महिलांच्या सुरक्षेसाठी ११२ हा नवीन इमर्जन्सी नंबर
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :19-Feb-2019

आजपासून मुंबईसह १६ राज्यात व केंद्रशासित प्रदेशात होणार कार्यान्वित

 
 
 
नवी दिल्ली : महिलांच्या व लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी केंद्र सरकारने नवीन आपत्कालीन क्रमांक सादर केला आहे. आजपासून १६ राज्यात व केंद्रशासित प्रदेशात महिलांसाठी ११२ हा नवीन आपत्कालीन क्रमांक असणार. महिला कोणत्याही अडचणीत असताना हा क्रमांक त्यांच्यासाठी आशेचा किरण बनणार आहे. अडचणीच्या वेळेस ११२ हा क्रमांक डायल केल्यास महिलांना तात्काळ मदत मिळणार आहे. याशिवाय ११२ हे मोबाईल अँपही तयार केले असून मोबाईलमध्ये हे अँप डाउनलोड करू शकतात.
 
गृह मंत्रालयांच्या माहितीनुसार, आपत्कालीन वेळी ११२ हा क्रमांक डायल करू शकता अथवा स्मार्टफोनवरून पावर बटन ३ वेळेस प्रेस करू शकता. याशिवाय ५ व ९ हे बटन जास्तवेळ दाबून धरल्यास आपत्कालीन क्रमांक डायल होईल. तसेच ११२ या मोबाईल अँपमध्ये "SHOUT" नावाचे एक बटन असून हे बटन दाबल्यास महिला व लहान मुलांच्या मदतीसाठी त्या परिसरातील स्वयंसेवकांना मदतीला पाठविले जाईल.
 
आतापर्यंत हिमाचल प्रदेश व नागालँडमध्ये हा आपत्कालीन क्रमांक चालू होता. आजपासून आंध्रप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू, गुजरात, जम्मू-कश्मीर, पुडुचेरी, अंदमान, लक्ष्यद्वीप, दादर नगर हवेली आणि दमन व दीव सोबतच मुंबईतही ही सेवा सुरु करण्यात येणार आहे.