संघद्वेषी काँग्रेसचा ‘भारत जोडो’ नावाखाली ढोंगीपणा

    दिनांक : 22-Sep-2022
Total Views |
 
काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा जेव्हापासून सुरु झाली आहे, तेव्हापासून रोज या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसचा संघद्वेष, हिंदूविरोध आणि एकूणच ढोंगीपणा उघड्यावर पडताना दिसतो. मग ते काँग्रेसचे संघाला आग लावण्याचे मनसुबे दर्शविणारे हिंसक ट्विट असो वा हिजाब परिधान केलेल्या मुलीसोबत फोटोसेशन, यावरुन काँग्रेसची देश जोडणारी नव्हे तर देश तोडणारीच विभाजनवादी मानसिकता अधोरेखित होते.
 
 

rahul 
 
 
 
काँग्रेसचे युवराज आणि खासदार राहुल गांधींना राजकारणात स्थिरस्थावर करण्याच्या अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर, त्यांना ‘भारत जोडो’ यात्रा हे नवे शस्त्र वापरून ‘लाँच’ करण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेस कडून सध्या सुरू आहे. यामागील एक मुख्य कारण म्हणजे, ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणावरून माध्यमे आणि जनतेचे लक्ष आपसुकच दुसरीकडे वळवण्याचा हा एक शुल्लक प्रयत्न. पण, आता काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या उरल्यासुरल्या नेत्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, निवडणुका जिंकण्यासाठी फसव्या शब्दांनी आणि खोडसाळ गोष्टी सांगून लोकांना मूर्ख बनवण्याचे दिवस आता संपले आहेत.
पण, दुर्देव हेच की, ही बाब काँग्रेस आणि राहुल गांधींना अजूनही ओळखता आलेली नाही आणि आजवरचा त्यांचा एकंदरीतच राजकीय बालिशपणा पाहता, भविष्यातही त्यांना याचा साक्षात्कार होईल, याची शक्यता तशी धुसरच! कारण, आता अगदी अतिदुर्गम भागातील नागरिकही अधिकाधिक शिक्षित आणि इंटरनेट जगताशी जोडले गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनेविरुद्ध वारंवार खोटे बोलणे, संघद्वेष आपल्या कृतीतून व्यक्त करणे यांसारख्या घटनांमधून काहीएक साध्य होणार नाही, हेच वास्तव!
 
नुकतेच राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून भाजप-रा. स्व. संघाबद्दल तीव्र द्वेष व्यक्त करण्यात आला. काँग्रेसने विरोेधी पक्ष म्हणून राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून भाजपला लक्ष्य करण्यात काहीच गैर नाही. परंतु, संघाला कारण नसताना लक्ष्य करणे हीच काँग्रेस आणि राहुल गांधींची खरंतर प्रारंभीपासूनची नीती राहिलेली दिसते. त्यामुळे जिथे स्वयंसेवक प्रत्येक भारतीयाच्या कल्याणासाठी, वैयक्तिक जीवनातील सुखसोईंचा त्याग करून अथकपणे कार्य करीत आहेत, अशा संघटनेबद्दल काँग्रेसकडून तीव्र द्वेष विविध माध्यमांतून व्यक्त होताना दिसतो.
 
पण, केवळ स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी योगदान आणि बलिदान दिले, असाच अपप्रचार करणार्‍या काँग्रेसींना ‘राष्ट्र प्रथम’ची स्पष्ट दृष्टी आणि दूरदृष्टी असलेल्या, भारतमातेच्या कार्याला समर्पित अशा अनेक स्वयंसेवकांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत, हे सत्य अद्याप पचविता आलेले नाही. म्हणूनच की काय, विविध राजकीय पक्षांचे अनेक नेते संघाच्या कार्याला ‘ऑफ कॅमेरा’ का होईना महत्त्व मात्र देताना दिसतात.
 
पण, सत्य हेच की, संघाने आपल्या स्थापनेपासून ते आजतागायत वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्य विकसित करण्याच्या योग्य हेतूने कार्य केले व संघ आजही हे कार्य निरंतरपणे करत आहे. असे तळागाळात कार्य केल्याशिवाय केवळ काहीतरी मोठे घडवायचे ठरवल्याने कोणी मोठे कार्य घडवून आणू शकत नाही. संघानेही नुसते समाजपरिवर्तन घडवून आणण्याचा विडाच उचलला नाही, तर त्यादृष्टीने गेली 97 वर्षे संघ अविरतपणे कार्यरत आहे.
 
 
 
 
 
sangh
 
 
 
 
जात, रंग, पंथ किंवा धर्माचा भेदभाव न करता जमिनीवर कठोर परिश्रम घेत, संघ विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहे. 35 मोठ्या स्तरांवरील संघटना समाजातील प्रत्येक घटकाचा सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकास करण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहेत. सोबत स्वयंसेवकांद्वारे चालवल्या जाणार्‍या इतर हजारो छोट्या-मोठ्या संस्थांचेही मोलाचे कार्य सुरू आहे. त्यात पर्यावरण संतुलनावरही विशेषत्वाने भर देऊन वेगवेगळी समाजहितैषी कार्ये सुरू आहेत. पण, त्याकडे अजिबात लक्ष न देता केवळ संघाविरोधी गरळ ओकणे आणि अपप्रचार करणे यातच काँग्रेसने धन्यता मानली.
 
म्हणूनच मी गांधी परिवार आणि संघाच्या इतर विरोधकांना निमंत्रित करू इच्छितो की, त्यांनी येऊन कठीण परिस्थितीतही ‘वनवासी कल्याण आश्रम’ वनवासी समाजाच्या कल्याणासाठी जे तळागाळात काम करते ते किमान एकदा तरी नीट डोळे उघडून पाहावे. कारण, गेली वर्षानुवर्षे वनवासी समाज हा बहुसंख्य समाज आणि राजकीय पक्षांकडून दुर्लक्षित, सर्वात उपेक्षित समाज. म्हणूनच मग प्रश्न विचारावासा वाटतो की, काँग्रेसच्या केंद्रातील 55 वर्षांच्या राजवटीत वनवासी समाजाची स्थिती का सुधारली नाही, हे राहुल गांधी सांगू शकतील का? ख्रिश्चन मिशनर्‍यांना त्यांचे धर्मांतर करण्यासाठी व हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करणे कोणामुळे सोपे झाले? त्याचेही उत्तर राहुल गांधींनी जनतेला द्यावे.
 
भूकंप आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीत तसेच प्राणघातक संसर्गजन्य रोग कोरोनाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक शहरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत अथक परिश्रम घेत होते. पाच लाखांहून अधिक स्वयंसेवक तळागाळात मानवसेवेसाठी अहोरात्र कार्यरत होते. पण, यावेळी काँग्रेसप्रमाणे जात, धर्म किंवा रंगाच्या आधारावर स्वयंसेवकांनी जनसेवेत भेदभाव केल्याचे एकही उदाहरण राहुल गांधी किंवा कोणी दाखवू शकेल का? केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांनी अनेक स्वयंसेवकांवर हल्ले करून त्यांच्या कार्यात अडथळा उत्पन्न करण्याचे शेकडो प्रयत्न केले.
 
काही स्वयंसेवकांची यादरम्यान निर्घृण हत्याही करण्यात आली. पण, तरीही कुठलेही राज्य घ्या, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नि:स्वार्थपणे गरजूंच्या मदतीला धावून जातात. हे सर्व लक्षात घेता, आज कोणताही राजकीय पक्ष असा दावा करू शकत नाही की, संघ भेदभाव करतो आणि नैसर्गिक आपत्ती किंवा कठीण परिस्थितीत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना कधीही मदत करत नाही.
 
एवढेच नाही तर कोरोना काळात रमजान महिन्यात उपवास असताना संघाचे स्वयंसेवक मुस्लीम बांधवांना अन्नाच्या पाकिटांची व्यवस्था आणि वाटप करताना दिसले. मग मला सांगा, संघाचे हे कृत्य कुठल्या द्वेषाने प्रेरित आहे का? तर अजिबात नाही. पण, तरीही संघाचा काँग्रेस आणि इतर विरोधी राजकीय नेतेमंडळींकडून वारंवार व्यक्त केला जाणारा द्वेष व त्यांचा धार्मिक पूर्वग्रह स्पष्टपणे दिसून आल्याची अशी अनेक उदाहरणे देता येतील. मुस्लीम किंवा ख्रिश्चन बंधू किंवा भगिनींसोबत काही वाईट घडले की, काँग्रेसचे नेते त्यांना प्रत्यक्ष भेटायला जातात आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तो मुद्दा मांडतात. पण, जेव्हा देशाच्या कुठल्याही कोपर्‍यात अशीच एखादी वाईट घटना हिंदूंच्या बाबतीत घडते, तेव्हा ही मंडळी त्याचा साधा निषेधही करत नाही. मग राहुल गांधी, तुमचा हा हिंदूद्वेषच नाही का?
 
1986 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा शाहबानो खटल्यातील ऐतिहासिक निर्णय तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी फिरवला आणि मग काय पुढे ‘तिहेरी तलाक’मुळे मुस्लीम महिलांचे हाल वर्षानुवर्षे सुरूच राहिले. पण, ते तसेच सुरू ठेवण्याचे काय कारण होते? हा काँग्रेसचा एकप्रकारे मुस्लीम महिलांविरुद्धचा द्वेषच नव्हता का? पण, राहुल गांधींनी हे लक्षात घ्यावे की, सध्याचे केंद्र सरकार, जे त्यांच्या मते, रा. स्व. संघाच्या नेतृत्वाद्वारे चालवले जाते, त्याच सरकारने संसदेत कायदे करून मुस्लीम महिलांच्या हिताचे रक्षण केले आहे.
 
त्यामुळे केवळ आणि केवळ राजकीय स्वार्थासाठी कोण द्वेष पसरवत आहे आणि समाज आणि राष्ट्रउभारणीसाठी नि:स्वार्थीपणे कोण काम करत आहे, हे आजचा भारतीय समाज पुरेपूर ओळखू लागला आहे. त्यामुळे जो कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांना जाळून, त्यांची बदनामी करुन नामोहरम करण्याची राक्षसी मानसिकता बाळगतो, तो समाजात द्वेष पसरवत आहे आणि अशा मंडळींचा देशाला तोडण्याचाच हेतू असू शकतो. म्हणूनच ‘भारत जोडो’ नावाचे ढोंग करणार्‍या अशा मंडळींपासून प्रत्येक नागरिकाने सावध राहिले पाहिजे.
 
- पंकज जयस्वाल