CAB विधेयक: शिवसेनेने अखेर वेळ मारून नेली

    दिनांक : 11-Dec-2019
नवी दिल्ली : राज्यसभेत आज नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले. गृहमंत्री अमित शाह यांनी सदनासमोर विधेयक चर्चेसाठी ठेवले. या दरम्यान शिवसेनेतर्फे संजय राऊत यांना बोल्याची संधी दिली असता त्यांनी शेवटपर्यंत या विधेयकास आपले समर्थन आहे कि विरोध हे सांगितलेच नाही. त्याची भूमिका निष्कर्ष न सांगताच संपली. त्यामुळे या विधेयकास समर्थन करायचे कि विरोध या धर्म संकटात सापडलेल्या शिवसेनेने अखेर वेळ मारून नेली असे म्हणण्यास हरकत नाही.

l_1  H x W: 0 x 
 
लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सादर केले तेव्हा शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यास पाठींबा दिला होता. परंतु शिवसेनेच्या या भूमिकेवर कॉंग्रेसने नाराजी व्यक्ती केली होती. त्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी व राष्ट्रवादी अशी ओळख असणाऱ्या शिवसेनेला महाविकास आघाडीमुळे समर्थन करता येत नाही व जनता नाराज होईल म्हणून विरोधही करता येत नाही. त्यामुळे शिवसेना चांगलीच कोंडीत सापडली होती. त्याचा प्रत्यय आज राज्यसभेतही आला.
खासदार संजय राऊत यांना आपली भूमिका मांडण्यासाठी तीन मिनिटाचा वेळ मिळाला होता. मात्र सुरुवातीचे तीन मिनिटे राऊत मुद्द्यापासून भरकटलेले दिसून आले. यानंतर उप सभापतींनी त्यांना आपला निष्कर्ष सांगा असे सांगितले, पण राऊत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत बोलतच राहिले. अखेरीस त्यांच्या माईकचा आवाज कमी करण्यात येऊन पुढील सदस्यांना बोलण्यास सांगितले. जवळपास पाच मिनिटाच्या भाषणात राऊत कधी समर्थनाच्या बाजूने तर कधी विरोधाच्या भूमिकेत दिसून आले. राऊत यांच्या या भूमिकेस कॉंग्रेस खासदारांनी चांगलीच दाद दिली. त्यामुळे आपल्या विचारधारेशी सुसंगत नसलेल्या पक्षासोबत सत्तेत बसून शिवसेनेची चांगलीच गोची होत असल्याचे दिसून येत आहे.