मुंबईवर नव्हे, याकूबवर प्रेम!

    दिनांक : 10-Sep-2022
Total Views |
मुंबईचा पालकमंत्री दहशतवाद्याला पाठीशी घालणारा, त्याची रदबदली करणारा असल्यावर काय होणार? तर याकूब मेमनच्या कबरीचे सौंदर्यीकरणच होणार! क्रीडा संकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानाचेच नाव दिले जाणार! तेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना! त्यावरूनच उद्धव ठाकरेंना ना मुंबई, ना महाराष्ट्र, ना देश, ना मराठी माणूस, ना हिंदू, कशाशीही देणेघेणे नसल्याचे दिसते.
 
 

thakare 
 
 
 
‘ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला’ अशी मराठीतील एक प्रसिद्ध म्हण. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हातमिळवणी करणार्‍या शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ही म्हण तंतोतंत लागू पडते. एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना सुरुवातीला मराठी आणि नंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सर्वदूर पसरली. पण, शिवसेनेचा आत्मा मुंबईच होता अन् अजूनही आहे.
बाळासाहेब ठाकरेंचे मुंबई व मुंबईकरांवर निरतिशय प्रेम होते अन् मुंबईकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला रोखठोक प्रत्युत्तर देण्याची हिंमतही त्यांच्यात होती. पण, उद्धव ठाकरेंनी शिवसेना ताब्यात घेतली, नंतर ते मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना मुंबईपासून, मुंबईकरांपासून तुटत गेली. आता तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका शिवसेनेच्याच हातात असताना मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍यांपैकी एक असलेल्या दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचे मजारीत रुपांतर केल्याचा धक्कादायक अन् तितकाच संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
१९९३ साली मुंबईत दाऊद इब्राहिमने साखळी बॉम्बस्फोट केले, त्यात अडीचशेपेक्षा अधिकांचा जीव गेला तर हजारो जखमी झाले. त्या घटनेने मुंबईवर, मुंबईकरांवर गहिरा घाव केला. आजही १९९३च्याबॉम्बस्फोटांचा विषय निघाला की, ते घडवून आणणार्‍यांविरोधात जनक्षोभ दिसून येतो. पण, दाऊदने १२ बॉम्बस्फोट केले तरी १३ बॉम्बस्फोट झाल्याचे ठोकून देणार्‍या शरद पवारांबरोबर उद्धव ठाकरेंनी आघाडी केली, अन् त्यांनी बाळासाहेब ठाकरेंकडून मिळालेल्या मुंबई व मुंबईकरांवरील प्रेमाच्या वारशाला पायदळी तुडवले. त्यातूनच याकूब मेमनच्या कबरीवर फुले उधळण्याची, संगमरवरी फरशा लावण्याची, ‘एलईडी’ दिवे लावण्याची, २४ तास पहारा देण्याची, सुशोभीकरण करण्याची कल्पना सूचली व ती प्रत्यक्षात आलीही!
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ साली दहशतवादी याकूब मेमनला फाशी देण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आला. खरे म्हणजे, त्यावेळी त्याच्या कुटुंबाने देशद्रोह करणार्‍या याकूब मेमनचा मृतदेह स्वीकारायलाच नको होता आणि मुस्लिमांनीही त्याच्या दफनविधीसाठी जागा नाकारायला हवी होती. तरी त्यांनी तो स्वीकारला अन् मुस्लिमांनीही हजारोंच्या संख्येने त्याच्या अंत्ययात्रेत गर्दी केली. शेकडो निरपराधांचा बळी घेणारा दहशतवादी याकूब मेमन त्याच्या अंत्ययात्रेत सामील झालेल्या मुस्लिमांचा कोण लागत होता? धर्मबंधू आणि म्हणूनच ते त्यात सहभागी झाले. पण, त्यावरूनच मुस्लिमांकडे सदैव संशयानेच पाहिले जाते.
नुकतीच आसाममध्ये दहशतवाद्यांशी संबंधाच्या कारणावरून स्थानिक मुस्लिमांनी एक मदरसा उद्ध्वस्त केल्याची घटना घडली. ज्या ज्या मदरशांतून वा कुटुंबाकडून दहशतवादी कारवाया चालतात, त्याविरोधात मुस्लिमांनी भूमिका घेण्यासाठी आसामची घटना पथदर्शक म्हटली पाहिजे. पण, मुंबईत तसे झाले नाही, दहशतवादी याकूब मेमनच्या अंत्ययात्रेत मुस्लीम आले अन् त्याला कब्रस्तानात दफनही करू दिले गेले. या दोन्ही घटना पाहता, मुस्लीम समुदाय आसामच्या आपल्याच धर्मबंधूंचे अनुसरण करणार की एका दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेत सामील होण्याचेच धंदे करत राहणार, हा प्रश्न उपस्थित होतो. कारण, त्यांच्याविषयी अन्य समाजात कोणती भावना निर्माण होईल, हे दाखवून देणार्‍या या दोन्ही घटना आहेत.
याकूब मेमनला फाशी दिली गेली, त्याच्या अंत्ययात्रेला हजारोंच्या संख्येत मुस्लिमांनी उपस्थिती दर्शवली. त्यानंतर २०१९ साली राज्यात सत्तांतर झाले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी आले. जवळपास अडीच वर्षे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तर गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मुंबईतील कब्रस्तान, स्मशानभूमी, बरियल ग्राऊंड वगैरेंची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची म्हणजे पर्यायाने सत्ताधारी शिवसेनेची होती.
शिवसेना स्वतःला राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी आणि जिहादविरोधी, दहशतवादविरोधी म्हणत असते. पण, ही सर्व विशेषणे लावणार्‍या शिवसेनेकडेच राज्याचे मुख्यमंत्रिपद व मुंबईचे महापौरपद असताना याकूब मेमनच्या कबरीच्या सौंदर्यीकरणाचे काम केले गेले. त्यावरून वर उल्लेखलेली सर्वच विशेषणे शिवसेनेने दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण सुरू होते, तेव्हा का, कोणाच्या सांगण्यावरून आणि कुठे फेकून दिली होती? हा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे उत्तर त्यांच्या सहकार्‍यांत अन् एकगठ्ठा मुस्लीम मतपेटीसाठी त्या सहकार्‍यांचा गुण लागण्यात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात दाऊदच्या हस्तकांकरवी जमीन खरेदी करणारे नवाब मलिक मंत्री होते. उद्धव ठाकरेंची नवाब मलिकांबरोबर इतकी सलगी की, नवाब मलिक तुरुंगात गेले तरी त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवली नाही. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे होते अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची. मग या लागेबांध्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाला परवानगी दिली का? दिसते तरी तसेच आणि यावरूनच उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसने कळसुत्री बाहुल्याप्रमाणे खेळवल्याचे व उद्धव ठाकरेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहारी गेल्याचे स्पष्ट होते. त्यापुढे त्यांना मुंबईला हादरवणारा दाऊद, याकूब मेमनही प्रिय वाटला, त्यासाठी त्यांनी शिवसेनेच्या तथाकथित राष्ट्रवादाला, हिंदुत्ववादाला खुशाल तिलांजली दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसचाही पाठिंबा घेतला होता. काँग्रेसचेच मुंबईतील एक नेते असलम शेख यांचे मुंबईपेक्षाही दहशतवादी याकूब मेमनवर प्रेम होते. म्हणून त्यांनी शेकडो मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या याकूब मेमनच्या फाशीला विरोध केला. त्यासाठी त्यांनी तत्कालीन राष्ट्रपतींना थेट पत्रही लिहिले अन् याकूब मेमनला फाशी देऊ नये, अशी मागणी केली. त्या असलम शेख यांना उद्धव ठाकरेंनी आपल्या मंत्रिमंडळात मंत्रिपद दिले, त्यांना मुंबईचे पालकमंत्रीही केले. मुंबईचा पालकमंत्री दहशतवाद्याला पाठीशी घालणारा, त्याची रदबदली करणारा असल्यावर काय होणार? तर याकूब मेमनच्या कबरीचे सौंदर्यीकरणच होणार!
 
