‘लम्पीने जळगाव जिल्‍ह्यात १२२ जनावरे मृत्यूमुखी

    दिनांक : 22-Sep-2022
Total Views |
जळगाव : जिल्ह्यातील आठ तालुक्यांत जनावरांमध्ये लम्पी हा त्वचारोग आढळला आहे. त्यामुळे एक हजार ८०० पशूधन बाधित झाले असून, आतापर्यंत १२२ जनावरे मृत्यूमुखी पडले आहेत. लम्पी त्वचारोगामुळे राज्यात सर्वाधिक मृत्यू जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात झाले आहेत. पशूसंवर्धन विभागातर्फे प्रत्येक तालुक्यात लसीकरण मोहीम वेगात सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत दोन लाख २५ हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे.
 
 

lumpi
 
 
लम्पी आजाराचा प्रसार बाह्य कीटकांद्वारे (डास, माश्‍या, गोचीड आदी) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर, तसेच गोठ्यात बाह्य कीटकांच्या निर्मूलनासाठी ग्रामपंचायतींतर्फे पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने औषधांची फवारणी करण्यात येत आहे. विषाणुजन्य आणि सांसर्गिक असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ अंमलात आणण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. पशुधन एकत्र येतील, असे सार्वजनिक चराई व सार्वजनिक पाणी पिण्याचे सार्वजनिक हौद काही काळासाठी बंद ठेवले आहेत.
 
आकडेवारी पुढीलप्रमाणे -
 
– लम्पी आजाराने बाधित गुरे : ५,१८०
– एकूण मृत गुरे : १२२
– जिल्ह्यातील गुरे : ५ लाख ५० हजार
– आतापर्यंत लसीकरण झालेली गुरे : २ लाख २५ हजार
– प्रत्येक तालुक्यात कार्यरत टीम: ६
आतापर्यंत जिल्ह्यात लम्पी आजाराने १२२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. २ लाख २५ हजार गुरांना लसीकरण झाले आहे. साडेपाच लाख गुरांना लसीकरणाचे उद्दिष्ठ आहे. ते लवकरच पूर्ण होईल. पशुपालकांनी गुरांना लम्पीची लागण झाल्याचे लक्षात येताच पशूसंवर्धपन विभागाला कळवून गुरांवर उपचार करून घ्यावेत.
 
-डॉ. श्‍यामकांत पाटील, उपायुक्त, पशुसंर्वधन विभाग