कानोसा
सध्या समाज माध्यमांवर (RSS Tiranga) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिरंग्याचा सन्मान करतो की नाही, याबद्दल अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
वास्तविक पाहता सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या 2018मधील भाषणाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकून याला उत्तर दिले गेलेले आहे. परंतु ही चर्चा काही नवीन नाही. समाजामध्ये संभ्रम निर्माण करणारे घटक वारंवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या देशभक्त संघटनेची बदनामी करण्यासंदर्भात अशा पद्धतीचा खोडसाळ प्रचार नेहमीच करीत असतात. अशा प्रचाराला उत्तर देण्याची आवश्यकता असतेच. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये संघ संपूर्ण देशभर अनेक देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. सर्वसामान्य समाज जो संघाला दुरून ओळखतो, तो अशा कार्यक्रमांद्वारा संघाच्या कामांमध्ये हळूहळू सहभागी होत असतो. तिरंग्याबद्दल प्रत्येकच भारतीयाच्या मनात अभिमानाची भावना असते. त्यामुळे अशा पद्धतीचा खोडसाळ प्रचार जर केला गेला तर एखाद्या नवीन माणसाच्या मनामध्ये संघाच्या भूमिकेबद्दल प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्याचा संघामध्ये प्रवेश, संघाच्या कामामध्ये सहभाग हा विलंबाने होऊ शकतो. हे सर्व होऊ नये यासाठीच संघ आणि राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दल त्याची भूमिका ही समजावून घेणे खूपच आवश्यक आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये फैजपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीमध्ये सुरू होते. नेहमीप्रमाणे ध्वजारोहण सुरू होते. शेकडो लोकांच्या उपस्थितीत हे (RSS Tiranga) ध्वजारोहण सुरू असताना तिरंगा ध्वज काही अंतर सरळ वर गेला व त्यानंतर अडकला. तो वर जाईना व खाली पण येईना. अशा परिस्थितीत सगळे लोक आवासून तिरंग्याकडे पाहत होते. तिरंगा वर न चढणे व गुंतून राहणे हा तिरंग्याचा एक प्रकारे अवमानच होता. अशा परिस्थितीमध्ये काय होईल याची चिंता लोकांच्या मनामध्ये असताना एक तरुण गर्दीतून बाहेर आला व 80 फूट उंच त्या स्तंभावर चढू लागला. तो तरुण त्या ध्वजापर्यंत पोहोचला आणि त्याने जी गाठ पडली होती ती सोडविली व तिरंगा डौलाने पुन्हा फडकण्यासाठी वर चढला. ध्वजारोहणानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या तरुणाचे खूप कौतुक केले. काँग्रेस त्या तरुणाचा सत्कारही करणार होती. परंतु जेव्हा त्यांना समजले की तो तरुण म्हणजे किशनसिंग राजपूत आहे व तो संघाचा स्वयंसेवक आहे, नियमित शाखेत जाणारा आहे, त्यावेळेस त्याचा सत्कार करण्याचा कार्यक्रम काँग्रेसने सोडून दिला.
काँग्रेसने जरी त्याचा सत्कार केला नाही तरीही संघ संस्थापक डॉ. हेडगेवार ( RSS Tiranga) यांनी मात्र त्याला एक चांदीचा छोटा तांब्या भेट देऊन त्याचा सत्कार केला. आता या उदाहरणामध्ये आपण लक्षात घेतले पाहिजे की शेकडो लोक काँग्रेसच्या अधिवेशनात उपस्थित होते. हे सर्वच लोक देशभक्त होते. पण यापैकी एकालाही आपण ध्वजस्तंभावर चढून त्या ध्वजाला पडलेली गाठ सोडविली पाहिजे असे का वाटले नाही? परंतु संघाने कधीही काँग्रेस तिरंग्याचा सन्मान करते की, नाही हा प्रश्न विचारला नाही. काँग्रेसच्या कार्यपद्धतीत कुठेतरी कमतरता आहे का, हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. काँग्रेसची देशभक्ती ही फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला भारत माता की जय म्हणणे इतकीच आहे का, असाही प्रश्न पडतो. वास्तविक किशनसिंग राजपूत याच्या मनामध्ये तिरंग्याचा सन्मान झाला पाहिजे यासाठी मी स्वतःहून चढलो पाहिजे ही भावना कशी काय आली? याला कारण म्हणजे संघाच्या शाखेमध्ये दररोज प्रार्थनेमध्ये भारत माता की जय म्हटले जाते. सर्वसामान्य समाज 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला भारत माता की जय म्हणतो. परंतु संघाचा स्वयंसेवक दररोज शाखेमध्ये गेल्यावर प्रार्थनेमध्ये भारत माता की जय म्हणतो. त्यामुळे भारत मातेबद्दल, तिरंग्याबद्दल देशाच्या क्रांतिकारकांबद्दल, देशाबद्दल त्याच्या मनामध्ये आपोआपच सन्मान निर्माण होतो. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला, तुम्ही तिरंग्याचा सन्मान करता की नाही असा प्रश्न विचारणे चूक आहे. असे विचारणार्या लोकांनी आपली देशभक्ती तपासून पाहण्याची आवश्यकता आहे.