क्रीडा संकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानाचेच नाव दिले जाणार! तेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, शिवसेनेच्या नगरसेविका मुंबईच्या महापौरपदी असताना! त्यावरूनच उद्धव ठाकरेंना ना मुंबई, ना महाराष्ट्र, ना देश, ना मराठी माणूस, ना हिंदू, कशाशीही देणेघेणे नसल्याचे दिसते. त्यांना फक्त राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेसच्या कृपेने मिळालेली राज्याची सत्ता, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची आणि आपले कुटुंब याचीच काळजी होती. त्यापलीकडे त्यांना काहीही दिसत नव्हते. म्हणूनच दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीला मजारीत रुपांतर होण्याइतकी ‘व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट’ दिली गेली. या सर्वावरून याकूब मेमनच्या अंत्ययात्रेला जमलेला मुस्लीम समुदाय असो वा त्याच्या कबरीचे मजारीत रुपांतर होईपर्यंत शांत बसणारी शिवसेना असो, सार्‍यांनाच देशापेक्षाही स्वतःचास्वार्थ साधण्यातच रस असल्याचे स्पष्ट होते. पण, यातून सर्वांच्याच मुखवट्याआडचे चेहरे उघड होत असून यातूनच एक दिवस त्यांना जनतेच्या संतापाला तोंड द्यावे लागेल!