नात्यांची वीण जपणारा श्रावण...

    दिनांक : 04-Aug-2022
Total Views |
निसर्ग, मानवी मन आणि संस्कृती यांचं एक अनोखे समीकरण आहे. निसर्गातील बदल मनाला उल्हसित करतात आणि हाच आनंदसोहळा सण-उत्सवाच्या रूपाने साजरा केला जातो. वसंताच्या आगमनाचा गुढीपाडवा असो किंवा शरद चांदण्याची कोजागिरी, भारतीय संस्कृतीतील सर्व सण-उत्सव निसर्गाशी नाते जपतात. त्यात श्रावण म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य.
 
Shrawan1
 
 
आषाढात भरभरून पडलेल्या पावसामुळे श्रावणात नदीनाले तृप्त होऊन वाहत असतात. सगळी धरती हिरव्या रंगाने नटलेली असते. झाडांची पाने टवटवीत होतात. तेरडा, सोनटक्का अशा अनेक फुलांना बहर आलेला असतो. निसर्गाच्या जणू कणाकणांतून चैतन्य पाझरताना दिसते. पेरण्या होऊन गेल्याने बळीराजा काहीसा निवांत असतो. निसर्गातील याच समृद्धीचा आविष्कार आपल्या धार्मिक-सांस्कृतिक पातळीवर झालेला दिसतो. म्हणूनच श्रावणातील प्रत्येक दिवस सण म्हणून साजरा होतो. श्रावणातील ही व्रते केवळ वैयक्तिक मोक्षसाधनेचे मार्ग नाहीत, तर तरलपणे काहीतरी शिकवण देणारी आणि नात्यांची वीण घट्ट करणारी माध्यमे आहेत.
 
श्रावण हा वर्षा ऋतूत येणारा आणि चैत्रादी वर्षातील पाचवा महिना. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र ‘श्रवण’ नक्षत्रात असतो, म्हणून याचे ‘श्रावण’ असे नाव आहे. (श्रवणर्क्षं पौर्णमास्यां ततोऽपि श्रावण: स्मृत:) किंवा या महिन्याचे माहात्म्य श्रवण करण्यास योग्य आहे (श्रवणार्हं यन्माहात्म्यं तेनासौ श्रवणो मत:) म्हणून याचे नाव ‘श्रावण’ अशीदेखील व्याख्या आहे. वैदिक काळात याचे ‘नभस्’ असे नाव होते. अमरकोशात ‘श्रावण:’, ‘नभा:’ आणि ‘श्रावणिक’ अशी याची नावे सांगितली आहेत. गीतेत भगवंतानी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम्’ म्हटले असले, तरी विविध पुराणांनी श्रावणाचे महात्म्य सांगितले आहे.
 
‘द्वादशस्वपि मासेषु श्रावणो मेऽतिवल्लभ:।’ म्हणजे बाराही महिन्यात हा महिना मला सर्वात प्रिय आहे, असे स्वत: महादेव शिवपुराणात म्हणतात. श्रावण म्हणजे श्रवण करण्याचा महिना म्हणून या महिन्यात विविध ग्रंथांचे पारायण, मंदिरात रोज कीर्तन-प्रवचन केले जाते. श्रावणात निसर्ग थोडा विसावलेला असतो. पर्यायाने माणसेदेखील थोडी निवांत होत उपासतापास, मनन, चिंतन करू लागतात. धर्म, अध्यात्म, आरोग्य, पर्यावरण, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक समन्वय, लोकसाहित्य अशा सगळ्याच दृष्टीने श्रावण महिना महत्त्वपूर्ण ठरतो.
 
श्रावणात दररोज वारानुसार व्रतवैकल्ये केली जातात. सोमवारी नक्त उपवास करत शिवपूजन केले जाते. तसेच तांदूळ, तीळ, मूग, जवस व सातू या धान्यांची शिवामूठ शिवाला वाहिली जाते. मंगळवारी नववधू मंगळागौरीची पूजा करून हा दिवस विविध वैशिष्ट्यपूर्ण खेळ खेळून साजरा करतात. प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीचे व्रत सांगितले आहे. घरात विविध ठिकाणी गंधाने दोन बाहुल्या रेखाटून त्याची पूजा करून दही-भाताचा नैवेद्य दाखवावा.पाळण्यावर चित्र काढल्यास संततीप्राप्ती, तिजोरीवर काढल्यास धनप्राप्ती, धान्याच्या कोठीवर काढल्यास धान्यवृद्धी, शयनगृहात काढल्यास दाम्पत्यसुख, दरवाजापाठीमागे काढल्यास प्रवासाला गेलेल्या प्रिय व्यक्तीचे सुखरूप आगमन अशी प्रतिमांच्या स्थानांप्रमाणे वेगवेगळी फळे सांगितली आहेत.
 
