महापूरग्रस्त पाकिस्तानात उघड्यावर जनता अन् हतबल सरकार!

    दिनांक : 02-Sep-2022
Total Views |

 
पाकिस्तानातील नैसर्गिक आपत्ती आणि त्यावरील सरकारची हतबलता, यावरून या देशाची कार्यक्षमताच दिसून येते. परंतु, दरवेळेप्रमाणे यंदाही या देशाअंतर्गत भीषण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात, जनतेला मदतीचा हात देण्यात पाकिस्तान सरकार मात्र सपशेल अपयशीच ठरले आहे.
 

pur 
 
 
 
 
 
मान्सूनच्या काळातील अतिवृष्टीमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये बरेचदा गंभीर परिस्थिती निर्माण होते. यंदाच्या पावसाळ्यात एकीकडे भारतातील अनेक राज्यांनाही पुराचा जोरदार तडाखा बसला, तर दुसरीकडे भीषण पूरस्थितीमुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील पूरस्थितीविषयी बोलताना पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणतात की, “मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिलेली नाही, अशा परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत.”
 
पंतप्रधानांच्या या विधानावरुन पाकिस्तानमधील पूरपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात यावे. शरीफ पुढे म्हणाले की, “या पुरात दहा लाखांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे किंवा ती घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पाकिस्तानचे ७२ जिल्हे आपत्तीच्या गर्तेत आहेत आणि हा महापूर पाकिस्तानच्या प्रत्येक भागात पोहोचला आहे. या पुरामुळे साडेतीन हजार किमींहून अधिक रस्ते वाहून गेले आहेत. तसेच जवळपास सात लाख प्राणी दगावले आहेत. पाकिस्तानच्या इतिहासातील हा सर्वात कठीण काळ आहे.”
 
केवळ पंतप्रधानच नाही, तर आज समस्त पाकिस्तानातील जनतेच्याही मनात हीच भावना आहे. आतापर्यंत असे मानले जात होते की, २००५ मधील भूकंप आणि २०१० मधील महापूर ही पाकिस्तानमधील आजपर्यंतची सर्वात मोठी भीषण आपत्ती होती. या नैसर्गिक आपत्तींमध्ये दोन हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. मात्र, यंदाच्या पुराने यापूर्वीच्या आपत्तींमधील नुकसानीचे सर्व आकडे अक्षरश: मोडीत काढले आहेत. पाकिस्तानच्या नियोजन मंत्र्यांनी या आपत्तीविषयी सांगितले आहे की, प्राप्त माहितीनुसार या विनाशकारी महापुरामुळे कमीत कमी दहा अब्ज डॉलर्सचे मोठे नुकसान झाले आहे. हे आकडे निश्चितच वास्तवाच्या जवळ असू शकतात. कारण, सध्या पाकिस्तानचा एक तृतीयांश भाग पाण्याखाली आहे. हा तोटा थेट देशाच्या ‘जीडीपी’च्या तीन टक्के इतका असून यावरूनही या देशातील परिस्थितीच्या गंभीरतेचा अंदाज बांधता येईल.
 
देशाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एनडीएमए) ताज्या अंदाजानुसार, जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून बरसणारा मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे किमान एक हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि १५२७ लोक जखमी झाले आहेत, तर ९ लाख, ४९ हजार, ८५८ घरं या आपत्तीत अंशत: किंवा पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत, ज्यामुळे देशातील लाखो लोक बेघर झाले आहेत. ‘एनडीएमए’च्या म्हणण्यानुसार, पीडितांमध्ये ३४८ मुले आणि २०७ महिलांचा समावेश आहे.एक गोष्ट येथे प्रकर्षाने नमूद करायला हवी की, सध्याच्या पावसाळ्यात सिंध प्रांत हा पाकिस्तानातील सर्वात जास्त प्रभावित प्रदेश आहे. महापुरामुळे या प्रांताच्या विविध भागांत झालेल्या दुर्घटनेमुळे ३४७ नागरिक ठार झाले आणि १००९ नागरिक जखमी झाले आहेत. हा आकडा आणखीन वाढूही शकतो. एकीकडे या महापुरामुळे दळणवळण, वीज आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, तर दुसरीकडे यापेक्षाही भीषण समस्येला पूर ओसल्यानंतर पाकिस्तानी जनतेला सामोरे जावे लागणार आहे.
 
मुळात कृषी आधारित अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारा पाकिस्तान, या महापुरामुळे गंभीर संकटात सापडणार आहे. सिंध प्रांताच्या मुख्यमंत्र्यांचे कृषी सल्लागार मंजूर वासन यांनी पाकिस्तानच्या आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्र ‘डॉन’ला दिलेल्या निवेदनानुसार, अतिवृष्टीमुळे कापूस, तांदूळ आणि खजूर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे १०९.३४७ अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय मिरची आणि इतर पिकेही पावसामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. वासन यांच्या मते, १४ लाख एकरांवरील कापसाचे संपूर्ण पीक, ६ लाख ०२ हजार १२० एकरातील उभे भाताचे पीक आणि १ लाख ०१ हजार ३७९ एकरमधील खजुराचे पीक नष्ट झाले आहे. याशिवाय ७ लाख, २९ हजार, ५८२ एकरातील सुमारे ५० टक्के उसाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. ही स्थिती केवळ सिंध प्रांताचीच नाही, तर संपूर्ण पाकिस्तानची आहे. शेतीच्या नुकसानीमुळे अन्नसंकट या देशात अधिक गहिरे होऊ शकते, तर कापूस पिकाच्या नाशामुळे पाकिस्तानचा मुख्य वस्त्रोद्योगदेखील गंभीर संकटात सापडू शकतो.
 
