जळगावच्या 35 विद्यार्थ्यांनी उभारला ‘पानिपत’मधील ‘शनिवारवाडा’

    दिनांक : 16-Dec-2019
- पंकज पाटील  
 
जळगाव: चित्रपट म्हटला की त्यात भव्यदिव्य सेट, नायक नायिका, खलनायक, त्यांची वेशभूषा, केशभूषा, आभूषणे, कायिक, अन् वाचिक अभिनय, मेकअप यासारख्या आणि बर्‍याच बाबींचा समावेश होत असतो. यात अधिक आव्हान असते ते ऐतिहासिक चित्रपटांचे. इतिहासकालीन सेट, मेकअप,केशभूषा, वेशभूषा तंतोतंत सादर करण्याचे... त्यामुळे निर्माता, दिग्दर्शक याबाबींकडे अत्यंत बारकाईने पाहत असतात. इंटेरिअर डिझाईन आणि फॅशन डिझाईनचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना अशा चित्रपटांत कॉस्युम (वेशभूषा) आणि भव्यदिव्य सेट उभारणीच्या कामात ट्रेनी म्हणून हातभार लावण्याची संधी मिळण्याची गरज असते. ही गरज ओळखत तशी संधी उपलब्ध करून देण्याचे काम जळगावच्या आयएनएफडीच्या संचालिका संगिता पाटील यांनी केले आहे. त्यांच्या संस्थेतील सुमारे 35 विद्यार्थ्यांनी 6 डिसेंबर रोजी प्रर्दशित झालेल्या ऐतिहासिक ‘पानिपत’ या चित्रपटातील शनिवारवाडा उभारण्याच्या कामात सहकार्य केले आहे. त्याबाबत संचालिका संगिता पाटील व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अनुभवाविषयीचा हा अल्प परिचय....

a_1  H x W: 0 x 
 
पुस्तकी शिक्षण आणि त्या शिक्षणाचे प्रात्यक्षिक यात काही बाबतीत फरक असतो. फॅशन आणि डिझाईन हा केवळ आजच्या काळातलाच विषय नव्हे, तर तो फार पुरातन काळातील आहे. पूर्वीच्या काळी देश एकसंघ नव्हता. तो लहान मोठ्या राज्यांमध्ये विभागला गेला होता. राजे आणि त्यांची प्रजा असे त्याचे स्वरूप असे. आपल्या राज्याचे संरक्षण आणि विस्तार या दोन कारणांसाठी त्याकाळी लढाया होत. या सर्व इतिहासकालीन लढायांची नोंद इतिहासात झालेली आहे.
 

a_1  H x W: 0 x 
 
हरियाणा राज्यातील पानिपत या शहराची तर इतिहासात विशेष नोंद आहे. पानिपत या गावात 1526, 1556 आणि 1761 या वर्षात मोठ्या लढाया लढल्या गेल्यात. यातील शेवटची आणि तिसरी लढाई ही मराठे सदाशिवराव पेशवे आणि अफगाणचा घुसखोर अहमद शहा अब्दाली यांच्यात झाली. लढाईच्या पहिल्याच दिवशी दोन्ही बाजूंकडील सुमारे दीड लाख सैन्य मारले गेले. यात मराठेशाहीचा अस्त होत ब्रिटीशांचा उदय झाला. पानिपतची अखेरची लढाई संपून 258 वर्ष झालेली असली तरी यातील लढाई नव्हे तर राजवाडे, राजे, राण्या, दास्या, सैन्य, त्यांचा तो करारीपणा, राज्य अन् स्वामीनिष्ठा, राजवाड्यांची रचना, बांधकाम, सजावट, वेशभूषा, केशभूषा यांचे मात्र आजही आकर्षण राहिले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात रसिकांच्या मनाला काही वेळापुरता का होईना विरंगुळा मिळावा, मनोरंजन व्हावे आणि नाविन्यपूर्ण, कलात्मक, भव्यदिव्य पाहावयास मिळावे हा प्रयत्न चित्रपट निर्मात्यांचा असतो. त्यातूनच विविध पौराणिक , ऐतिहासीक चित्रपट काढले जात आहेत. असाच एक चित्रपट 6 डिसेंबर 2019 रोजी प्रर्दर्शित झाला तो म्हणजे ‘ पानिपत’.
 