श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी मुलाबाळांच्या रक्षण आणि कल्याणासाठी जिवंतिका व्रत सांगितले आहे.जिवती ही बाळांचे रक्षण करणारी आणि जरा त्यांना दीर्घायुष्य देणारी देवता मानली जाते. भिंतीवर मुलंबाळ यांनी वेढलेल्या जरा-जिवंतिका यांचे चित्र रेखाटावे. आघाडा-दुर्वा, हळदीकुंकवाने पूजा करावी. फुटाणे, पुरण यांचा नैवेद्य दाखवावा, सुवासिनींना दूध-फुटाणे देत हळद-कुंकू करावे, असे हे व्रत आहे. शनिवारी शनी, मारूती, नरसिंह व पिंपळ यांची पूजा करतात आणि मुंजा मुलास स्नान घालून भोजन देतात. तसेच शनिवारी घरातील खांबावर नरसिंहाचे चित्र काढावे. त्याचे तिळाचे तेल, हळद, चंदन, लाल-निळी फुले वाहून पूजा करावी. कुंजरा नावाची पालेभाजी आणि खिचडी असा नैवेद्य दाखवावा. या व्रताने इहलोकी धनधान्यकीर्ती आदी सुख आणि वैकुंठप्राप्ती असे फळ सांगितले आहे. रविवारी विड्याच्या पानावर रक्तचंदनाने सूर्य काढून आदित्य राणूबाईची पूजा करून खिरीचा नैवेद्य दाखवला जातो.
 
धार्मिकदृष्ट्या श्रावणाचे महत्त्व इतर महिन्यांपेक्षा अधिक आहे. विविध पुराणांमध्ये तसेच ‘निर्णयसिंधु’, व्रतराज हेमाद्रीकृत ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ इत्यादी ग्रंथात श्रावणातील अनेक व्रते सांगितली आहेत. यातील काही व्रते आज प्रचलित नाहीत. तसेच ग्रंथात उल्लेख नसणारी, पण लोकपरंपरेत प्रचलित असणारीदेखील अनेक व्रते आहेत. ‘स्मृतिकौस्तुभ’ या ग्रंथात श्रावण शु. प्रतिपदेला ‘मृगशीर्ष व्रत’ सांगितले आहे. श्रावण शु. तृतीयेला ‘स्वर्णगौरी व्रत’ केले जाते. शु. चतुर्थीला ‘दूर्वागणपतिव्रत’ करावे, असे ‘सौरपुराणा’त म्हटले आहे.श्रावण शु. पंचमी म्हणजे ‘नागपंचमी’ या दिवशी नागांचे पूजन केले जाते. पाटावर चंदनाने तसेच दाराच्या दोन्ही बाजूला शेणाने नागप्रतिमा काढाव्यात. या नागांची दुर्वा, गंध-फुले अर्पण करून पूजा करावी, दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखवावा. या व्रताने सर्पभय दूर होत अखंड संपत्ती मिळते.
 
श्रावण शु. षष्ठीला वर्णषष्ठी हे व्रत करत पूजेनंतर शिवाला वरणभाताचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच याला ‘सुपोदन षष्ठी’ म्हणत, स्त्रिया पानावर तांदूळ व वाल ठेवून वाण देतात. महाराष्ट्रातील काही भागात ‘श्रीयाळ षष्ठी’ साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी संध्याकाळी श्रीयाळ श्रेष्ची मिरवणूक काढून त्यांच्या पुतळ्याचे विसर्जन केले जाते. ‘शीतला सप्तमी’ला शीतलादेवीची आणि जलाशयाची पूजा करण्याची पद्धत आहे, या दिवशी चूल बंद ठेवून आदल्या दिवशी केलेल्या शिळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखून खाण्याची पद्धत आहे. शु. अष्टमीला ‘दुर्गाव्रत’ करून देवीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. शु. एकादशीला देवाला ‘पवित्रक’ अर्पण केली जातात. शु. द्वादशीला ‘दधीव्रत’ सांगितले असून विमानारूढ भगवान विष्णूंची पूजन करून दह्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्रयोदशी श्रावणातील प्रदोष म्हणून अधिक महत्त्वपूर्ण मानली जाते. शु. चतुर्दशी किंवा पौर्णिमेजवळील शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत केले जाते. पौर्णिमेला ‘श्रावणी कर्म’ करत नवीन यज्ञोपवित धारण केले जाते. बहीण आपल्या भावांचे औक्षण करून त्यांचा मनगटावर राखी बांधतात, तसेच कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात.
 
