सर्वाधिक सायबर गुन्ह्यात नाशिकनंतर जळगावचा क्रम

    दिनांक : 25-Nov-2019
--निलेश वाणी
 
जळगाव: क्रांतीने जग झपाट्याने बदलत आहे. तसाच बदल गुन्हेगारी क्षेत्रात होत असून ऑनलाईन होणार्‍या गुन्ह्यांची गंभीरता अधिक असूनसुध्दा समाजात आपली बदनामी होईल या भीतीपोटी अनेक लोक तक्रार दाखल करत नाहीत. असे असले तरी नाशिक विभागात नाशिक सायबर पोलीस ठाण्यानंतर सर्वाधिक ५४ सायबर गुन्हे जळगाव सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. आश्‍चर्य म्हणजे फसवणुकीच्या तक्रारी दाखल करणार्‍यांपेैकी ८० टक्के तक्रारदार हे उच्चशिक्षित आहेत.
याबाबत जळगाव सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंगद नेमाने यांच्याशी ‘जळगाव तरुण भारत’ने संवाद साधला असता ते म्हणाले, जानेवारीपासून आजपावेतो सायबर संबंधित ५४ गुन्हे येथे नोंद झाले आहेत. त्यातील ४५ टक्के गुन्हयांचा सखोल तपास झालेला आहे. सायबरबद्दलच्या अज्ञानामुळे नागरिकांची फसवणूक होत असते. ‘क्विकहिल’ या ऍन्टीव्हायरस कंपनीने निवडक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देवून प्रत्येक तालुक्यातील विद्यालयांमध्ये प्रबोधन आणि जनजागृती केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक फसवणूक
 
ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक प्रकरणे ही बँकिंग क्षेत्राशी संबधित आहेत. बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानाने होणार्‍या नवनवीन बदलांबद्दल ग्राहक अनभिज्ञ असतात. ‘फेक कॉल’च्या माध्यमातून फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर नागरिक करत असतात. परंतु इंटरनेटवर उपलब्ध असलेली सर्वच माहिती सत्य नसते. त्यामुळे फसवणूक होऊ शकते. यासाठी पटना येथील गुन्हेगाराने एका नामांकित संकेतस्थळाच्या बनावट नावाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
गोपनीय कोड किचकट ठेवा
 
इंटरनेटचा आणि सोशल मिडीयाचा वापर करतांना नागरिक स्वत:ची व्यक्तिगत व गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तीस शेअर करत असतात. याचाच लाभ सायबर क्राईम करणारे गुन्हेगार घेतात. हे लोक त्यांच्या इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या खात्यांचा गोपनीय कोड सरळसोपा ठेवतात. त्यामुळे ते कोड सायबर गुन्हेगार सहज मिळवतात. त्यामुळे गोपनीय कोड हा किचकट स्वरुपाचा ठेवला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
 
सर्वाधिक सायबर ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांचे केंद्र झारखंड- सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणणे कठिण असले तरी सायबरबद्दल जनजागृती केल्यास फसवणुकीचे प्रमाण कमी करता येईल. सायबर गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी कायदा अधिक कठोर असावा. अशा ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांचे केंद्र झारखंड असल्याचेही अनेक गुन्ह्यांमधून समोर आल्याचे ते म्हणाले. ऑनलाईन फसवणुकीसोबत आता एटीएम कार्ड क्लोनिंग करुन फसवणुकीचे प्रकार होतात. यात गुन्हेगारांचा छडा लावणे जिकिरीचे असते. ही फसवणूक टाळण्यासाठी बँकांनी क्लोनिंग करता न येणारे एटीएम कार्ड ग्राहकांसाठी उपलब्ध केले पाहिजे. तसेच प्रत्येक एटीएम मशिनजवळ सुरक्षा रक्षकाची नेमणूक केल्यास या प्रकाराला आळा घालता येईल.ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी विविध ऍपचा वापर होतो. परंतु भिम ऍप अन्य ऍपच्या तुलनेत सुरक्षित आहे. सायबर क्राईममध्ये आर्थिक फसवणुकीबद्दल दाखल गुन्ह्यांपैकी एकही गुन्हा भिम ऍपवरुन झाल्याचे आढळले नाही.
 
विद्यालयात माहिती दिल्यास टळू शकेल फसवणूक
 
इंटरनेटमुळे जसे ज्ञानाचे भांडार उघडे झाले आहे तसे या क्षेत्रातील अज्ञानाचा लाभ घेत सायबर गुन्हेसुध्दा वाढले आहेत. विद्यालयात संगणक विषयासोबतच सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याची माहिती दिल्यास भविष्यातील फसवणूक टाळता येऊ शकते. ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. परंतु समाजात प्रतिष्ठा जाईल या भीतीपोटी अनेक जण तक्रार दाखल करत नाहीत. प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबरचे ज्ञान असलेला तज्ञ कर्मचारीवर्ग नसल्यानेसुध्दा अडचणी येतात.
 
ऑनलाईन व्यवहार करतांना काळजी घ्या
 
ऑनलाईन फसवणूक होणार्‍यांमध्ये अशिक्षितांपासून उच्च  शिक्षितांपर्यंत नागरिकांचा समावेश आहे. आपली गोपनीय
माहिती कोणासही सांगू नका. पासवर्ड किचकट ठेवा आणि काही दिवसांनी बदलून घ्यावा. सर्व खात्यांना एकच पासवर्ड
ठेवू नये. ऑनलाईन व्यवहार करतांना काळजी घ्यावी. 
 
         
 
-अंगद नेमाने, पोलीस उपनिरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, जळगाव