कंपनी मुख्याधिकारी स्तरावरील ‘नाराजीनामा’- एक कारणमीमांसा

    दिनांक : 23-Sep-2022
Total Views |
 
कंपनी मुख्याधिकारी स्तरावरील ‘नाराजीनामा’ प्रकारांच्या वाढत्या प्रमाणामुळे कंपनी व्यवस्थापनापुढे नेतृत्वविषयक उपलब्धतेची वाढती समस्या निर्माण झाल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणाद्वारे दिसून आले आहे. तेव्हा, या सर्वेक्षणातील ठळक निष्कर्ष आणि व्यवस्थापकांची भूमिका यांची कारणमीमांसा करणारा हा लेख...
 
कंपनी स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा मुख्याधिकारी स्तरावर नोकरी सोडण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ’इकोनॉमिक टाईम्स’ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही बाब प्रकर्षाने दिसून आली. प्रस्थापित वा मोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील सुमारे 40 टक्के मुख्याधिकार्‍यांनी गेल्या तीन वर्षांत आपल्या पदाचा राजीनामा देऊन इतरत्र जाण्यास पसंती दिली आहे. कंपनी मुख्याधिकारी स्तरावरील ‘नाराजीनामा’ प्रकारांच्या वाढत्या प्रमाणामुळे कंपनी व्यवस्थापनापुढे नेतृत्वविषयक उपलब्धतेची वाढती समस्या निर्माण झाल्याचे, पण या सर्वेक्षणाद्वारे दिसून आले आहे.
 
’इकोनॉमिक टाईम्स’च्या या सर्वेक्षणात 220 कंपन्यांच्या मुख्याधिकार्‍यांचा सहभाग होता. 2019 पासून यापैकी 90 म्हणजेच सुमारे 90 टक्के मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी राजीनामा देऊन कंपनी बदलण्याचे प्रांजळपणे मान्य केले. राजीनामा देणार्‍या या वरील व्यवस्थापकांच्या संख्येचे विश्लेषण महत्त्वाचे व संबंधितांना मार्गदर्शक ठरते.
 
मुख्याधिकारी अथवा मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे जे उद्योगश: विश्लेषण या सर्वेक्षणात करण्यात आले, त्यानुसार मुख्याधिकार्‍यांचे गेल्या तीन वर्षांत व राजीनामा देण्याची संख्या व टक्केवारी वित्तीय सेवा क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे 59 टक्के होती. त्यानंतरचे प्रमाण म्हणजे ग्राहक सेवा क्षेत्र 51 टक्के व उत्पादन क्षेत्रातील जवळजवळ निम्म्या म्हणजेच 49 टक्के मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी या कालावधीत राजीनाम्याचा मार्ग पत्करल्याचे सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले.
 
बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी व जागतिक स्तरावर मुख्याधिकार्‍यांसह कंपनीच्या सर्वोच्च व्यवस्थापकांचे गेल्या काही वर्षांतील राजीनामे व नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण आणि टक्केवारीचे संकलन-विश्लेषण व विवरणासाठी जागतिक स्तरावरील व्यवस्थापक निवड संख्या असणार्‍या ‘ईएमए पार्टनर्स’ या व्यवस्थापन संस्थेचे ‘इकोनॉमिक टाईम्स’च्या सर्वेक्षणासाठी विशेष सहकार्य लाभले, हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.
 
सर्वेक्षणातून उपलब्ध माहितीनुसार, गेल्या दहा वर्षांत राष्ट्रीय शेअर बाजाराशी संबंधित अशा 200 प्रतिष्ठित कंपन्यांच्या सुमारे 200 मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी राजीनामा देण्याचा मार्ग चोखळला. याा संख्येचे अधिक विश्लेषण करता असे स्पष्ट झाले की, राजीनामा देणार्‍या 200 मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांपैकी 26 म्हणजेच 13 टक्के मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आपल्या कारकिर्दीचे पहिले वर्षसुद्धा पूर्ण केले नव्हते. त्यातील तुलनेने अधिक म्हणजे 119 अशा 59 टक्के मुख्याधिकार्‍यांनी पाच वर्षांपर्यंत सेवा केली होती. केवळ 16 म्हणजेच आठ टक्के मुख्याधिकार्‍यांनी आपल्या कारकिर्दीचे दशक पूर्ण केले होते. हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.
 
वरील सर्वेक्षण, त्यातील आकडेवारी-संख्या व राजीनामा देऊन कंपनी सोडणार्‍या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा सेवा कालावधी या सर्वांचीच नोंद उभ्या ’कॉर्पोरेट’ जगताने घेणे स्वाभाविक होते. त्यानुसार प्रामुख्याने प्रमुख कंपन्यांच्या संचालक मंडळांनी आपापल्या व्यावसायिक गरजा, व्यवस्थापनविषयक प्राधान्य यानुसार कारवाई केली. त्यानुसार सकृतदर्शनी पाहता कंपनी स्तरावर अल्पकालावधीत वा वारंवार मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील व्यक्तीने राजीनामा देणे कंपनी व्यवस्थापन व संबंधित व्यावसायिक क्षेत्रात योग्य व व्यवसायपूरक नसण्यावर सर्वांचेच एकमत झाले.
 