श्रावण कृष्ण प्रतिपदेला ‘धनावाप्ती’ व्रताचा आरंभ करून विष्णूची निळ्या कमळांनी पूजा केली जाते. कृ. द्वितीयेला सुखी दाम्पत्य जीवनासाठी ‘अशून्यशयन व्रत’ सांगितले असून यात लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते. कृ. चतुर्थीला गणपतीची पूजा करून लाडवांचा नैवेद्य दाखवून लाडू दान करण्याचे व्रत सांगितले आहे. कृ. पंचमी ‘सर्पविषापह पंचमी’ म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी सापांची पूजा करण्याचे विधान आहे. कृ. षष्ठीला ‘चंद्रषष्ठी’ हे व्रत करत रात्री चंद्राची पूजा केली जाते. श्रावण कृ. सप्तमीला ‘ललितासखी व्रत’ सांगितले असून यात नदीजवळ वाळूच्या शिवलिंगाची पूजा केली जाते. कृ. अष्टमीला मध्यरात्री भगवान कृष्णांचा जन्म उत्सव करून जन्माष्टमी व्रत केले जाते. नवमीला महाराष्ट्रात दहीहंडी साजरी केली जाते. श्रावणी अमावास्येला ‘पिठोरी अमावास्या’ असे नाव असून या दिवशी 64 योगिनींची पूजा केली जाते. शेतकरी या दिवशी बैलपोळा साजरा करतात.
 
श्रावणात महाराष्ट्रात ‘नागनरसोबा’चा किंवा ‘जिवतीचा कागद’ म्हणून ओळखला जाणार ‘श्रावणपट’ देवघरात लावला जातो. महिनाभर आघाडा-दुर्वा कापसाचे वस्त्र वाहून याची पूजा केली जाते. श्रावण संपताच याचे वाहत्या पाण्यात विसर्जन केले जाते. या चित्रात नरसिंह, कालियामर्दन करणारा कृष्ण, जिवती आणि बुध-बृहस्पती अशा वरवर पाहता परस्परांशी संबंध नसणार्‍या देवतांच्या प्रतिमा असतात. विविध पुराणांमध्ये श्रावणातील जी अनेक व्रते सांगितली आहेत, त्यापैकी ज्या व्रतात भिंतीवर किंवा विविध ठिकाणी देवतेची चित्रे काढून पूजन करावे असे विधान सांगितले आहे. अशा व्रतांतील देवता या श्रावणपटावर दिसतात. देवघरातल्या भिंतीवर एकाच ठिकाणी या प्रतिमा काढून पूजा करणे सोयीचे ठरते. पुढे छपाईचे तंत्र रुळल्यावर या देवतांच्या एकत्रित चित्रांचा कागद छापला जाऊन लोकप्रिय झाला. अशा या वैशिष्ट्यपूर्ण व्रतांचा श्रावणपट श्रावणाचे प्रमुख लक्षण ठरला आहे.
 
श्रावणातील व्रतांइतक्याच वैशिष्ट्यपूर्ण श्रावणातील कहाण्या आहेत. सातही वारांच्या, नागपंचमी, शीतलासप्तमी अशा व्रतांच्या, विविध देवांच्या या लहान कहाण्यातून विविध व्रतांचे महात्म्य अगदी सोप्या भाषेत सांगितले आहे. ‘आटपाट नगरा’त घडणार्‍या या कथा ‘उतू नकोस मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस’ असे वारंवार बजावतात. मुले-बाळे, गुरे-वासरे,आजारी वृद्ध यांना अतृप्त ठेवून ईश्वराला तृप्त करता येत नाही, हे तत्त्वज्ञान खुलभर दुधाच्या कहाणीतली म्हातारी सोप्या भाषेत सांगते. संपत्तीने उन्मत्त होऊन रक्ताची नाती अव्हेरू नये, हे शुक्रवारची कहाणी शिकवते. आपल्याकडे जे काही आहे त्यातला काही भाग गरजूंना द्यावा, त्याला नाही म्हणू नये, ही शिकवण संपत शनिवारच्या कहाणीतून मिळते.
 
भारतीय मनाचे गोष्टी वेल्हाळपण जाणून या कहाण्यातून जीवन ‘सुफळ संपूर्ण’ होण्यासाठी नीतिमूल्यांची नकळत पेरणी होते. पुराणात सुत-शौनक, शंकर-पार्वती अशा विविध प्रश्नोत्तरांतून सांगितलेले व्रतांचे प्रदीर्घ ‘साठा उत्तरा’चे महात्म्य या कहाण्यात अगदी थोडक्यात-पाचा उत्तरात सांगितले असते. या कहाण्यांचा काळ, रचनाकार याविषयी अनभिज्ञता असली, तरी मौखिक परंपरेने त्या पिढ्यान्पिढ्या चालत आल्या आहेत. सोपी-लहान वाक्ये, रसाळ भाषा, नादयुक्त शब्दरचना, आशयघनता, मानवी स्वभावाचे नेमके चित्रण अशा वैशिष्ट्यामुळे मराठी लोकसाहित्यात श्रावण कहाण्यांचे स्थान वेगळे ठरते.
 
