जागतिकीकरणाच्या युगात स्वयंजाणीव जागृत करणारा 'निर्बान' चित्रपट

    दिनांक : 30-Nov-2019
गोव्यात सुरु असलेल्या 50 व्या इफ्फीच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते बंगाली दिग्दर्शक गौतम हलदर यांची पत्रकार परिषद झाली. या महोत्सवात दाखवण्यात आलेल्या ‘निर्बान’ या बंगाली चित्रपटाच्या कथानकाविषयी त्यांनी माहिती दिली. आज जागतिकीकरणाच्या युगात खोट्या, बनावट श्रद्धा, सत्तेसाठीचा मोह आणि हिंसा पसरली आहे. या सगळ्या गदारोळातून बाहेर पडण्यासाठी एकमेव उपाय स्वयंजाणीवेत लपला आहे. त्यामुळे आपण सभोवतालाचे निरीक्षण करण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे हलदर यांनी सांगितले.

 
इफ्फीमध्ये त्यांच्या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. प्रेक्षकांचा प्रतिसाद हाच सर्वात मोठा पुरस्कार असतो, असे ते म्हणाले. माहितीपट बनवण्यात आपल्याला अधिक रस आहे, असेही त्यांनी सांगितलं. गावागावांमध्ये माहितीपट दाखवले गेले तर वेगळी चित्रपट संस्कृती निर्माण होईल. हा उपक्रम फार खर्चिक नाही त्यामुळे त्याचा विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पंकज जोहर यांचा ‘सत्यार्थी’ हा चित्रपटही या महोत्सवात दाखवण्यात आला. नोबेल पुरस्कार विजेते मानवतावादी समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांच्या जीवनावर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. मानवी तस्करी विशेषत: लहान मुलांच्या लैंगिक शोषण आणि देह व्यापाराविरोधात सत्यार्थी गेली अनेक वर्ष कार्य करत आहेत. या चित्रपटातून त्यांचा हा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असे जोहर यांनी सांगितले.