‘ड्रोन’ तंत्रज्ञान उपयोग आणि उपयुक्तता

    दिनांक : 03-Sep-2022
Total Views |
‘ड्रोन’चे तंत्रज्ञान व कार्यपद्धती याबाबी भारत आणि भारतीयांसाठी नव्या आहेत. मात्र, अल्पावधीतच त्यांची उपयुक्तता विविध क्षेत्रांमध्ये सिद्ध झाली आहे.
 
 
 

drone 
 
 
 
 
ड्रोन’ हा ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान यांचा नव्या संदर्भातील उपयुक्त आविष्कार. विशेष संशोधनापोटी ‘ड्रोन’ची निर्मिती झाली व त्याचे बहुविध उपयोग सर्वांना लक्षात आले व तेही अल्पावधीत! त्यामुळेच ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा केवळ प्रयोग न ठरता, त्याचे उपयोग व्यक्तीपासून व्यवसायापर्यंत व शेतीपासून शासनव्यवस्थेपर्यंत सर्वत्र उपयोगात येत असून, त्यामध्ये ज्या पद्धतीने वाढ झाली ते पाहणे अर्थातच लक्षणीय ठरते.आता हेच बघा ना, दिल्लीजवळच्या गुरुग्राम येथील ‘स्काय मोबिलिटी’ या कंपनीने आपल्या ग्राहकांची साधने व वस्तू विविध ठिकाणी पोहोचविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत सुमारे १५०० तास ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा वापर यशस्वीपणे केला आहे. कंपनीचा हा प्रायोगिक प्रयत्न होता व त्याला अपेक्षेहून अधिक यश प्राप्त झाले, हे विशेष! कंपनीने या दरम्यान महत्त्वाचे कागदपत्र व दस्तावेज वैद्यकीय अहवाल, कोरडी वनौषधी, काही विशेष सामान यांची वाहतूक यशस्वीपणे करण्याचा शुभारंभ व्यावसायिक स्वरुपात केला.
 
‘ड्रोन’चा वापर प्रशासनिक स्तरावर होण्याचा अन्य यशस्वी प्रयोग टपाल खात्यातर्फे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातही करण्यात आला. भौगोलिकदृष्ट्या कच्छच्या सुमारे ४६ किलोमीटर वाळवंटी प्रदेशात टपाल वाहतूक ‘ड्रोन’द्वारे करण्यात आली. ‘ड्रोन’ला या परिसरात वापराची परवानगी यावर्षी जूनमध्येच देण्यात आली, हे यासंदर्भात उल्लेखनीय. मुख्य म्हणजे, याठिकाणी वापरण्यात आलेले ‘ड्रोन’ पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे होते. या ‘ड्रोन’ची निर्मिती विशेषत: कृषीविषयक कामासाठी ‘लो-टेक वर्ल्ड एव्हिशन’ या ‘स्टार्ट अप’ कंपनीद्वारे करण्यात आली.भारतीय रेल्वेनेसुद्धा आपल्या कामकाजाला ‘ड्रोन’च्या उड्डाणाची जोड दिली आहे. रेल्वेने आपल्या प्रकल्प व्यवस्थापन व विशेषत: पूल निरीक्षण या जटिल कामांसाठी ‘ड्रोन’चा उपयोग करण्यास सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे व अधिकार्‍यांच्या मते अद्ययावत व वेगवान तंत्रज्ञान हे ‘ड्रोन’ आधारित कार्यपद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे व त्याचा रेल्वे प्रशासन आणि कामकाजाला कमी वेळ व श्रमात मोठा फायदा होत आहे.
 
‘ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष स्मिथ शहा यांच्या मते, कृषीपासून संदेशवहन व व्यावसायिक क्षेत्र या सार्‍यांमध्ये आज ‘ड्रोन’चा संचार आणि वापर यशस्वीपणे होत आहे. ‘ड्रोन फेडरेशन’चे आज देशात २०० हून अधिक सदस्य असून सुमारे दोन हजार ‘ड्रोन’चालक संस्थेशी संबंधित आहे. या आकडेवारीवरुन ‘ड्रोन’चा वापर व उपयुक्तता दोन्ही स्पष्ट होते.स्मिथ शहा यासंदर्भात ‘प्रोजेक्ट संजीवनी’ या विशेष उपक्रमाचा उल्लेख करतात. हा प्रकल्प नवी दिल्ली येथील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ व संंस्थेचे जझ्झर येथील उपचार केंद्र यादरम्यान राबविण्यात येतो. ५० किमीच्या अंतरावरील या उपचार केंद्रावर महत्त्वाचे कागदपत्र पाठविण्यासाठी आधी दोन तास लागायचे. ते काम आता ‘ड्रोन’द्वारे सुमारे ३० मिनिटांत सहजगत्या केले जाते. मुख्य म्हणजे, या दरम्यान ‘ड्रोन’ला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ व सफदरजंग विमानतळ या दोन विमानतळ परिसरातून अधिक सावधपणे व विशेष काळजीपूर्वक प्रवास करावा लागतो.
 
