पहिल्या चार राफेलमध्ये 'मेटेओर' क्षेपणास्त्र हवेच!

    दिनांक : 06-Dec-2019
पाकिस्तानसोबत पुन्हा हवाई युद्धाचा प्रसंग उद्भवल्यास एफ-16 लढाऊ विमानांना रोखण्यासाठी भारताने फ्रान्सला पहिल्या चारही राफेल लढाऊ विमाने मेटेओर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज करून देण्याची विनंती केली आहे.
 

b_1  H x W: 0 x 
 
भारताने फ्रान्ससोबत 36 राफेल फायटर विमाने खरेदीचा करार केला आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये फ्रान्स वायुदलाच्या तळावर संरक्षण मंत्री राजनाथिंसह यांच्या उपस्थितीत झालेल्या औपचारिक कार्यक्रमात पहिली चार विमाने भारताला सुपूर्द करण्यात आली. त्याचवेळी भारताकडून फ्रान्सला आठ ते दहा मेटेओर क्षेपणास्त्रे देण्याची विनंती करण्यात आली. सध्या फ्रान्समध्ये भारतीय वायुदलाचे अभियंते आणि वैमानिकांना राफेल विमान उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जात आहे. पुढच्या वर्षी मे महिन्यात पहिली चार राफेल विमाने भारतात पोहोचतील. ही विमाने भारतीय वायुदलाच्या अंबाला येथील वायुतळावर तैनात केली जातील.
 
 
मेटेऑर क्षेपणास्त्रेच का हवी?
 
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये हवाई हल्ला करून जैश-ए-मोहम्मदचा अड्डा उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी सकाळी काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी फायटर विमाने घुसली होती. भारताच्या मिग-21 बायसन आणि सुखोई-30 एमकेआय या लढाऊ विमानांनी पाकिस्तानी हल्ल्याचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. पण, आपल्याला पाकिस्तानला म्हणावी तशी अद्दल घडवता आली नव्हती. त्यावेळी राफेल विमाने ताफ्यात असती, तर वेगळे चित्र दिसले असते. सध्या नियंत्रण रेषेवर शांतता दिसत असली, तरी जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 निष्प्रभ केल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार युद्धाचे इशारे दिले जात आहेत. या पृष्ठभूमीवर पुन्हा असा प्रसंग उद्भवल्यास पाकिस्तानवर जरब बसवता यावी यासाठी भारताने मेटेओर क्षेपणास्त्राची मागणी केली आहे.
 
 
मेटेओर क्षेपणास्त्र काय करू शकते?
 
मेटेओर हे हवेतून हवेत मारा करणारे सर्वोत्तम क्षेपणास्त्र आहे. नजरेपलीकडच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. या क्षेपणास्त्राद्वारे 120 ते 150 किलोमीटर अंतरावरील शत्रूचे लढाऊ विमान पाडणे शक्य आहे. सद्य:स्थितीत चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे असे घातक क्षेपणास्त्र नाही. 27 फेब्रुवारीला झालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानांनी भारताच्या लढाऊ विमानांवर ॲमराम क्षेपणास्त्र डागले होते. ॲमराम क्षेपणास्त्रसुद्धा नजरेपलीकडच्या लक्ष्याचा वेध घेते. त्याची मारक क्षमता 100 किलोमीटरची आहे. त्यावेळी आपल्या सुखोई लढाऊ विमानांनी ही सर्व ॲमराम क्षेपणास्त्रे यशस्वी रीत्या चुकवली होती.