 
जळगावच्या एनआयएफडीच्या 35 विद्यार्थ्यांनी केले असिस्ट
 
 
राष्ट्रीय पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आणि निर्माता आशुतोष गोवारीकर यांनी ‘पानिपत’ हा चित्रपट प्रर्दर्शित केला आहे. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओ येथे शनिवार वाड्याचा भव्य असा सेट तयार केला आहे. हा सेट तयार करण्यासाठी नितीन देसाई व त्यांच्या टिमने केलेल्या प्रयत्नात जळगावच्या एनआयएफडीच्या सुमारे 35 विद्यार्थ्यांनीही खारीचा वाटा उचलला आहे. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी 35 एकर जागेत तयार केलेल्या शनिवार वाड्यातील राज्याचे बसण्याचे सिंहासन, मंत्र्यांची बसण्याचे आसने, दरबारींची बसण्याची व्यवस्था, राजवाड्याच्या भिंती, वाड्याचे मुख्य प्रवेशव्दार, बुरूज, त्यावरील नक्षीकाम, वाड्याच्याआतील भागातील सजावट, कारंजे, विविध महाल यासारखे पेपर वर्क करून त्याचे रूपांतर मोठ्या सेटच्या लहान लहान फ्रेममध्ये करत ते जोडून शनिवारवाड्याचा भव्य असा सेट तयार केला असल्याचे संगिता पाटील सांगतात.
 
 
... अन् मुले लागलीत कामाला
 
कर्जत येथील श्री. देसाई यांच्या स्टुडिओत गेल्यानंतर तेथे विविध चित्रपटांसाठी उभारलेले काही सेट आजही आहेत. तेथे शनिवारवाडयाचा भव्य सेट उभारण्याचे काम सुरू होते. सेट उभारणीच्या कामास रात्री वेग येत असे. सेट तयार करण्यासाठी स्वत: नितीन देसाई साध्या कपड्यात बसून काम करत असल्याचे पाहून मुलांनाही हुरूप आला. त्यांनीही श्री. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सेट उभारणीच्या कामास सुरुवात केली. रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत सेट उभारणीच्या कामात मुले गुंतली. त्यांच्या कामाचा वेग आणि त्यांच्या नियोजनाप्रमाणे होत असलेले काम पाहत नितीन देसाई यांनी समाधान व्यक्त केले. मुख्य सिंहासनाची सजावट करण्यासाठी पैठणींचा केलेला वापर, भिंतींसाठी तयार केलेले सिमेंटचे सिटस्, राजवाड्याला केलेली पेंटींग यासारखी बरीच कामे या विद्यार्थ्यांनी शिकाऊ म्हणून तयार केली आहेत.
 
या विद्यार्थ्यांचा होता सहभाग :
 
पानिपत चित्रपटातील शनिवारवाड्याचा सेट तयार करण्यात दिग्दर्शक नितीन देसाई व त्यांच्या सहकारी आणि जळगावच्या आयएनएफडीच्या संचालिका संगिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जानिका सेठिया, दिव्या साहित्या, ऐश्वर्या परप्यानी,मृदुला बालापुरे, विक्की खत्री , सुवर्णा पाटील,कल्याणी मोरे,योगिता चौधरी,नम्रता पाटील,सोनल सोनवणे,लता उदासी, किरण गुटे, शिवानी महाजन,सुवर्णा पटेल, रितू मकडिया,चार्मी नाथानी,पूजा भावे,गुंजन फुलवानी, देवदत्त मुजुमदार,यश आटवाणी, विशाल मोरे,पार्थ पटेल,अक्षता बखतवानी,प्राची जैन,प्राज्वल अग्रवाल,रोहित सहानी,अम्मार एजझी, मुनिरा सातकुरवाला, खाडिजा लोखंडवाला,लक्ष्मी मलबारी,कोमल पाटील, विराज पाटील, अजय परमार या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले आहे.
 
