धानोऱ्यामध्ये गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण

    दिनांक : 07-Sep-2022
Total Views |
हिंदुत्वनिष्ठांकडून पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्याची मागणी !
 
जळगाव : चोपडा तालुक्यातील धानोरा येथे ४ सप्टेंबर या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी निरपराध गणेशभक्तांवर पोलिसांनी विनाकारण अमानुष लाठीमार केला. यात अनेक जण घायाळ झाले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या संदर्भात 'सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ जळगाव', सकल हिंदु समाज, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांनी जळगाव जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन या घटनेचा निषेध केला. तसेच संबंधित रझाकारी वृत्तीचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे त्वरित निलंबन करण्याची मागणी करून निवेदन दिले. चोपडा येथेही तहसीलदारांना हिंदुत्वनिष्ठांनी या संदर्भात निवेदन दिले.

hindutvnishtha 
  
 
धानोरा येथे घडलेली घटना
 
१. श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी १० वाजता मिरवणुकीतील वाजंत्री बंद करण्यास सांगितली; पण प्रत्यक्षात पोलिसांनी ११ वाजेपर्यंत अनुमती दिली असल्याने कार्यकर्त्यांनी पोलिसांना तसे सांगितले. त्यावर पोलिसांनी काही ऐकून न घेता दडपशाहीची भूमिका घेत सर्व गणेशभक्तांवर मोठ्या प्रमाणात लाठीमार केला. दुपारीही पोलिसांनी किरकोळ कारणावरून ५ कार्यकर्त्यांना अटक केली.
 
२. प्रत्यक्षात त्या दिवशी गावात २ जणांचा मृत्यू झाल्याने मिरवणूक विलंबाने निघाली होती. मशिदीच्या परिसरातूनही २ मंडळांची मिरवणूक शांततेने गेली. तिसर्‍या मंडळाची शेवटची मिरवणूक जात होती. तेव्हा पोलिसांनी वाजंत्री बंद करण्यास सांगून वाजंत्रीवाल्यांना मारहाण करू लागले. त्या वेळी कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी लाठीमार चालू केल्याने ग्रामस्थांनीही पोलिसांवर दगडफेक चालू केली. त्यामुळे पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला.
 
३. काही ग्रामस्थांनी 'सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे यांना अटक होत नाही, तोपर्यत विसर्जन करणार नाही', अशी भूमिका घेत ठिय्या आंदोलन केले. रात्री विलंबाने पोलिसांनीच काही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले.