हिंदूंकडे वाकड्या नजरेने पाहाल तर...

    दिनांक : 12-Sep-2022
Total Views |
 
बहुतेक सर्वच मुस्लीम स्वतःला शांतिदूत समजतात. त्यांच्यातले मुल्ला, मौलवी, इमाम वगैरे आपल्या धर्माला शांतता आणि प्रेमाचा पुरस्कार करणारा समजतात. पण, श्रीरामपूरातल्या दीपक बर्डेने मुस्लीम मुलीवर व त्या मुस्लीम मुलीनेही दीपक बर्डेवर प्रेम केले, त्यांनी विवाहदेखील केला. त्यानंतर मात्र त्या मुलीच्या मुस्लीम कुटुंबीयांनी शांतता आणि प्रेमाचे दर्शन घडवले नाही.
 
 
 

nitesh 
 
 
"हिंदूंकडे वाकड्या नजरेने पाहाल, तर जशास तसे उत्तर देऊ,” असा थेट इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला. श्रीरामपूरमधील दीपक बर्डे या वनवासी तरुणाने मुस्लीम तरुणीशी प्रेमविवाह केला पण, हा प्रकार मुस्लीम मुलीच्या कुटुंबीयांना समजला अन् त्यावरुनच त्यांनी दीपक बर्डेचे अपहरण केल्याचा त्याच्या कुटुंबीयांचा दावा असून त्याला जीवे मारल्याचाही आरोप केला जात आहे. दीपकबर्डेच्या कुटुंबीयांनी अपहरणाच्या घटनेच्या आधी आणि घटनेनंतरही पोलिसांकडे धाव घेतली, पण त्यांनी सहकार्य केले नाही, असाही दावा केला जात आहे. एकूणच या प्रकरणात हिंदूंकडे वाकड्या नजरेने पाहणारे मुस्लीम मुलीच्या कुटुंबीयांबरोबरच मदतीसाठी पुढाकार न घेणारे पोलीसच असल्याचे दिसून येते. त्यातल्या मुस्लीम समाजाविषयी आधी बोलले पाहिजे. कारण, बहुतेक सर्वच मुस्लीम स्वतःला शांतिदूत समजतात.
 
त्यांच्यातले मुल्ला, मौलवी, इमाम वगैरे इस्लामी विद्वानही आपल्या धर्माला शांतता आणि प्रेमाचा पुरस्कार करणारा समजतात. पण, श्रीरामपूरातल्या दीपक बर्डेने मुस्लीम मुलीवर व त्या मुस्लीम मुलीनेही दीपक बर्डेवर प्रेम केले, त्यांनी विवाहदेखील केला. त्यानंतर मात्र त्या मुलीच्या मुस्लीम कुटुंबीयांनी शांतता आणि प्रेमाचे दर्शन घडवले नाही. मुस्लीम मुलीच्या कुटुंबीयांच्या मनात दीपक बर्डेविरोधात संताप धगधगत असताना मुस्लिमांतल्या तथाकथित शांतिदूतांनीदेखील त्यावर फुंकर घातली नाही. त्यातूनच दीपक बर्डेचे अपहरण आणि हत्या केल्याचा आरोप पुढे आला. त्यात तथ्य असेल, तर संबंधित मुस्लीम मुलीच्या कुटुंबीयांचा इस्लाम खरा की इतरांचा इस्लाम खरा, हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. अर्थात, ‘अल-कायदा’, ‘इसिस’ वगैरे दहशतवादी संघटना आमचाच इस्लाम खरा म्हणत असतात, तर मशिदीपासून रस्त्यावर नमाज पढणारेही आमचाच इस्लाम खरा म्हणत असतात. पण, प्रत्यक्षात कोणाचा इस्लाम खरा, हे सर्वसामान्य व्यक्तीच्याही लक्षात येते, तेच श्रीरामपुरातील मुस्लीम कुटुंबीयांनाही लागू पडते.
 
भाजप आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणावर आवाज उठवला, यासाठी त्यांचे अभिनंदन. नितेश राणेंनी दीपक बर्डे अपहरण प्रकरणी शिर्डीत मोर्चाचेही आयोजन केले व त्यात हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव एकवटले. त्यांनी दीपक बर्डेच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याची व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. विद्यमान सरकारकडून ती मागणी नक्कीच पूर्ण होईल, असे वाटते.दीपक बर्डे प्रकरणात मुस्लीम मुलीचे कुटुंबीय दोषी असेल तर तितकेच दोषी कारवाई न करणारे पोलीसही आहेत. आ. नितेश राणे यांनी कोणत्या हवालदाराचे दीपक बर्डेच्या आरोपींसोबत आर्थिक लागेबांधे आहेत, हे सांगितलेले आहे.
 