 
काय म्हणतात पानिपतच्या कामाबाबत विद्यार्थी
 
एक अद्भूतपूर्ण अनुभव : सौरव पटेल (इंटिरियर डिझाईन)
 
नितीन देसाई यांच्या नेतृत्वात काम करणे हा एक अभूतपूर्व अनुभव होता, आम्ही पानिपत चित्रपटातील शनिवार वाड्याच्या सेटवर केलेली मेहनत स्पष्टपणे पाहता आली! त्याच्यासोबत सेटवर काम करण्यासाठी आम्हाला दोन दिवसांचा वेळ मिळाला आणि आम्हाला वेळ व्यवस्थापन व मिनिटांचा तपशील महत्वाची भूमिका बजावण्यास खरोखर आला. आम्हाला खरोखरच समजले की चित्रपटात मोठा सेट कसा बनविला जातो . आम्हाला उत्तम संधी दिली आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये थेट प्रवेश दिला त्याबद्दल आम्ही खरोखरच धन्य आहेत.
 
 
झोकून दिल्याशिवाय यश नाहीच : जयेश जैन (आयडी)
 
स्पर्धात्मक जगात फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी मिळणे खरोखर कठीण आहे. पण आम्ही स्वतःला भाग्यवान आयएनआयएफडीयन म्हणू ज्याने आपण पानिपतचा सेट आणि डिझाइन करण्यात मदत केली. नितीनजी देसाई यांनी स्वत: चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगात काम करण्याच्या 34--35 वर्षांच्या प्रवासात स्वत: ला झोकून दिल्याशिवाय यश नसते, हे देसाई सरांकडून प्रत्यक्ष कामातून शिकायला मिळालं.
 
सेटवरचे ते भारावलेले दिवस : रितू मकडिया
 
जळगावसारख्या छोट्या शहरात राहत असल्यामुळे सेट डिझायनिंगच्या बाबतीत फिल्म इंडस्ट्रीच्या पातळीवर पोहोचणे खरोखर कठीण आहे. परंतु आयएनआयएफडीच्या माध्यमातून पानिपत या सिनेमातील शनिवारवाड्याच्या थेट सेटवर काम करण्याचे स्वप्न सत्यात उतरले. आमच्यासाठी अनुभव खूप छान होता.
 
पानिपतच्या सेटवर आम्ही काम केलय हे अविस्मरणीय : चार्मी नाथणी
 
दिवस आणि रात्र आम्ही एनडी स्टुडिओ कर्जत येथे पानिपतच्या संचावर काम केले. शनिवार वाड्याच्या रेखाटनांपासून संचाची वास्तविक निर्मिती होईपर्यंत लहान, लहान माहिती कळली. आम्ही चिखलाने भिंती आणि हाताने बनवलेल्या संरचनेवरील प्राचीन काळातील कमळांच्या रचनांच्या अंतर्गत आणि बाह्य डिझाइनचा उपयोग अप्रतिमपणे केला. पानिपतच्या सेटवर मी काम केलंय यावर विश्वास ठेवणं मला खूप कठीण गेलं.
 
 
नितीन देसाईसोबत काम करण्याचा अनुभव अतुलनीय : गुंजन फुलवाणी
 
नितीन देसाई सर यांच्यासोबत काम करणे हा एक अतुलनीय अनुभव होता. पानिपत या सिनेमातील शनिवारवाड्याच्या प्रत्यक्ष सेटवर काम करण्याची संधी त्यांनी आम्हाला दिली. आम्ही उत्तम वास्तू आणि अंतर्गत रचना एकत्रित केल्या. ऑन पेपर वर्क आणि वास्तविक काम खरोखर कठीण काम आहे. अशा मोठ्या व्यासपीठावर थेट कार्य करणे ही एक मोठी गोष्ट आहे.
 
