बंदूक हाती घेणारा प्रत्येकजण मारला जाणार
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :19-Feb-2019

लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीफचा इशारा


 
 
नवी दिल्ली : पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीफने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. बंदूक हाती घेणारा प्रत्येकजण मारला जाणार असल्याने तुमच्या मुलांना परत बोलवा असे आवाहन यावेळी पालकांना केले. जम्मू-काश्मीरमध्ये आईची भूमिका फार महत्वाची असणार आहे. त्यामुळे तुमच्या मुलांना समर्पण करायला सांगा असेही यावेळी सांगण्यात आले.
  
लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लन यांनी यावेळी सांगितले की, "जैश-ए-मोहम्मदने ISIS च्या मदतीने पुलावामाचा भ्याड हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची तब्येत सुधारत आहे. हल्ल्याच्या १०० तासांच्या आतमध्येच आम्ही ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला." बंदूक हाती घेणारा प्रत्येकजण मारला जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जैश-ए-मोहम्मद ही पाकिस्तान सैन्याची पिल्लावळ आहे. यामुळे या हल्ल्यात पाकिस्तानचा समावेश आहे असेही ढिल्लन यांनी ठामपणे सांगितले.
  
सीआरपीफचे आयजी जुल्फिकार हसन म्हणाले, "१४४११ हा आमचा हेल्पलाईन नंबर असून देशभरातील काश्मिरी नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी रात्रंदिवस कार्यरत आहे. देशभरात जिथेजिथे काश्मिरी विद्यार्थी शिकत आहेत. त्या प्रत्येक विद्यार्थांची आम्ही काळजी घेत आहोत. दरम्यान, काश्मीरचे आयजी एसपी वाणी यावेळी म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून काश्मिरी तरुण दहशतवादी संघटनांकडे जास्त आकर्षित होणे कमी झाले आहे. काश्मीर परिसरात जो हिंसा माजवेल तो जिवंत राहणार नाही.