जम्मू काश्मीर मधील महिलांनी बनवलेल्या खादी वस्तू विक्रीसाठी खुल्या

    दिनांक : 18-Dec-2019
नवी दिल्ली: जम्मू काश्मीर मधील कलम ३७० हटविल्यानंतर तेथील जीवनमान पुन्हा पूर्वपदावर येत असून तेथील नागरिकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. जम्मू काश्मीर मध्ये काही महिलांनी एकत्र येऊन खादी ग्रामोद्योगच्या सहकार्याने रुमाल बनविले होते. त्यांच्या विक्रीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्सेनाही यावेळी उपस्थित होते.

m_1  H x W: 0 x
काही वर्षापूर्वी काश्मीरमधल्या दहशतवाद प्रभावित भागातील आणि जगण्यासाठी संघर्ष करणारी काही कुटुंब जम्मू जवळच्या नाग्रोटा भागात राहण्यास आली होती. बेरोजगार आणि उत्पन्नाचे साधन नसणाऱ्या महिलांना स्वत-निर्भर होऊन कुटुंबाची उपजिविका करता यावी यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने 2016 मध्ये नाग्रोटा येथे रुमाल तयार करण्याचे केंद्र सुरू केले होते.
  
या प्रसंगी केव्हीआयसीच्या या पुढाकारात समाजातल्या दुर्बल घटकांच्या सबलीकरणाच्या बापूंच्या स्वप्नांचे प्रतिबिंब उमटले आहे, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. गरजूंसाठी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला लोकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.
सुरुवातीला पाच कोटी खादी रुमाल विक्रीचे लक्ष निश्चित करण्यात आले असल्याचे व्ही. के. सक्सेना यांनी सांगितले. हे रुमाल तयार करताना 44 लाख मनुष्य दिवसांची रोजगार निर्मिती होईल आणि विविध कारागिरांना 88 कोटी रुपयांचा रोजगार उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.
 
जम्मू काश्मीर मधील महिलांनी बनविलेली स्थानिक उत्पादने पेटीएमवर विक्रीसाठी उपलब्ध केली जात असून त्यासाठी खादी ग्रामोद्योग आणि पेटीएम यांच्यात करार करण्यात आला आहे. या नव्या करारामुळे जम्मू काश्मीरच्या महिलांना रोजगार मिळणार आहे शिवाय महिला सशक्तीकरणासाठी त्याचा उपयोग होणार आहे. याची सुरवात काश्मिरी रुमाल विक्रीपासून करण्यात येत असून त्यानंतर महिलांनी बनविलेली अन्य उत्पादने विक्री साठी ठेवली जाणार आहेत.