‘नोबेल’विजेता विकृत बिशप

    दिनांक : 30-Sep-2022
Total Views |
 
इंडोनेशियाच्या ताब्यातील ईस्ट तिमोरच्या स्वातंत्र्यासाठी शांततामय मार्गाने अहिंसक अभियान चालवल्याने की त्याच काळात गरिबाघरच्या मुलांचे लैंगिक शोषण केल्याने? की आपण केलेल्या लैंगिक शोषणाची कुठेही वाच्यता करू नये म्हणून गरिबाघरच्या मुलांना शांत राहण्यासाठी भीती दाखवल्याने?
 
 

bishap 
 
गेल्या काही काळापासून येशूभक्तीत तल्लीन(?) झालेल्या फादर, बिशपनी जगभरातल्या अल्पवयीन मुला-मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या अनेक घटना समोर आल्या. त्यातल्या काही घटना चर्चमधल्या होत्या, काही अनाथाश्रमातल्या होत्या, तर काही शाळांमधील होत्या. आताही अशीच एक घटना उघडकीस आली असून आरोपी चर्चचा बिशप तर आहेच, पण त्याचबरोबर त्याला शांततेचे नोबेल पारितोषिकही देण्यात आलेले आहे! बिशप कार्लोस फिलिपे जिमेनेस बेलो असे त्यांचे नाव असून ते 1980-90च्या दशकात दक्षिण-पूर्व आशियातील ईस्ट तिमोर देशातल्या चर्चमध्ये कार्यरत होते. आपल्या बिशपपदाच्या काळात त्यांनी ईस्ट तिमोरमधल्या गरिबाघरच्या मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यासंबंधीचे वृत्त एका ‘डच’ नियतकालिकाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. तसेच, बिशपने लैंगिक शोषण केलेल्या पीडितांनीही आपले अनुभव कथन केले असून याप्रकरणी बिशपच्या माफीचीही मागणी केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, ख्रिश्चनांची सर्वोच्च धर्मसंस्था असलेल्या व्हॅटिकन सिटीच्या प्रवक्त्यानेही या प्रकरणात बिशप कार्लोस यांची चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
पण, चर्चमधील फादर वा बिशप तर येशूपुढे नतमस्तक झाल्याचे म्हटले जाते. ते संबंधित चर्चच्या अखत्यारितील प्रदेशात धर्मशिक्षणही देतात. त्यात प्रामुख्याने नीतिमत्ता, मूल्ये वगैरेंची शिकवण देत असल्याचेही सांगितले जाते. मग, अशा पदावरील व्यक्ती इतक्या मोठ्या प्रमाणावर चर्च, अनाथाश्रम वा शाळेत येणार्‍या मुला-मुलींचे लैंगिक शोषण का करते? कारण, अशी एक नाही शेकडो प्रकरणे चव्हाट्यावर आली असून कदाचित हजारो प्रकरणे दडपलेलीही असतील. त्यातल्या ईस्ट तिमोरमध्ये 30-40 वर्षांपूर्वी घडलेले प्रकरण आता समोर आले अन् त्यानंतरच्या काळात घडलेली अशीच काही प्रकरणे आणखी 10-20-30-40 वर्षांनी समोर येतील. त्यामुळे व्हॅटिकन सिटीने आरोप झालेल्या फादर, बिशप वगैरेंची चौकशी करण्याबरोबरच त्यांनी कोणाचेही लैंगिक शोषण करू नये, अशी तजवीज करून ठेवायला हवी, जेणेकरून प्रत्येकवेळी वर सज्जनतेचा मुखवटा चढवून प्रत्यक्षात दुर्जनांची कृत्ये करणार्‍या फादर, बिशपमुळे ख्रिश्चन धर्म, त्यांचे चर्च, त्यांचे अनाथाश्रम, त्यांच्या शाळांचे नाव खराब होणार नाही वा पोपला माफीही मागावी लागणार नाही.
 