या महापुराचा आणखी एक गंभीर परिणाम पाकिस्तानच्या आरोग्य सेवेवर प्रकर्षाने जाणवणार आहे. विशेषत्वाने देशातील महिला आणि बालकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’ (युएनएफपीएफ)ने या विनाशकारी पुरामुळे पाकिस्तानी महिलांना भेडसावणार्‍या समस्यांवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पूरग्रस्त भागातील अर्ध्या दशलक्षाहून अधिक गर्भवती महिलांना आरोग्य सेवांच्या अभावाचा सामना करावा लागू शकतो. प्राप्त आकडेवारीनुसार, ७३ हजार महिलांची पुढील महिन्यात प्रसूती होणे अपेक्षित आहे. परंतु, त्यांना कुशल प्रसूती सेवक, नवजात बालकांची काळजी घेणार्‍या लोकांची सेवा कितपत उपलब्ध होईल, याबाबत साशंकता आहे.
 
एकट्या सिंध प्रांताबाबत बोलायचे झाल्यास, एक हजारांहून अधिक आरोग्य सुविधांचे अंशत: किंवा पूर्णपणे नुकसान झाले आहे, तर बलुचिस्तानमध्ये बाधित जिल्ह्यांमध्ये १९८ आरोग्य सुविधांचे नुकसान झाले आहे. ‘द न्यूज’ वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, आरोग्यतज्ज्ञांनी या संपूर्ण प्रदेशात साथीच्या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याचा इशारा दिला आहे. पूरग्रस्त भागांतील रोगराईमुळे पुढील चार ते १२ आठवड्यांत सुमारे ५० दशलक्ष नागरिक आजारी पडण्याची शक्यता आहे. यामध्ये सिंध, बलुचिस्तान, दक्षिण पंजाब आणि खैबर पख्तुनख्वामधील पूरप्रवण भागात अतिसार, ‘कॉलरा’, ‘गॅस्ट्रो’, ‘टायफॉईड’, ‘डेंग्यू’ आणि ‘मलेरिया’ यांसारख्या रोगांच्या फैलावाचा धोका सर्वाधिक आहे. या रोगांचा प्रादुर्भाव पाकिस्तानातील पुरामुळे प्रभावित झालेल्या ३५ दशलक्षहून अधिक नागरिकांमध्ये सर्वात जास्त असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, ज्यामध्ये लहान मुले सर्वाधिक प्रभावित आहेत. पूरग्रस्त भागात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याने अतिसार, ‘कॉलरा’, ‘गॅस्ट्रो’, ‘टायफॉईड’, ‘डेंग्यू’ आणि ‘मलेरिया’चा प्रादुर्भाव होण्याचा धोकाही बळावला आहे. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे लहान मुले या रोगांच्या संसर्गास अधिक बळी पडू शकतात. त्यामुळे तत्काळ प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब न केल्यास हे रोग साथीचे रूप धारण करु शकतात.
 
पाकिस्तानातील हा महापूर एकीकडे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या असाहाय्यतेचा दाखला तर देतोच, पण, दरवर्षी उद्भवणार्‍या पूरपरिस्थितीकडे तेथील सरकारने कानाडोळा केल्याचा हा परिणाम म्हणा. परिणामी, अशा संकटांना तोंड देण्यासाठी ज्या गांभीर्याने उपाययोजना करण्याची सरकारी तत्परता हवी, ती मात्र दुर्दैवाने दिसून आली नाही. दुसरीकडे, पाकिस्तानच्या आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा सामान्य परिस्थितीतही जनतेला आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात अपयशी ठरतात. मग अशा आपत्कालीन परिस्थितीत तरी त्या आपली उपयुक्तता कशी सिद्ध करू शकतील म्हणा! पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडूनही या आठवड्यात अर्थसाहाय्य प्राप्त झाले आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय कर्जांची परतफेड करण्यासाठी त्याची काही प्रमाणात मदत होऊ शकते. परंतु, या तात्पुरत्या उपायांमुळे, पाकिस्तान कोणतेही सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दिशेने एक पाऊलही पुढे जाताना दिसत नाही. ही नैसर्गिक आपत्ती आणि त्यावरील सरकारची हतबलता, यावरून या देशाची कार्यक्षमताच दिसून येते. परंतु, दरवेळेप्रमाणे यंदाही या देशाअंतर्गत भीषण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात, जनतेला मदतीचा हात देण्यात पाकिस्तान सरकार सपशेल अपयशीच ठरले आहे.
 
- एस. वर्मा
(अनुवाद : विजय कुलकर्णी)