आरोपींकडून मटका, जुगारसारखे अवैध प्रकार चालवले जातात आणि ते सुरळीत सुरू राहण्यासाठी नजराणा म्हणून हप्त्याची रक्कम पोलिसांकडे पोहोचवली जाते, असे नितेश राणे यांचे म्हणणे आहे. त्यातूनच अर्थलाभ होत असल्याने पोलिसांनी दीपक बर्डे व त्याचे कुटुंबीय तक्रार करण्यासाठी आले असता त्याची दखलच घेतली नाही. वरच्या मलईसाठी पोलिसांनी ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ला काळिमा फासल्याचे नितेश राणेंच्या आरोपांवरुन दिसून येते. अर्थात, सर्वच पोलीस वाईट असतात, असे नव्हे, हे नितेश राणेंनीही सांगितलेच. पण, मग वाईट नसलेल्या पोलिसांनी दीपक बर्डेची मदत का केली नाही? अशा परिस्थितीत आपल्या कर्तव्यात कसूर करणार्‍या सर्वच पोलिसांवरही नियमाअंतर्गत कारवाई झालीच पाहिजे. कारण, तसे न झाल्यास वाईट पोलिसांना चांगले काम करण्याची कधी इच्छाच होणार नाही. वाईट काम केले, तरी आपल्यावर लगाम कसणारा कोणीच नसल्याचे समजून ते मोकाट सुटतील आणि त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेलाच भोगावा लागेल.
 
महाराष्ट्रासारख्या औद्योगिकदृष्ट्या विकसित, प्रगत अर्थव्यवस्थेच्या राज्यासाठी ते उपयुक्त नाही. कारण, त्यातून समाजात अस्थिरता, अराजक निर्माण होण्याची भीती असते. सोबतच या प्रकरणात पोलिसांनी तक्रार करणारे हिंदू आणि विरोधातली बाजू मुस्लिमांची असल्याने माघार घेतली का, हेही शोधले पाहिजे. कारण, महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेत हिंदूंची दडपशाही अन् मुस्लिमांसमोर कुर्निसातची पद्धत सुरु झाली होती. पोलीस दलालाही त्याची लागण झाली होती व हिंदूंविरोधात कठोर होणारे पोलीस अगदी दंगलकाळातही मुस्लिमांबाबत सौम्यच होत असत. अर्थात, आता राज्यात सत्ताबदल झालेला आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांत डागाळलेली पोलिसांची प्रतिमा पूर्ववत होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.
 
दीपक बर्डे अपहरण प्रकरणात आपणच वनवासी वा अनुसूचित जाती-जमातीचे कैवारी असल्याच्या थाटात वावरणार्‍यांचाही बुरखा फाटला. देशासह राज्यात गेल्या काही काळापासून ‘भीम-मीम’ युतीचे एक खूळ समोर आलेले आहे. त्याच्या पुरस्कर्त्यांकडून वनवासी, दलितांना मुस्लिमांच्या रांगेत बसवण्यात येत असून ते हिंदूंना आपला समान शत्रू मानतात. म्हणूनच त्यांच्याकडून सातत्याने हिंदुद्वेष्ट्या भूमिका घेतल्या जातात, हिंदूंविरोधात खोट्यानाट्या कहाण्या सांगितल्या जातात, हिंदूंविरोधात वनवासी, दलितांना चिथावले जाते व वनवासी आणि दलित हिंदू नसल्याचे सांगितले जाते.
 
त्यांच्याकडूनच ‘जय भीम-जय मीम’ची नारेबाजीही करण्यात येते. पण, त्यातल्या कोणालाही दीपक बर्डेप्रकरणात लक्ष घालावेसे वाटले नाही, दीपक बर्डेला न्याय मिळवून द्यावासा वाटले नाही, मुस्लीम मुलीच्या आरोपी कुटुंबीयांना शिक्षा व्हावी म्हणून एल्गार करावासा वाटले नाही. कारण, तसे केले तर आपले मतलबी राजकारण साधले जाणार नाही, असे त्यांना वाटते. आपल्या राजकारणासाठी धर्मांध मुस्लिमांनी दीपक बर्डेचे अपहरण केले तरी चालेल, आपल्या राजकारणासाठी धर्मांध मुस्लिमांनी दीपक बर्डेचा जीव घेतला तरी चालेल, अशी त्यांची मानसिकता झालेली आहे. असाच प्रकार झारखंडमधील वनवासी समाजावर धर्मांध मुस्लिमांनी ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून केलेल्या अत्याचार, हत्येवर सुरु आहे. त्यावरहीस्वतःला वनवासींचे एकमेव प्रतिनिधी समजणारे गप्प आहेत. पण, या सगळ्यात भाजप वनवासी, दलितांच्या पाठीशी असून पीडितांना न्याय मिळवून देईलच.