‘संजीवनी’ प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात ‘एम्स’तर्फे दिल्ली व जझ्झर दरम्यान रुग्णांच्या रक्तांचे नमुने, प्रसंगी रक्तपुरवठा करणे यांसारखी कामे वेळेत व गरजेनुरुप करण्यात भर दिला जाणार आहे. यासाठी ‘ड्रोन’च्या वापराला प्राधान्य दिले जाणार आहे. विमानतळ परिसरातून सुरक्षित ‘ड्रोन’ वाहतूक करण्यासाठी ‘टेक-ईगल’ ही ‘स्टार्ट अप’ कंपनी विशेष प्रयत्नशील आहे.‘ड्रोन’चे उड्डाण व त्याचा वापर आणि प्रसार याबाबत यानिमित्ताने विचार करणे आवश्यक ठरते. ‘स्काय एअर मोबिलिटी कंपनी’चे मुख्याधिकारी अंकित कुमार यांच्या सुमारे एक वर्षापूर्वी ‘ड्रोन’ आणि त्याचा वापर ही एक तांत्रिक संकल्पना होती. मात्र, केवळ एक वर्षात ‘ड्रोन’चे तंत्रज्ञान आणि वापर याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. सुरुवातीला छोटेखानी विमानाच्या ‘एरोमॉडेलिंग’मधून ‘ड्रोन’चा अवतार झाला. तंत्रज्ञानापासून संरक्षणापर्यंत विविध मुद्दे लक्षात घेता सरकारने त्यावर निर्बंध घातले. मात्र, विकसित झालेले तंत्रज्ञान व ‘ड्रोन’चे व्यावहारिक व्यावसायिक फायदे यातून सरकारने आज ‘ड्रोन’पद्धतीसाठी विशेष धोरण पद्धती विकसित तर केलीच. शिवाय त्याला आता प्रोत्साहन दिलेले दिसते आहे.
 
सरकारची ‘ड्रोन’निर्मिती आणि त्यांचा वापर यातील प्रमुख टप्पे पाहण्यासारखे आहेत. याला लक्षणीय स्वरूप शासकीय स्तरावर मार्च २०२१ मध्ये लाभले. त्यावेळी शासकीय स्तरावर ‘ड्रोन’च्या संदर्भात नवे नियम लागू करण्यात आले, त्यावर संबंधितांकडून सूचना मागविण्यात येऊन त्यावर विचार करण्यात आला. या सूचना व मुद्द्यांची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली. अंतिमत: ऑगस्ट २०२१ मध्ये शासनातर्फे ‘ड्रोन’च्या संदर्भात व्यापक व परिणामकारक धोरण व नियमावली प्रकाशित झाली. त्यामुळेच ‘ड्रोन’च्या तंत्रज्ञानाला व्यावसायिक व्यवहार आणि उपयुक्ततेची साथ मिळाली, हे विशेष...
 
पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख, ६० हजार गावांचे ‘ड्रोन’च्या वापराच्या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार ‘ड्रोन’ तंत्रज्ञानचा उपयोग शेतीपासून वस्तूपुरवठा, निगराणी, दळणवळण या विविधकामी होऊ शकतो, हे सिद्ध झाले. दिल्ली-पानीपत या सुमारे १२० किलोमीटर लांबीच्या क्षेत्रात आपल्या पाईपलाईनची निगराणी व निगा राखण्यासाठी ‘इंडियन ऑईल’ने ‘ड्रोन’चा वापर सुरु केला, हा पथदर्शी प्रयत्न यशस्वी ठरल्याने त्याचे अनुकरण केले जाऊ लागले. शेतकर्‍यांच्या समूहशेतीपासून खाण कंपन्यांपर्यंत ‘ड्रोन’चा वापर केला जाऊ लागला व त्याचा वाढतच गेला.
 
‘ड्रोन’ व्यवस्था व व्यवस्थानाला आता आघाडीच्या कंपन्यांचे पण पाठबळ मिळू लागले. सुरुवातीला २०१९ मध्ये ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ने ‘ऑस्ट्रिया एरोस्पेस कंपनीत गुंतवणूक केली. यावर्षी ‘अदानी टेक्नोलॉजिक लिमिटेड’ या ‘ड्रोन’ कंपनीमध्ये ५० टक्के भाग भांडवल गुंतविले. दोन्ही कंपन्यांचे मुख्यालय बंगळुरु येथे असून त्यांच्या व्यावसायिक विस्तार योजना तयार आहेत. ‘ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया’ या ‘ड्रोन’ क्षेत्रातील शिखर संस्थेनुसार भारतात ‘ड्रोन’ व्यवसायाची क्षमता सुमारे ५० हजार कोटी आहे व त्यामुळे व्यवसायवाढीसह नोकरी-रोजगाराचे नवे क्षेत्र उपलब्ध होणार आहे.थोडक्यात म्हणजे, ‘ड्रोन’चे तंत्रज्ञान व कार्यपद्धती याबाबी भारत आणि भारतीयांसाठी नव्या आहेत. मात्र, अल्पावधीतच त्यांची उपयुक्तता विविध क्षेत्रांमध्ये सिद्ध झाली आहे. कृषी क्षेत्रासाठी विशेष स्वरुपातील ‘किसान ड्रोन’ची निर्मिती ही याचेच परिचायक आहे. ड्रोनद्वारे उद्योग-व्यवसाय क्षेत्रात आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. व्यवसाय कृषी विकासाला अद्ययावत स्वरुपातील सेवा उपलब्ध करुन देणारे हे क्षेत्र शहरीच नव्हे, तर ग्रामीण विभागांसाठी युवकांना स्वयंरोजगार रोजगार देणार क्षेत्र ठरणार आहे.
 
- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर सल्लागार आहेत.)