ते दोन दिवस भारावल्यागत : यश आडवाणी
 
दिग्दर्शक नितीन देसाई सर यांनी आम्हाला पानिपतच्या सेटवर काम करण्याची मोठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. त्यांनी आमच्यातील कल्पकता व सृजशीलता विकसित करण्यासाठी मार्गदर्शन केले. आम्ही पानिपत सिनेमातील शनिवारवाड्याच्या सेटवर काम करण्यासाठी कर्जतच्या एनडीएस स्टुडिओत दोन दिवस काम केले. प्रचंड मेहनत घेऊन वाड्याचे मजले, भिंती, खांब अशा विविध बारीक बारीक बाबींवर काम केले. हे दोन दिवस खरोखरच अविस्मरणीय आणि भारावल्यागत होते.
 
 
‘फॅशन शो’ तून झाला एनडी फिल्म वर्ल्डशी करार : संगीता पाटील
 
 
a_1  H x W: 0 x
 
आयएनएफडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘फॅशन शो’च्या निमित्ताने दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हे आयएनएफडीतून पासआऊट झालेल्या विद्यार्थ्याच्या पारितोषिक वितरण आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी जळगावी आले होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेली वस्त्रप्रारूपे, इंटेरिअर डिजाईन्स पाहून श्री. देसाई प्रभावित झालेत. संस्थेतून शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांना करीअरच्या दृष्टीने संधी मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा झाली. त्यातून या विद्यार्थ्यांना फॅशन, सेट डिजाईन्स यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून संधी देण्याबाबत चर्चा झाली होती. या चर्चेचे फलित म्हणून एनआयएफडी आणि एनडी वर्ल्ड (नितीन देसाई फिल्म वर्ल्ड) यांच्यात करार करण्यात आला. त्या करारानुसार एनडी फिल्मच्या चित्रपटातील सेट उभारणी,वेशभूषा व इतर विविध कामकांचा प्रत्यक्ष अनुभव या विद्यार्थ्यांना इंटरर्नशिप म्हणून (प्रशिक्षणार्थी) देण्यात येणार आहे. या करारानुसार ‘पानिपत’चित्रपटातील शनिवारवाड्याचा सेट उभारण्यात या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले आहे. पुढील काही चित्रपटांतही या विद्यार्थ्यांसह अजून नवीन विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे संचालिका संगीता पाटील यांनी सांगितले.
 
नितीन देसाईंनी दिली खान्देशातील विद्यार्थ्यांना संधी
 

a_1  H x W: 0 x 
 
विख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या सोबत अनेक दिग्गज आणि वरिष्ठ अनुभवी काम करत असतात. अशा मोठ्या व्यक्तींसोबत साह्य करण्यासाठी मुुंबई पुण्यातील अनेक विद्यार्थी वाट पाहत असतात. परंतु ‘पानिपत’ या चित्रपटातील शनिवारवाड्याचा सेट उभारण्यााठी त्यांनी जळगावच्या एनएफआयडीच्या विद्यार्थ्यांना संधी दिली. या संधीचे विद्यार्थ्यांनी सोेने केले. पानिपत चित्रपट पाहतांना शनिवारवाडा जेव्हा दाखवला जाईल, तेव्हा या विद्यार्थ्यांनी केलेल्या सजावटींची आठवण येत राहील. विद्यार्थ्यांनाही पुढील करिअरसाठी या संधीचा संदर्भ देता येईल. नुसते शिक्षण देण्यावरच संगिता पाटील थांबत नाहीत तर त्यांना करीअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीही त्या प्रयत्न करीत असल्याचे हे यातून दिसून येते.