न्यायाने सुडाचे रुप घेतले तर त्याचे न्याय हे स्वरूप संपुष्टात येते - न्यायमूर्ती बोबडे

    दिनांक : 09-Dec-2019
जोधपूर: न्याय कधीच तात्काळ असू शकत नाही आणि त्याने ‘सूडाचे’ रूप घेतले तर त्याचे ‘न्याय’ हे स्वरूपच संपुष्टात येते, असे परखड मत शनिवारी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केले. एखादे फौजदारी प्रकरण निकालात काढण्यासाठी लागणारा वेळ, त्यात येणारी शिथिलता, तसेच त्यासाठी लागणारा प्रत्यक्ष वेळ याबाबत फौजदारी न्याय यंत्रणेने आपली भूमिका आणि दृष्टिकोन पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे, असेही मत सरन्यायाधीश बोबडे यांनी व्यक्त केले. राजस्थान उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सरन्यायाधीश बोबडे यांनी महिलांवरील अत्याचारांच्या अनुषंगाने सुरू झालेल्या जलद न्यायदानाच्या चर्चेबाबत सडेतोड मते मांडली.
 

l_1  H x W: 0 x 
 
हैदराबाद येथील बलात्कार-खून प्रकरण आणि त्यातील चार आरोपींना पोलिसांनी चकमकीत ठार केल्याच्या पार्श्वभूमीवर शरद बोबडे यांनी आपली मते मांडली. देशात अलीकडे घडलेल्या घटनांमुळे एक जुनीच चर्चा पुन्हा उफाळून आल्याचे सरन्यायाधीशांनी मान्य केले. न्याय कधीही तात्काळ असू शकत नाही किंवा तो तसा असू नये आणि न्यायाने सूडाचे स्वरूप घेऊ नये, असे मला वाटते, असे शरद बोबडे म्हणाले.