1930 साली लाहोर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला. त्यावेळेस देशभरातील सर्व (RSS Tiranga) संघ शाखांनी तिरंगा ध्वजासह पथसंचलनाचे कार्यक्रम केले व काँग्रेसच्या अभिनंदनचा ठरावसुद्धा पारित केला. यावरून आपण लक्षात घेतले पाहिजे की काँग्रेस असो वा अन्य कुणी देशाच्या स्वाभिमानासाठी, सन्मानासाठी जर चांगले काम करीत असेल तर संघ त्याला निश्चितच समर्थन देईल व त्यामध्ये सहभाग घेईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' ही घोषणा केली. ही घोषणा संपूर्ण देशासाठी आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा लावणे हा प्रत्येकासाठी स्वाभिमानाचा विषय असला पाहिजे. हा काही भाजपाचा विषय नाही. परंतु काँग्रेस याला भाजपाशी जोडत आहे. म्हणजे प्रत्येक घरावर तिरंगा लागल्याने जर देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले तर त्याचा फायदा भाजपाला मिळेल असे काँग्रेसला का वाटत असते? वास्तविक काँग्रेस हा स्वातंत्र्यापूर्वीपासून देशासाठी काम करणारा पक्ष आहे. मग जनतेमध्ये तिरंग्याचा सन्मान व (RSS Tiranga) देशभक्ती जागृत झाली तर त्याचा फायदा काँग्रेसला का मिळणार नाही? काही लोक मोटारसायकल रॅलीचेही आयोजन करीत आहेत. त्यालाही काँग्रेसने भाजपाशी जोडले आहे. वास्तविक पाहता काँग्रेसने जर तिरंगा घेऊन मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले तर लोक म्हणतील, काँग्रेसने आयोजन केले. त्याचा फायदा काँग्रेसलाही मिळू शकेल. परंतु खुद्द काँग्रेसला तसे वाटत नाही. देशभक्ती व भाजपा हे समीकरण झालेले आहे, असेच काँग्रेसला वाटते आहे आणि ही निश्चितच चांगली गोष्ट आहे.
पूर्वी (RSS Tiranga) संघाच्या कार्यालयावर 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला राष्ट्रध्वज फडकविला जात नव्हता. त्याचे कारण म्हणजे संघाचे कार्यालय हे इतर संस्थांच्या, संघटनांच्या कार्यालयांसारखे नाही. ते तेथे राहणार्या अनेक वृद्ध तसेच व्यवस्थेमधील प्रचारकांचे घर असते. पूर्वी कार्यालयांवर तिरंगा फडकविला जात होता, घरांवर नाही. तिरंगा फडकविण्याचे काही नियम होते. याविषयीचा वाद निर्माण झाल्यानंतर संघानेही आपल्या देशभरातील सर्वच कार्यालयांमध्ये तिरंगा फडकविणे सुरू केले. संघाच्या मनात तिरंग्याबद्दलचा सन्मान होता, आहे व राहणार आहे. कारण तो आमचा राष्ट्रध्वज आहे व संघाचे स्वयंसेवक हे राष्ट्राच्या कामासाठी कटिबद्ध होण्यासाठीच संघाचे स्वयंसेवक बनलेले असतात. त्यामुळे तिरंग्याचा सन्मान ते करतातच, याबद्दल कुठलीही शंका नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे स्वयंसेवक (RSS Tiranga) आहेत. त्या अनुसरूनच त्यांनी हर घर तिरंगा ही घोषणा केलेली आहे. संघाचे स्वयंसेवक आपापल्या घरांवर तिरंगा ध्वज लावतीलच. परंतु काँग'ेस व याबद्दल वाद निर्माण करणार्या लोकांनी आपापल्या घरांवर तिरंगा ध्वज लावून स्वतःच्या देशभक्तीचे प्रदर्शन करावे, याची जास्त आवश्यकता आहे.
- अमोल पुसदकर