पशूंवर अवकळा ... लंपी चर्म रोगामुळे राज्यात २५ पशूंचा मृत्यू :

    दिनांक : 08-Sep-2022
Total Views |
जळगांव : लंपी चर्म रोगाची साथ आतापर्यंत राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ५९ तालुक्यांत पोहोचली आहे. तर लंपी चर्म रोगामुळे राज्यात २५ पशूंचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.
 


lumpi1
 
 
 
 
राज्यामध्ये जळगाव, नगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी आणि सोलापूर या १७ जिल्ह्यांमध्ये आजअखेर १६० गावांमध्ये लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
 
बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील ७४८ गावातील दोन लाख ८० हजार पशुधनाचे लसीकरण झाले आहे. बाधित गावांतील १,४३५ बाधित पशुधनांपैकी ८९५ पशुधन उपचाराने बरे झाले. तर जळगाव जिल्ह्यातील १२, नगर जिल्ह्यात ४, पुणे जिल्ह्यात ३, बुलडाणात २, अमरावतीत ३ आणि अकोल्यात एक अशा एकूण २५ बाधित पशुधनाचा मृत्यू झाला. लंपी चर्म रोग हा गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. तो जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. हा संसर्गजन्य आजार असून, पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
 
आजाराची लक्षणे
 
जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येणे, सुरुवातीस ताप येणे, दूध उत्पादन घटणे, चारा खाणे, पाणी पिणे कमी होणे. डोके, मान भागात त्वचेवर गाठी येणे. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येणे. दृष्टी बाधित होणे. पायावर सूज येऊन लंगडणे.
 
पशुसंवर्धन मंत्री  घेणार आढावा 
 
महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे गुरुवारी (ता. ८) सप्टेंबर जळगाव व अकोला जिल्ह्यातील लंपी चर्म रोगाने बाधित गावांचा दौरा करणार आहेत. पशुपालक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सद्य:स्थितीचा आढावा घेतील. त्यांच्यासमवेत पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह उपस्थित राहणार आहेत.