श्रावण हा फक्त धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर मानवी जीवनातील अनेक नात्यांमधील गोडवा श्रावण वाढवतो. जगण्याच्या धावपळीत व्यस्त झालेले सगे-सोयरे सणांच्या निमित्ताने एकत्र येतात. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा सण. बहीण भावाच्या हातावर रेशमी राखी बांधून त्याचे मन जपते तर भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी घेत तिचा मान राखतो. मंगळवारी मंगळागौरीची पूजा करताना नववधू आपल्या नवीन वैवाहिक जीवनात रंग भरते. मंगळागौरीचे खेळ, गाणी यातून पूर्वीच्या बायका मनातल्या भावना व्यक्त व्हायच्या. सासरची गार्‍हाणी, सासुरवास गाण्यातून व्यक्त करून मानत कुठली अढी न ठेवता पुन्हा संसाराला लागायच्या.
 
आजच्या काळात सासुरवास नसला, तरी मंगळागौरीच्या खेळातली आधुनिक गाणी नणंद-भावजय, जावा-जावा, सासू-सुना यांच्या नात्याला नवीन आयाम देतात. श्रावणी शुक्रवार हा वात्सल्याचा सोहळा. आपल्या मुलाबाळांचे रक्षण व्हावे, त्यांना दीर्घायुष्य मिळावे म्हणून माता जिवतीची पूजा करत मुलांना औक्षण करतात. श्रावणी अमावस्या हा ‘मातृदिन’ म्हणजे भारतीय ’मदर्स डे.’ मुलांनी आपल्या आईच्या वात्सल्याचा कृतज्ञतेने सन्मान करायचा हा सण. श्रावणी शुक्रवारच्या हळदीकुंकवाच्या निमित्ताने मैत्रिणींचे ‘गेट टुगेदर’च जमते. गोपाळकाला हा तरुणांना एकत्र करणारा सण दहीहंडीच्या खेळातून न कळत संघभावना शिकवून जातो. आज तंत्रज्ञानाच्या युगात या प्रथापरंपरांचे संदर्भ बदलेले असले, तरी आजही श्रावणाचे महत्व अबाधित आहे. किंबहुना तंत्रशुष्क आयुष्याला पुन्हा भावनांचा ओलावा मिळायला यातून मदत होत नात्यांची वीण घट्ट राखली जाते.
 
परंपरांचं जतन करताना आवश्यक तिथे आधुनिक विचारांची जोड देणेदेखील गरजेचे आहे. नागपंचमीला लोखंडी अवजारे, उपकरणी वापरू नये, असे शास्त्र आहे. हा एक प्रकारे ‘नो मशीन डे’ म्हणता येईल. या दिवशी मिक्सर, वॉशिंग मशीन, कार अशी यंत्रे शक्य तेवढी न वापरता यंत्रांशिवाय दिवस घालवता येईल. यातून यंत्रांवर अतिअवलंबून राहून आपण आपली बौद्धिक, शारीरिक क्षमता कमी करत आहोत का, याचे चिंतन करता येईल.
 
‘नो शेव्ह नोव्हेंबर’ सारखे श्रावणात दाढी न करता श्रावण पाळणे पण ‘ट्रेंडिंग’ व्हायला हरकत नाही. श्रावणी शुक्रवारी सधन सवाष्णीसोबत गरजू महिलांना मानाने बोलवून जेवू घातले, तर ते कहाणीतल्या आशयाला अनुसरून ठरेल. ‘शीतला सप्तमी’ला जलाशयांचे पूजन करताना तळे, बारव, नद्या यांच्यातील प्रदूषण दूर करत सफाई केली, तर जलदेवतांची कृपा अधिक होऊ शकेल. गरजू विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत करणे हा बुधबृहस्पती व्रताचा आधुनिक आशय ठरेल. समाजातील दिव्यांग, रुग्ण यांना मदत करणे हा खरा संपत शनिवार आणि चिमूटभर धान्य शिवपिंडीवर वाहून उरलेले धान्य गरजूंना देणे ही खरी शिवमूठ. निकोप कुटुंबातून निकोप समाज आणि त्यातून समृद्ध राष्ट्रनिर्माण हा श्रावणातील व्रतांचा आशय आहे. कहाण्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपले जीवन नक्कीच ‘सुफळ संपूर्ण’ होण्यासाठी श्रावणाचा हा वसा घ्यायलाच हवा!
 
- विनय जोशी