तालिबानसोबत पुन्हा चर्चा करणार- डोनाल्ड ट्रम्प

    दिनांक : 30-Nov-2019
अफगाणिस्तानातील तालिबानसोबत पुन्हा एकदा शांतताविषयक चर्चा करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी द्वी पक्षीय चर्चादरम्यान केली. मात्र, आपल्या सैनिकांना कधीपर्यंत मायदेशी बोलावणार याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
 
 
 
माहितीनुसार, थँक्स गिविंग डेच्या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प गुरुवारी अचानक अफगाणिस्तानात तालिबानशी दोन हात करत असलेल्या अमेरिकन सैनिकांना धन्यवाद देण्यासाठी पोहचले. ते काबुलमध्ये सुमारे अडीच तास थांबले. ट्रम्प प्रशासनाकडून मात्र या दौर्‍याची कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नव्हती. सुरक्षा कारणांमुळे अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनाही ट्रम्प यांचे विमान उतरण्यापूर्वीच सूचना देण्यात आली होती, असे राष्ट्रपती भवन सूत्रांनी सांगितले.
 
तालिबान आमच्यासोबत काही करार करू इच्छित आहे. जेव्हा आम्ही संघर्ष थांबवण्याच्या मानसिकतेत होतो, त्यावेळी त्यांची तशी काही इच्छा नव्हती. आता त्यांना संघर्षविराम हवा आहे. मात्र, हा प्रयोग यशस्वी होईल. मागील सहा महिन्यांच्या काळात अमेरिकेने चांगली प्रगती केली आहे. अफगाणिस्तानात सद्य:स्थितीत 14 हजार सैनिक असून, ही संख्या 8 हजार 600 वर आणणार असल्याचेही ट्रम्प यांनी यावेळी सांगितले. लष्करी अधिकार्‍यांनी मात्र याबाबत कोणतीही पुष्टी केली नाही.
 
याशिवाय ट्रम्प यांनी काबुलमधील बगराम एअर फील्डवर असलेल्या सैनिकांची भेट घेतली. त्यांच्यासोबत जेवण केले. तसेच, छायाचित्रेही काढले. यानंतर त्यांनी अफगाणचे राष्ट्रपती अशरफ गनी यांची भेट घेतली.
 
थँक्स गिविंग डे
 
अमेरिकेत नोव्हेंबरच्या चौथ्या गुरुवारी थँक्स गिविंग डे साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण देशात सुटी घोषित केलेली असते. सर्व जण आपले मित्र, नातेवाईक, आणि इतरांचे आभार मानतात. सन 1789 मध्ये कॉंग्रेसच्या (अमेरिकन संसद) आग्रहानंतर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी थँक्स गिविंग डेची सुरुवात केली होती.