आपली ध्वज संहिता (भाग- 4)

    दिनांक : 08-Aug-2022
Total Views |
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकावयाचा आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय ध्वज संहिता 2006 ची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी म्हणून विविध भागात ही माहिती देण्यात येत आहे. त्याचा चौथा भाग असा…
 

tiranga 
 
 
 
 
केंद्र सरकार व राज्य शासन आणि त्यांच्या संघटना व अभिकरणांनी ध्वजारोहण करणे, राष्ट्रध्वज लावबण्याबाबतची माहिती पुढील प्रमाणे, कलम एक, संरक्षणविषयक आस्थापना, परदेशातील प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख, चौक्या : राष्ट्रध्वज लावण्याबाबत स्वत:चे नियम असणाऱ्या संरक्षणविषयक आस्थापनांना या भागातील तरतुदी लागू असणार नाहीत. ज्या देशांत राजनैतिक व वाणिज्यिक प्रतिनिधींनी आपापल्या मुख्यालयांवर व अधिकृत निवासस्थानांवर आपले राष्ट्रध्वज लावण्याची प्रथा आहे. अशा परदेशातील प्रतिनिधी मंडळाच्याप्रमुखांच्या मुख्यालयांवर, चौकीवर व निवासस्थानांवर सुद्धा राष्ट्रध्वज लावावा.
 
कलम दोन, सरकारीरित्या ध्वज लावणे : वरील कलम एकमध्ये अंतभूत असलेल्या तरतुदीस अधीन राहूनया भागामध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदींचे अनुपालन करणे हे सर्व सरकारांना व त्यांच्या संघटना, अभिकरणांना अनिवार्य असेल. सरकारीरित्या ध्वज लावण्याच्या सर्व प्रसंगी, भारतीय मानक संस्थेने (ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार आणि त्या संस्थेचे प्रमाणचिन्ह असलेला ध्वजच वापरण्यात यावा. इतर प्रसंगीसुद्धा केवळ अशाच प्रकारचे योग्य आकाराचे ध्वज लावले जाणे इष्ट आहे. कलम तीन, ध्वज लावण्याची योग्य पद्धत : ज्या- ज्या ठिकाणी ध्वज लावण्यात येईल, अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून तो स्पष्टपणे दिसेल, अशा रीतीने लावला पाहिजे. जेथे कोणत्याही सरकारी इमारतींवर ध्वज लावण्याची प्रथा आहे तेथे त्या इमारतींवर रविवार व सुट्टीचे दिवस धरून सर्व दिवशी ध्वज लावण्यात येईल आणि या संहितेमध्ये तरतूद केली असेल ती खेरीज करून हवामान कसेही असले, तरी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज लावण्यात येईल. इमारतींवर रात्री सुद्धा ध्वज लावता येईल. मात्र, काही अगदी विशेष प्रसंगीच तो रात्री लावावा.ध्वजारोहणाच्या वेळी ध्वज नेहमी झरर्कन वर चढवावा आणि उतरविताना मात्र तो सावकाशपणे व विधीपूर्वक उतरविण्यात यावा. जेव्हा ध्वजारोहणाची व ध्वज उतरविण्याची क्रिया समर्पक बिगुलाच्या सुरांवर करावयाची असेल तेव्हा ध्वजारोहणाची व ध्वज उतरविण्याची क्रिया त्या सुरांच्या बरोबरच झाली पाहिजे. जेव्हा खिडकीची कड, सज्जा अगर इमारतीचा पुढील भाग अशा ठिकाणी आडव्या किंवा तिरक्या बसविलेल्या काठीवरून ध्वज फडकविण्यात येतो तेव्हा ध्वजाची केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावा. जेव्हा ध्वज भिंतीवर सपाट व आडवा लावण्यात आला असेल तेव्हा ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वांत वर असावा. आणि जेव्हा ध्वज उभा लावण्यात आला असेल तेव्हा ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा त्याच्या (ध्वजाच्या) उजव्या बाजूस असावा म्हणजे ध्वजाकडे तोंड करून उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूस असावा. जेव्हा एखाद्या वक्त्याच्या व्यासपीठावर ध्वज लावावयाचा असेल तेव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्यांकडे असताना त्याच्या उजवीकडे काठीवर ध्वज
लावण्यात यावा अथवा वक्त्याच्या पाठिमागे लावताना तो भिंतीवर वक्त्याच्या पाठिमागे वरच्या बाजूस लावावा.
 