बिशप कार्लोस फिलिपे जिमेनेस बेलो यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून ‘नोबेल’ पारितोषिकाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते. जगातले सर्वोच्चपारितोषिक म्हणून उल्लेख केल्या जाणार्‍या ‘नोबेल’पारितोषिक निवड समितीत नेमके कोण असतात? ‘नोबेल’पारितोषिक देण्यासाठी नेमके कोणते निकष लावले जातात? ‘नोबेल’ पारितोषिकासाठी निवडल्या जाणार्‍या व्यक्तीची पार्श्वभूमी तपासली जात नाही का? बिशप कार्लोस यांना ‘नोबेल’पारितोषिक निवड समितीने ‘नोबेल’ पारितोषिक दिले ते नेमके कोणत्या शांतीतील क्रांतीसाठी? इंडोनेशियाच्या ताब्यातील ईस्ट तिमोरच्या स्वातंत्र्यासाठी शांततामय मार्गाने अहिंसक अभियान चालवल्याने की त्याच काळात गरिबाघरच्या मुलांचे लैंगिक शोषण केल्याने? की आपण केलेल्या लैंगिक शोषणाची कुठेही वाच्यता करू नये म्हणून गरिबाघरच्या मुलांना शांत राहण्यासाठी भीती दाखवल्याने? ‘नोबेल’पारितोषिकाच्या विश्वासार्हतेबाबत आताच प्रश्न उपस्थित झालेत असे नाही, 2014 साठी मलाला युसुफजाईला ते जाहीर झाल्यावरही प्रश्न विचारलेच गेले होते व ते रास्त होते.
 
मलालाने धर्मांधांच्या हल्ल्यांपुढे हार न मानता इस्लामी राष्ट्रात शिक्षणाची जिद्द दाखवल्याने ‘नोबेल’पारितोषिक दिल्याचे सांगितले जाते. पण, गेल्या आठ वर्षांत मलाला युसुफजाईने इस्लामी राष्ट्रांत अन्याय-अत्याचार सहन करणार्‍या महिलांसाठी काय केले? ते सोडा, आता तर इराणमधील महिलांनी ‘हिजाब’सक्तीविरोधात जोरदार आंदोलन छेडले आहे. पण, मलालाने इराणमधील वा कुठल्याही इस्लामी राष्ट्रातील महिलांसाठीच्या जाचक कायद्याविरोधात, शरिया वा कुराणातील आदेशाविरोधात शब्दही काढलेला नाही. त्यावरुनच तिला दिल्या गेलेल्या ‘नोबेल’ पारितोषिकाचा फोलपणा दिसून येतो, तर बिशप कार्लोसफिलिपे जिमेनेस बेलो यांच्यावरील मुलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवरुनही ‘नोबेल’पारितोषिकाचा दर्जा खालावल्याचे स्पष्ट होते. ‘नोबेल’पारितोषिक निवड समितीने यापुढेही कोणालाही उठून ‘नोबेल’पारितोषिक दिले, तर त्याचे महत्त्व संपायला वेळ लागणार नाही.
 
युरोपातील आपल्या मुख्य स्थानातून बाहेर पडत ख्रिश्चन मिशनर्‍यांनी जगातल्या सर्वच देशांत बस्तान बसवले. त्यामागे त्या त्या देशातल्या स्थानिक धर्मानुयायांचे धर्मांतर करण्याचा त्यांचा प्रधान हेतू होता. त्यासाठी त्यांनी अन्नधान्य देण्याची, शिक्षण देण्याची, अनाथांना छत देण्याची, आरोग्य सुविधा देण्याची बनवेगिरी केली. त्या माध्यमातून जो जो संपर्कात येईल, त्याच्याकडे बाप्तिस्मा करण्यासाठीचे सावज म्हणूनच पाहिले गेले. त्यातूनच गेल्या दोन हजार वर्षांत ख्रिश्चन धर्मीयांची जगातली संख्या वाढली व संबंधित देशांतले स्थानिक धर्म नामशेष झाले. पण, धर्मांतराच्या जोडीलाच आता ख्रिश्चन मिशनर्‍यांवर किंवा चर्चमधील फादर, बिशप वगैरेंवर लैंगिक शोषणाचे आरोप होऊ लागले आहेत. त्यातून हे लोक गरीब देशात धर्मांतराबरोबरच आपल्या मनातील विकृतीची भूक भागवण्यासाठीही जात होते का, त्यासाठी गरिबांना मदतीचे, सहकार्याचे नाटक रचत होते का, हेही प्रश्न उपस्थित होतात.
 
गरीब असल्याने समोरचे लोक आपल्याविरोधात काही करणार नाहीत, आपण शक्तिशाली आहोत, आपल्याला कोणीही हात लावू शकणार नाहीत, अशीच मानसिकता यामागे असू शकेल. त्यामुळे गरीब देशांतल्या गरिबांवर अन्याय-अत्याचार करण्यासाठी बिशप कार्लोस फिलिपे जिमेनेस बेलो यांच्यासारख्यांना मोकळे रानच मिळत असणार. ईस्ट तिमोरमधील पीडितदेखील त्या काळी आम्हाला भीती वाटत असल्याने आम्ही लैंगिक शोषणाची कुठेही वाच्यता केली नाही, असे म्हणतात. यावरून शुभ्र झगे घालून स्वतःला पावित्र्याचे प्रतीक म्हणून दाखवणार्‍यांची बीभत्सताच समोर येते.