केवळ एका घराण्याला सुरक्षा देणारे काँग्रेसवाले खरे निर्बल - खा. पूनम महाजन

    दिनांक : 04-Dec-2019
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ यांचे वर्णन ‘निर्बल’ असे करणारे कॉंगे्रसचे लोकसभेतील गटनेते अधिररंजन चौधरी यांच्यावर भाजपा सदस्यांनी आज मंगळवारी जोरदार पलटवार केला. ‘निर्बल’ सीतारामन्‌ नसून, तुम्हीच कॉंगे्रसवाले आहात, असा हल्ला भाजपा सदस्यांनी केला. खासदार पूनम महाजनही यावेळी कॉंग्रेसवर बरसल्या.
 
 
p_1  H x W: 0 x
 
सोमवारी कररचना दुरुस्ती विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना, अधिररंजन चौधरी यांनी, निर्मला सीतारामन्‌ यांच्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था दयनीय स्थितीत आली असल्याचा आरोप करताना, त्यांना ‘निर्बल’ अशी उपाधी दिली होती. भाजपा सदस्यांनी आज त्यांचा चांगलाच समाचार घेतला.
चौधरी यांचा निषेध करीत, भाजपा सदस्यांनी सभागृहात चांगलाच गोंधळ घातला. यावेळी अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. कुठलेही असंसदीय शब्द कामकाजातून काढून टाकले जातील, असेही बिर्ला यांनी स्पष्ट केले.
 
आज शून्य तासात चौधरी कांद्याच्या वाढत्या किमतीवर बोलण्यासाठी उभे झाले असताना, भाजपा सदस्यांनी त्यांना जोरदार विरोध केला. यावेळी भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी, चौधरी यांचा समाचार घेण्यासाठी नियमांचा हवाला दिला. महाजन म्हणाल्या, खरे निर्बल तुम्ही आहात, सीतारामन्‌ नाही. कारण, तुम्हाला एका परिवाराच्या सुरक्षेशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. तुम्ही सारेच कॉंगे्रसवाले इतके निर्बल झाला आहा की, आता तुम्ही पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनाही घुसखोर ठरवू पाहात आहात. एका घराण्याची विशिष्ट सुरक्षा काढल्यानंतर, तुम्ही त्यावरून गोंधळ घालत आहात, कारण तुम्हाला केवळ एकच घराणे दिसत, समाजाची सुरक्षा दिसतच नाही, समाजाच्या सुरक्षेविषयी तुम्ही कधीच काही बोलत नाही. यावेळी भाजपाच्या सदस्यांनी बाके वाजवून पूनम महाजन यांच्या भूमिकेचे स्वागत केले.