एखाद्या पुतळ्याच्या अनावरण करण्यासारख्या प्रसंगी ध्वजाचा वापर करण्यात येईल तेव्हा तो सुस्पष्टपणे व वेगळा दिसेल, अशा प्रकारे लावण्यात यावा. जेव्हा ध्वज एखाद्या मोटार कारवर लावण्यात येईल तेव्हा तो एकतर मोटारीच्या बोनेटवर मध्यभागी मजबूत बसविलेल्या सळईवर किंवा मोटारीच्या समोरील उजव्या बाजूस लावण्यात यावा. जेव्हा एखाद्या मिरवणुकीत अथवा संचलनाच्या वेळी ध्वज फडकवत न्यावयाचा असेल तेव्हा एक तर तो कवायतीने चालणाऱ्यांच्या उजव्या बाजूस म्हणजेच खुद्द ध्वजाच्या उजव्या बाजूस असावा किंवा जर अशा प्रसंगी इतर आणखी ध्वजाची रांग असेल, तर तो त्या रांगेच्या मध्यभागी पुढे असावा.
 
कलम चार -ध्वज लावण्याची चुकीची पद्धत : फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावता कामा नये. कोणत्याही व्यक्तीस किंवा वस्तूस मानवंदना देण्यासाठी ध्वज खाली आणू नये. दुसरा कोणताही ध्वज अगर पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा राष्ट्रध्वजावर आणि यात यापुढे तरतूद केली असेल ते खेरीज करून त्याच्या बरोबरीने लावू नये. तसेच ज्या काठीवर ध्वज फडकत असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकाला फुले किंवा हार यासह कोणतीही वस्तू ठेवू नये अथवा बोधचिन्ह लावू नये. ध्वजाचा तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. ध्वजाचा वक्त्याचे टेबल (डेस्क) झाकण्यासाठी अथवा वक्त्याच्या व्यासपीठावर पडदा म्हणून राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. ध्वजाचा केशरी रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशा प्रकारे ध्वज लावू नये. ध्वजाचा भूमीशी किंवा जमिनीशी स्पर्श होवू देवू नये अथवा तो पाण्यावरून फरफटत नेवू नये. ध्वज फाटेल, अशा पद्धतीने लावू नये अथवा बांधू नये. कलम पाच, ध्वजाचा गैरवापर : कोणत्याही स्वरूपात ध्वजाचा आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही. सरकारमार्फत अथवा सेनादलामार्फत तसेच केंद्रीय निमलष्करी दलांमार्फत काढण्यात येणाऱ्या अंत्ययात्रांचे प्रसंग यास अपवाद असतील. ध्वजाचा मोटार वाहन, रेल्वेगाडी किंवा जहाजांची झडप, छत, बाजू किंवा पाठिमागच्या बाजूस आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही. ध्वज फाटेल किंवा तो मलिन होईल, अशा प्रकारे त्याचा वापर होणार नाही किंवा तो ठेवता येणार नाही. ध्वज फाटला असेल अथवा मळल्यामुळे खराब झाला असेल, तर तो कोठेतरी फेकून देवू नये अथवा त्याचा अवमान होईल, अशा रीतीने त्याची विल्हेवाट लावू नये.
 
परंतु, अशा परिस्थितीत ध्वज खासगीरित्या शक्य, तर जाळून किंवा त्याचा मान राखला जाईल, अशा अन्य रीतीने तो संपूर्णत: नष्ट करावा. ध्वजाचा एखाद्या इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही. ध्वजाचा पोषाखाचा अथवा कोणत्याही प्रकारच्या गणवेशाचा भाग म्हणून वापर करता येणार नाही. तसेच त्याचे उशा, हात रुमाल, हात पुसणे किंवा पेट्या यावर भरतकाम करता येणार नाही. अगर छपाई करता येणार नाही. ध्जवावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाही. ध्वजाचा जाहिरातीच्या कोणत्याही स्वरूपात वापर करता येणार नाही अथवा ध्वज फडकविण्यात आलेल्या ध्वजस्तंभाचा एखादे जाहिरात चिन्ह लावण्यासाठी वापर करता येणार नाही. ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, देण्याचे, बांधण्याचे अगर वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही. परंतु, विशेष प्रसंग आणि प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय सणांचे दिवस साजरा करण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रध्वज फडकविण्यापूर्वी  ध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास कोणतीही हरकत असणार नाही.
 
संकलन
जिल्हा माहिती कार्यालय,
धुळे