@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ ‘मातृतीर्थ’साठी निधी कमी पडणार नाही : मुख्यमंत्री

‘मातृतीर्थ’साठी निधी कमी पडणार नाही : मुख्यमंत्री

 विकास आराखड्यातील कामांचे भूमिपूजन, दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी


 
 
बुलढाणा, १४ फेब्रुवारी
जिजाऊंनी स्वराज्याची बीजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात बालपणापासूनच रुजविली. त्यांच्या या कार्यकर्तृत्वामुळेच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्ष साकारले. हा गौरवशाली इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना प्रेरणा मिळेल, असा मातृतीर्थचा विकास करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. या विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंदखेड राजा येथे स्पष्ट केले.
 
 
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय संचालनालय यांच्यामार्फत मातृतीर्थ मॉं जिजाऊ साहेब सिंदखेड राजा विकास आराखड्यातर्ंगत विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात करण्यात आले होते.
 
 
यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगर विकास राज्यमंत्री डॉ रणजित पाटील, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती, जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उमा तायडे, खासदार प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय कुटे, आ. डॉ. संजय रायमूलकर, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, आ. आकाश ङ्गुंडकर, नगराध्यक्ष नाझेर काझी, जि. प. सभापती श्‍वेता महाले, तोताराम कायंदे, विभागीय आयुक्त पीयूष सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी षणमुखराजन्,अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे आदी उपस्थित होते.
 
 
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मातृतीर्थचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आराखड्यांतर्गत येणार्‍या सर्व विकास कामांसाठी पहिल्या टप्प्यातील संपूर्ण निधी देण्यासोबतच पूर्ववैभव टिकवून ठेवण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जनतेसमोर यावे, यासाठी ६०० कोटी रुपयांचा रायगड विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यातून गडकिल्यांचा कायापालट करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांसोबतच मॉं जिजाऊ मातेच्या प्रेरणास्थळांचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी टप्प्या-टप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
 
पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
 
 
राज्याबाहेरही राज्याची अस्मिता छत्रपती शिवाजी यांच्या जीवन चरित्रावर उभी करण्यात आली असल्याचे रावल यांनी सांगितले. आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी विकास आराखडयातील दुसर्‍या टप्यातील कामे सुरू करण्याची मागणी प्रास्ताविकातून केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॉ जिजाऊ साहेब राजवाडा वास्तू नूतनीकरणाचे भूमिपूजन करून कोनशिलेचे अनावरण केले. तसेच मुख्यमंत्री यांनी राजे लखुजीराव जाधव राजवाड्यातील मॉं जिजाऊं साहेबांच्या शिल्पाकृतीला हारार्पण करून पूजन केले.