्यांपासून ते २८ टक्क्यांपर्यंत आकारण्यात येत आहे.
 
 
 
परवडणाऱ्या घरांची व्याख्या बदलणार
जीएसटी परिषदेत मंत्रीमंडळ समितीच्या बैठकीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांच्या किमतींची व्याख्या बदलण्यात येणार आहे. सरकारला यातून केवळ ३ टक्के जीएसटी महसुल मिळणार असला तरीही सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. सद्यस्थितीत ५० चौरस मीटर चटई क्षेत्रातील घरांना परवडणाऱ्या घरांमध्ये सामाविष्ठ केले जाते. ही मर्यादा वाढवत ८० चौरस मीटरवर नेण्यात येऊ शकते.