''इमरान खान, मसूद अझहरला पकडून दाखवा''
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :19-Feb-2019
 

 
 
चंदिगढ : पुलवामा हल्ल्याबाबत भारताकडे पुरावे मागणाऱ्या इमरान खान यांना पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये दहशतवादी मसूद अझहर लपला आहे. इमरान यांनी त्याला पकडण्याचे धाडस दाखवावे, तुम्हाला शक्य नसेल तर आम्ही ही कारवाई करू, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला सुनावले.
 
आपल्या ट्विटमध्ये कॅ. अमरिंदर सिंह म्हणाले, “इम्रान तुम्ही भारताकडे पुलवामा हल्ल्याचे पुरावे मागत आहात. मात्र, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पुरावे आम्ही दिले त्यावेळी तुम्ही काय पावले उचललीत. हे आधी स्पष्ट करा”
 
 
 
मसूद पाकिस्तानात बहारवलपूरमध्येच आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या (आयएसआय) मदतीने हिंदुस्थानविरोधात कारवाया करत आहे. इमरान खान तुमच्यात हिम्मत असेल तर आधी मसूदला पकडा. तुमच्याने ही कारवाई शक्य नसेल तर भारत हे करेल, अशा कठोर शब्दात त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावले.
 
पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे वृत्त पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी फेटाळले आहे. “भारताने युद्धाला सुरुवात केल्यास, पाकिस्तान त्याला उत्तर द्यायला विचार करणार नाही.” अशी धमकी इमरान खान यांनी भारताला दिली.
 
 
भारत कोणताही पुरावा नसताना आमच्यावर आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतात निवडणूकांचे वातावरण असल्याने पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा भारत करत असल्याचे इमरान खान म्हणाले. यानंतर सर्व राजकीय पक्षांनी याचा निषेध करत इम्रान खान यांना सुनावले.