आपापल्या मुख्याधिकार्‍याला त्यांच्या पदावर अधिकाधिक कालावधीसाठी ठेवण्यासाठी तातडीने व प्राधान्य तत्त्वावर उपाययोजना केली गेली. त्यामध्ये नवी व्यवस्थापन रचना, वाढीव वेतन व विशेष सोई, अधिकार वाढ, नवे पद देणेे यांसारखी उपाययोजना केल्याचे ‘ईएमए पार्टनर्स’ या व्यवस्थापन सल्लागार समितीचे मुख्याधिकारी (आशिया क्षेत्र) के. सुदर्शन नमूद करतात.
 
या मुद्द्याचा एका वेगळ्यासंदर्भात अभ्यास करून काही उपाययोजना सुचविताना ’हरिभक्ती अ‍ॅण्ड कंपनी’ या व्यवस्थापन क्षेत्रातील कंपनीचे तज्ज्ञ शैलेश हरिभक्ती यांच्या मते, कॉर्पोरेट क्षेत्रात मुख्याधिकार्‍यांचे वारंवार सोडून जाणे अथवा अल्पकाळ काम करणे, या मुद्द्यांकडे व्यवस्थापन क्षेत्र आता गांभीर्याने विचार करीत आहे.
 
काही कंपन्या तर या समस्येवर केवळ उपाययोजना करण्यावर समाधान न मानता पुरोगामी प्रयोगांसह उपाययोजना करीत असल्याचे स्पष्ट होते. सर्वेक्षणात कंपन्यांच्या सर्वोच्च अधिकार्‍यांनी राजीनामा देण्याच्या प्रमुख कारणांची कारणमीमांसा करण्यात आली. त्यानुसार या मंडळींच्या राजीनाम्याचे मुख्य कारण कंपनीचे सर्वोच्च व्यवस्थापन वा कंपनी संस्थापक-संचालक यांचा अनाठायी वा अनावश्यक हस्तक्षेप, हे सर्वात प्रमुख कारण असल्याचे दिसून आले. या वारंवार व अनावश्यक हस्तक्षेपामुळे कंपनीचे संचालक मंडळ व मुख्याधिकारी या उभयतांना आपली इच्छा व अपेक्षांनुसार काम करणे अशक्य होते. स्थिती हाताबाहेर गेल्यास या मंडळींना राजीनाम्याशिवाय पर्याय नसतो. यापैकी अधिकांश कंपनी मुख्याधिकारी त्यांच्याकडे काही पर्यायी पद नसतानासुद्धा चक्क राजीनामा देण्याचा मार्ग पत्करतात, यावरून स्थितीची गंभीरता स्पष्ट होते.
 
कंपनी मुख्याधिकार्‍यांसाठी काळजी व तणाव निर्माण करून तो कायम ठेवणारा अन्य मुद्दा म्हणजे कंपनीचा व्यवस्थापन-व्यवसायाशी संबंधित असा नेहमीचा व राहता तणाव. वाढती व्यावसायिक स्पर्धा, आव्हानपर व्यावसायिक स्थिती, प्रसंगी आर्थिक चणचण, तंत्रज्ञानाच्या मर्यादा, पर्यायांचा अभाव, परस्परांमधील अपुरा विश्वास, अकार्यक्षम सहकारी, निर्णय स्वातंत्र्याच्या मर्यादा, अपुरे परस्पर सहकार्य या आणि यांसारख्या कारणांनी आम्ही राजीनामा देतो अथवा दिलेला आहे, असा स्पष्ट निर्वाळा बर्‍याच मुख्याधिकार्‍यांनी दिलेला आहे.
 
ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ व कंपनी व्यवस्थापकांनुसार कंपनी व्यवस्थापन स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसारख्या ज्येष्ठ व्यवस्थापक पदावरील व्यक्तीने अल्पावधीत वा वारंवार राजीनामा देण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे कंपनीमध्ये अस्थिर व्यावसायिक वातावरण निर्माण होते. या बाबीवर सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अधिकांश प्रतिसाद देणार्‍या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांंचे एकमत झाले.
 
या संदर्भातील पुढे आलेला एक अन्य पैलू म्हणजे परंपरागत व प्रस्थापित स्वरुपातील कौटुंबिक मालकीच्या कंपन्या वनया चाकोरीबाहेरील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातील कामकाजविषयक द्वंद्ववाढते. व्यवसाय स्पर्धा व जागतिक औद्योगिकरणामुळे कौटुंबिक कंपन्यांना कंपनीचे व्यवस्थापन संचालन अपेक्षेनुरूप सांभाळण्यासाठी बाहेरील विषयतज्ज्ञ व्यक्तीला मुख्याधिकारी म्हणून नेमावे लागते. मात्र, असे तज्ज्ञ व प्रस्थापित व्यवस्थापन यांच्यात परस्पर सामंजस्य नसल्यास त्याची परिणती कंपनी मुख्याधिकार्‍यांच्या राजीनाम्यात होऊ शकते. या बाबीवर पण सर्वेक्षणात नेमका प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
 
- दत्तात्रय आंबुलकर