अजय भोळे यांचा भुसावळ भाजपातील वनवास अखेर संपला

    दिनांक : 31-Dec-2019
भुसावळ- भुसावळच्या भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावर भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अजय भोळे दिसल्याने भुसावळ भाजपाने त्यांना स्वीकारले असून त्यांचा वनवास संपला आहे अशी गरम चर्चा थंडीच्या मोसमात सुरु आहे. भुसावळ नगर पालिकेत नगराध्यक्षपदासाठी अख्तर पिंजारी आणि युवराज लोणारी यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी युवराज लोणारी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाकडून निवडून आलेले होते. त्यांना खाविआ आणि भाजपाने नगराध्यक्षपदासाठी समर्थन दिले होते. परंतु आपल्या पक्षाचा उमेदवार नसल्याने मतदानाच्या वेळी अजय भोळे हे तटस्थ राहिले होते तर भाजपाचे एक मत अख्तर पिंजारी यांच्या पारड्यात गेल्याने एक मताने त्यांचा विजय झाला होता. या निवडणुकीनंतर अजय भोळे यांच्यावर भुसावळ भाजपाने बहिष्कारच टाकला होता. 

ह_1  H x W: 0 x 
शहरासह तालुक्यातील भाजपाच्या बैठकीत संघटनेतील ही व्यक्ती कुठेही दिसत नव्हती. अनेकदा त्यांना बैठकीचे निमंत्रण सुध्दा नसायचे. परंंतु अजय भोळे यांनी पक्षाचे कार्य थांबवलेले नव्हते. भुसावळात त्यांना वनवास असला तरी संघटनेत त्यांच्याकडे जबाबदारी सोपवल्या जात होत्या. भाजपा ओबीसी मोर्चा निर्मिती झाल्यानंतर राज्य सरचिटणीसपदी त्यांची नेमणूक पक्षाने केली. यासोबत विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे जबाबदारी दिल्या गेल्या. परंतु तब्बल ५ वर्षे भुसावळ भाजपामध्ये त्यांना वावरण्यास संधी मिळाली नाही.
परंतु भाजपाच्या शहराध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शहर चिटणीसांनी त्यांना निमंत्रित केले. एवढेच नाही तर बैठकीत त्यांना मंचावर स्थान सुध्दा देण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष ते ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस अशा जबाबदार्‍या सांभाळणार्‍या भोळेंचा भुसावळ भाजपामधील वनवास शहराध्यपदाच्या निवडणुकीने संपला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. पक्षांतर्गत बहिष्कृत करणे काय असते हे या निमित्ताने शहरवासीयांच्या समोर आले. नगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट नाकारले म्हणून बंड न करणार्‍या पक्षाच्या पदाधिकार्‍याला तब्बल ५ वर्षांनी स्वीकारणे तसेच शहरात भाजपाच्या मंचावर अजय भोळे यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. आजही ते भाजपातच आहेत. मग एवढे वर्ष मंचावर का दिसले नाहीत याबद्दल थंडीच्या ऋतूमध्ये गरमागरम चर्चा सुरु आहे.